Opinion

संपादकीय: मुख्यमंत्र्यांच्या प्रचंड प्रामाणिक भाषणात राजकारणाचा 'वर्ग' उघडा पडला!

आजच्या भाषणाबाबत एकनाथ शिंदे यांचे आपण सामान्य जनता म्हणून आभारच मानायला हवेत.

Credit : शुभम पाटील / इंडी जर्नल

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तणुकीचं प्रामाणिक दर्शन होतं. फरक इतकाच की बाहेर प्रचारसभेत दाखवायचा प्रामाणिकपणा त्यांनी सदनात दाखवला. 'प्रामाणिक' हा शब्द फार वेगळ्या अर्थानं इथं वापरतोय. 

शिंदेंनी केलेलं सगळ्यात महत्त्वाचं विधान माझ्या मते, 'शिवसेनेचा मुख्यमंत्री असून शिवसेनेला काय मिळालं?' हे होतं. शिवसेनेला काय मिळालं या प्रश्नामागं ही पद्धत होती, की ज्याची सत्ता येते, त्यानं सत्तेचा लाभ आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करवून द्यायचा असतो. हे आपल्याला सर्वानाच माहित असतं की असं होतं, सर्वांनाच ठाऊक असलेलं गुपित असतं हे, पण शिंदेनी प्रचंड प्रामाणिकपणे या व्यवस्थेचा पर्दाफाशच सदनाच्या पटलावर आज केला, त्याबद्दल त्यांचे आभार. 

सामान्य माणूस म्हणून आपण समजत असतो की लोकशाहीच्या नावानं चालणारी यंत्रणा ही आपण सामान्य 'लोकांच्या' हेतूनं चालते. मात्र तसं नसतं. हितसंबंधांचे आणि फायदा लाटण्याचे, संसाधनं बळकावण्याचे व्यापक गट, एक व्यापक जाळं असतं. हे लोक एकमेकांचे मित्र असतात, एकमेकांचे नातेवाईक असतात, स्नेही असतात, साडू असतात आणि त्याचवेळी त्याच्यातल्या अंतर्विरोधातून ते शत्रूही असतात. यालाच मार्क्सवादी विश्लेषक 'वर्ग' म्हणतात. याची कल्पना तुम्हाला इमारतीच्या मजल्यासारखी करता येईल. प्रत्येक मजल्यावर एकमेकांचे हितसंबंध गुंतलेले लोक राहतात. त्यांचं वर्गचरित्र आणि अनेकदा जातिचारित्रही एकजिनसी असतं. एकनाथ शिंदेनी आज याच राजकीय वर्गवारीचा मुखवटा फाडला आहे.

 

सामान्य माणूस म्हणून आपण समजत असतो की लोकशाहीच्या नावानं चालणारी यंत्रणा ही आपण सामान्य 'लोकांच्या' हेतूनं चालते.

 

हे वर्ग जनतेच्या पैशाची कशी 'विल्हेवाट' लावायची याबाबत अंतर्गत स्पर्धा करत असतात. या नेत्यांना सामन्यांचे काय प्रश्न मार्गी लागले, काय तडीस नेले गेले याची काहीही खंत नसते. त्यांचं दुःख होतं की त्यांच्या कार्यकर्त्याला एका फोनवर सोडवलं गेलं नाही. याचा अर्थ त्यांचे, म्हणजे सत्तेतल्या माणसाचे कार्यकर्ते एका वेगळ्या न्यायव्यवस्थेत असतात, जिथं फोनवर त्यांचा न्याय केला जातो, तुमच्या आमच्या सारख्यांसाठी ही व्यवस्था उपलब्ध नाही. हा फोन कोणत्याही राजकारण्याला देशातले १६ विचारवंत-कार्यकर्ते खटल्याविना महाराष्ट्राच्या तुरुंगात आहेत, तेव्हा करावा वाटला नाही, तो वाटणारही नाही. कंत्राटं वाटणं, निधी वाटणं, या सगळ्यातले अंतर्विरोध हाच त्यांच्या संघर्षांचा पाया आहे. हिंदुत्व वगैरे गोष्टी हा तसाच मुखवटा आहे, जो मुखवटा ते सेक्युलर किंवा पुरोगामी किंवा सभ्य वर्तणुकीचा होता आणि तो त्यांनी फाडला असा त्यांचा दावा किंवा वर्तन आहे. त्या अर्थानं काल राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी नरहरी झिरवाळ यांच्याबाबत बोलताना जितक्या सहजतेनं 'ते आदिवासी असूनही त्यांनी चांगलं काम केलं' असं म्हटलं, ती याचंच द्योतक आहे की मूलतः पक्षाचा फरक सोडला तर शिंदे ज्या नागर 'हिंदू' समजुतीचे वाहक आहेत पाटीलही त्याच विचारांचे वाहक आहेत. 

