Quick Reads

कोकणातील भातशेतीला गरज नव्या तंत्रज्ञानाची

भात शेतीसाठी सहज-सोप्प्या, शाश्वत मार्गाची गरज आहे.

Credit : सर्व फोटो: अमित कुबडे

पंकज दळवी, गुहागर । कोकणात पारंपरिक भात शेती म्हणजे कौल तोडणी, दाढ तनवणी, माती लावणे, भाजवळ मग पेरणी-भात लावणी, अशी किचकट पद्धती शेतीची. 'कोकणात भाजवळी शिवाय काही उगवत नाही' ही अंधश्रद्धा जोपासून शेती अजून होते. पारंपरिक किचकट शेती पद्धतीतून कोकणातील शेतकऱ्यांना बाहेर काढलं तरचं, इथे पुन्हा नवीन वर्ग शेतीकडे वळेल. दापोली कृषी विद्यापीठदेखिल भाजावळ करून केल्या जाणाऱ्या अशा भातशेती पद्धतीला ठामपणे नाकारते, फक्त अजून शेतकऱ्यांना ह्या मानसिकतेतून बाहेर काढायला त्यांना इतकी वर्षे जमलेलं नाही. बियाणं आणली, रोपं वगवली, तण येऊन नये म्हणून एखादी नांगरणी किंवा (तणनाशक फवारणी हा पर्यायदेखिल आहे) नांगरणी नंतर चिखली करून सरळ लावणी, असा सहज-सोप्पा शाश्वत मार्ग भात शेतीसाठी हवा.

कोकणातील बरीच मंडळी मुंबईत असते. पूर्वी लावणीसाठी चाकरमानी येणे हा प्रघात पण होता. आधीच शेतीसाठी क्षेत्र कमी, प्रलंबित बेदखल कुळ प्रश्न, त्यात हिस्स्यांमध्ये भावकीतल्या हजार कंदाली आणि सरतेशेवटी करून करायचं काय तर भाजावळी, अशा हजार भानगडी असलेली पारंपरिक शेतपद्धती. परिणामस्वरूप शेती कमी होऊ लागली, जमीनी ओसाड पडू लागल्या, मुंबईसारखं शहर एकाच प्रांतात असल्यामुळे, रोजगाराअभावी सक्तीचं स्थलांतर अनेकांचं झालं. यात तरुण वर्ग शेतीत उरला नाही. त्यामुळे अभिनव प्रयोग व तंत्रज्ञान यांचा मेळ मांडला गेला नाही.

बेला, वालय, तुरवा, पंकज, पटनी, भडश्या, वरंगल, हरिक, म्हैसूर यांसारखी विशिष्ट वैशिष्ट्यं असलेली बियाणं काळाच्या ओघात हरवली, एक काडी-संकरीत यांनी त्यांची जागा घेतली. बियाणांच्या बाबत स्वयंपूर्ण असलेला कोकणी शेतकरी खासगी दुकानदाराच्या बियाणांवर परावलंबी झाला. आज स्थानिक बियाणांची शोधाशोध पुन्हा सुरू झाली आहे. सचिन चोरघे-गौरव बारटक्के यांसारखी नवीन लोक याबाबत कोकणात लोकचळवळही उभी करत आहेत.

 

 

लॉकडाऊनमुळे भातशेती-नाचणी मधलं लागवड क्षेत्र गेल्या दोन वर्षांत वाढलय, अर्थात भाजवळी करून केली जाणारी शेती मोठ्याप्रमाणावर. भात शेती पेरणीसाठी भाजवळ करण्याच्या मुख्य कारणांचा मागोवा घेतला तर रायगड, रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत तण येऊ नये म्हणून, हेच कारण सांगितलं जातं, तरी रायगडमध्ये भातशेती पद्धतीमध्ये बऱ्याच सुधारणा शेतकऱ्यांनी घडवून आणल्या आहेत, ज्यात आवान-तुवरा शेताच्या वेगवेगळ्या भागांत पेरणी करून तयार केला जातो. फक्त तण उगवू नये, बियाणं चांगलं रुजून यावं एवढ्यासाठी कौल तोडणी, दाढ तनवणी, माती लावणे, भाजवळ मग पेरणी असा लांबलचक उपद्वाप शेतकरी पिढ्यानपिढ्या करतो आहे.

भाजवळीमुळे माळरानावर वणवे लागण्याच प्रमाण हे जवळपास ७५% आहे, त्यामुळे अनेक आंबा-काजू बागायती दरवर्षी जळून खाक होतात. भाजावळीमुळे जर तण उगवलं नसतं, तर दरवर्षी हजारो हेक्टर जंगल वनव्यात कोकणात नष्ट होतात, त्याऐवजी तिथे तांत्रिकदृष्ट्या पाहिल तर तण उगवलंच नसतं. तण समस्या ही अर्थात् काही प्रमाणात जमिनीच्या मशागतीने आटोक्यात येऊ शकणारी आहे, त्यात यांत्रिकीकरणाने सुलभता येऊ शकेल.

कोकणात भातशेतीच्या यांत्रिकीकरणाबाबत सरसकट विचार करुन चालणारा नाही. भातशेती नांगरणीसाठी पॉवर टिलर किंवा पॉवर वीडर हेच उपयोगी पडतात. पण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गात बराच भातशेतीचा भाग हा मळे शेतीतला, जास्त चिखलाचा (wetlands) आहे. त्यामुळे जास्त वजनाचा पॉवर टिलर अशा ठिकाणी वाहतूकीसाठी अडचणीच ठरतो. हीच बाब भात रोवणी यंत्राला ही लागू होते. त्यामुळे पॉवर वीडर हा राज्याच्या कोकण इतर भागांत आंतर मशागतीसाठी वापरला जात असला तरी कोकणात मात्र भात नांगरणीसाठी प्रभावीपणे उपयोगात येतो.

 

 

आता आम्ही भातशेतीसाठी वापरत असलेली पद्धत काय तर, पेरणीपूर्व एकदा नांगरणी करायची, शेतात पेरणीच्या नियोजित ठिकाणी मशागतीने गादी वाफे बनवून घ्यायचे, मान्सूनपूर्व पावसास तण येतं, ते काढून घ्यायचं किंवा तणनाशक मारूनघ्यायचं. दोन तीन दिवसांनी पेरणी करायची. आवान-तुवराची व्यवस्थिती वाढ झाली की शेतात चिखलीने भात लावायचा. कापणी पारंपरिक पद्धतीनेच करून, मळणी यंत्राद्वारे मळणी सोयीस्कर पडते.

भाजवळीत लागणारा सुका राब जाळला जातो, तो कंपोस्टसाठी उपयुक्त ठरतो. खेड मध्ये सत्यवान मोरे यांनी असं सोप्या पद्धतीने वापरता येणारं, वीजेवरच मळणी यंत्र त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी बनवले आहे. शेत नांगरणीसाठी चॅम्पसारखे छोटे ट्रॅक्टरस् तर कोकणासाठी वरदानच ठरतात. यांत्रिकी उपकरणांचा मेळ आणि काही तर्कशुद्ध शेतीतील आवश्यक बदल केल्यास, कोकणातल्या भातशेतीत पुन्हा प्रगती जोर धरेल. 'Paddy and poverty are known to go together,' हे खोटं ठरवण्यासाठी कोकणात नियोजनबद्ध सर्व पातळ्यांवर काम कराव लागेल.

 

लेखक प्रयोगशील शेतकरी व गुहागर ॲग्रो उद्योग समूहाचे संस्थापक आहेत.