Americas
अमेरिकेने N-95 मास्क व PPE 'हायजॅक' केल्याचा फ्रांस, जर्मनी, ब्राझील यांच्याकडून आरोप
कोरोनाव्हायरस विरोधी लढ्यात अमेरिकेच्या मनमानी कारभाराने अंतर्राष्ट्रीय तणाव निर्माण होण्याची शक्यता.
पाश्चिमात्य देशांमधील ‘मास्क वॉर’ या आठवड्यात उघडकीस आलं, कारण फ्रान्स आणि जर्मनीने अमेरिकेवर कोरोनाव्हायरस (साथीच्या रोगाचा) महामारीच्या वेळी पश्चिम युरोपमध्ये पाठविल्या जाणाऱ्या लाखो मास्क स्वतःकडे वळवून घेतल्याचा आरोप केला आहे.
कोरोनाव्हायरस साथीचा रोग संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत पसरला आहे. इटलीनंतर फ्रांस आणि जर्मनीमध्येही परिस्थिती अत्यंत बिकट आहेत. अमेरिकेतही मृतांचा आकडा १० हजार ओलांडून गेला आहे. अशातच मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हस यासारख्या संरक्षणात्मक उपकरणांसाठी जागतिक स्तरावर कलह सुरू होण्याची चिन्हं आहेत.
कोरोनाव्हायरस पासून संरक्षणासाठी सर्व देश झगडत असताना, अमेरिकेने मास्क शिपमेंट 'हायजॅक' केल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे चीनने जपान, अमेरिकेसह युरोप, आफ्रिका आणि आखाती देशांसह १२० राष्ट्रांना सर्जिकल मास्क, प्रोटेकशन किट, चाचणी किट आणि इतर मदत पुरविल्या आहेत, असे त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
युरोपियन प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनानुसार, काही लाख मास्क आणि पीपीई शांघायहून फ्रान्सला नेले जाणार होते. शेवटच्या क्षणी त्यात अमेरिकेमुळे बदल केले गेले. अमेरिकन खरेदीदारांनी इतरांपेक्षा तिप्पट किंमत रोख रकमेत देऊन ते मास्क अमेरिकेकडे वळविले असल्याचे एका फ्रेंच राजदूताने रेडिओ फ्रांसशी बोलताना सांगितलं. फ्रांस आपल्या कोरोनाव्हायरस पीडितांसाठी पुरेसे मास्क आणण्याच्या प्रयत्नात असताना अमेरिका मात्र अनेक देशांच्या वाट्याचे मास्क हस्तगत करत असल्याचं वृत्त फ्रान्सच्या 'लिबरेशन' या वृत्तपत्रानं दिलं आहे. या वृत्तानुसार अमेरिका अशा मास्क आणि साधनांची एकाच वेळी अब्जावधी युनिस्ट्सची ऑर्डर देत असल्यानंही इतर देशांच्या काही दशलक्ष युनिट्सच्या ऑर्डरकडं दुर्लक्ष होत आहे.
जर्मनीदेखील संरक्षणात्मक किटच्या मागणीसाठी खूप संघर्ष करताना दिसत आहे. मागील आठवड्यात फेस मास्कची दुसरी शिपमेंट बर्लिनकडे जात असताना बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आली. बर्लिनने अमेरिकेवर बँकॉक विमानतळावर जर्मनीकडे जाणाऱ्या फेस मास्क 'जप्त' केल्याचा आरोप केला आहे. कोरोनाव्हायरसविरूद्ध लढ्यात मदत करण्यासाठी उर्वरित ऑर्डर जर्मनीमध्ये येऊ देण्यापूर्वी अमेरिकन अधिकाऱ्यांनी संरक्षण गीयरची वाहनं जप्त केली होती, ज्यात २००,००० फेस मास्क अमेरिकेकडे वळविल्याची माहिती आहे. केनियामध्येही अशीच एक घटना घडली जिथे पूर्व आफ्रिकी देशातून जर्मनीला पाठवले जाणारे मास्क अचानक गायब झाले आहेत.
ब्राझीलचे आरोग्यमंत्री लुई हेनरिक मॅन्डेटा यांनी गेल्या आठवड्यात ब्राझीलसाठी चिनी वैद्यकीय पुरवठा अमेरिकेने हायजॅक केल्याचा आरोप केला होता. जेव्हा चीनने ब्राझीलच्या मदतीसाठी काही उपकरणांचे आदेश काढले होते, त्यावेळी अमेरिकन सरकारने त्याच उत्पादनांच्या खरेदीसाठी २० हून अधिक मालवाहू विमाने चीनला पाठवली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनीदेखील यासंबंधी बोलताना सांगितले की वैद्यकीय पुरवठा त्यांच्या देशापासून वळविला जात आहे.
आता पुष्टी झालेल्या COVID-19 च्या प्रकरणांमध्ये जगात अमेरिका सर्वात पुढे आहे. यासंबधी शनिवारी बोलताना अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले “आम्हाला हे मास्क आमच्या अंतर्गत वापरासाठी हवे आहेत. आम्हाला ते मिळवावे लागतील.” ट्रम्प असंही म्हणाले की अमेरिकन अधिकाऱ्यांनी जवळपास २००,००० N-९५ मास्क, १,३०,००० सर्जिकल मास्क आणि ६००,००० ग्लव्हस ताब्यात घेतले आहेत. त्यांनी हे कुठून ताब्यात घेतले हे त्यांनी सांगितले नाही.