 

 

दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे खरंच सामान्य माणसांचा आवाज आहेत. त्यांच्यावर रिक्षावाला, त्यांच्यातील काहींना टपरीवाला, हातभट्टीवाला म्हणणं ही अत्यंत वर्गवर्चस्ववादी विचारांचं प्रतीक आहे. एकीकडं उद्धव ठाकरे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, यांच्याभोवती जे सभ्यता, शिस्त, शिष्टाचार यांचं वलय असतं, त्यांची भाषा, स्वतःला कॅरी करण्याची पद्धत असते, ती 'घरंदाज' आणि त्या अर्थानं वडिलोपार्जित असते. राहुल गांधींची जी समस्या आहे, तीच या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पिढीतल्या राजकीय व्यक्तिमत्वांची आहे. उद्धव ठाकरे एकलकोंडे, आपल्या कम्फर्टमध्ये असणाऱ्या स्वभावाचे आहेत यात त्यांची काहीच चूक नाही पण त्यांना तसे असूनही राजकारण करता येतं हे त्यांचं प्रिव्हिलेज आहे. शिंदेंसारखे अनेक असतात ज्यांना तो प्रिव्हिलेज नसतो, त्यांना मतदारसंघ पिंजून काढत उभा करावा लागतो आणि त्या अर्थानं ते लोकप्रतिनिधी असतातच. पण ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून ते बरोबर असतीलच असंही नाही...हा या राजकारणातला द्वंद्वाचा भाग आहे...

काँग्रेस विरोधात, किंवा एकूण 'पुरोगामी' विरोधकांबाबत अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाची झाली, तशीच एस्टॅब्लिशमेंटची मांडणी करण्यात संघ आणि भाजप यशस्वी झालेले आहेत. काँग्रेस श्रीमंत-घरंदाज-वर्चस्ववादी-घराण्यांपुरती मर्यादित आहे आणि ती इथल्या उच्च्भ्रू व्यवस्थेचं जी सामान्यांच्या पोहोचेबाहेर आहे, हे जनमानसात रुजवण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणात आधीपासून, व्हीव्हीआयपी कल्चर, लुटयेन्स दिल्ली, घराणेशाही असं नॅरेटिव्ह वारंवार वापरलेलं दिसतं. त्यामुळं आम्ही, म्हणजे भाजप, हे कधीच सत्तेची संधी न मिळालेल्या सामान्यांचे प्रतिनिधी आहोत, ज्यांना सत्ता संस्कृती माहित नसली तरी इरादा नेक आहे, हे सुद्धा भाजपचं पोझिशनिंग रुजलं आहे.

अशा वेळी, राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि आता अंशतः उद्धव हे लाडावलेले राजकुमार आहेत आणि मोदी, एकनाथ शिंदे, हे मेहनतीने वर आलेले सामान्यजन आहेत, हा लोकांचा दृष्टिकोन बनतो. सिनेमाप्रमाणेच, मेहनती हिरो, आयतखोर व्हिलनला हरवतो, हीच आदर्श कथा असते आणि राहुल गांधींनी किंवा इतर राजकीय घराण्यातील नेत्यांनी कितीही काही मांडणी केली, तरी ते हरावेत, त्यांचा पराभव व्हावा, यात एक सुप्त किंवा उघड आनंद 'मी सामान्य माणूस आहे' असं वाटणाऱ्या प्रत्येकाला मिळतो. मोदींनी संसदेत एकदा राहुल गांधींच्या तडाखेबाज भाषणाच्या उत्तरात केलेल्या भाषणात तेच केलं होतं, 'आप साहेबझादे है, मैं आपको आंख कैसे दिखा सकता हूँ?', म्हणत त्यांनी स्वतःचं 'आऊटसायडर' पोझिशनिंग अधोरेखित केलं, आणि तिथंच अर्धी चर्चा संपली. आम्ही बाहेरचे आहोत, सामान्य आहोत, आम्हाला सत्तेची सवय होऊ दिली नाही, म्हणून आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि म्हणून आम्हाला आणखी संधी दिली पाहिजे, हा मेसेज त्यांनी दिला.

 

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे हे इथल्या एस्टॅब्लिशमेंटच्या 'संस्कारित परात्मतेची' प्रतीकं बनली आहेत.

 

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे हे इथल्या एस्टॅब्लिशमेंटच्या 'संस्कारित परात्मतेची' प्रतीकं बनली आहेत. त्यांच्या भाषणात त्यांनी दाखवलेली सौम्यता, सभ्यता आणि डेकोरम वगैरे हे फक्त काही लोकांच्या लोकशाहीच्या अभिजनवादी संकल्पनेला रचतात, मात्र 'सामान्य' माणसाला मोदींचा 'असभ्य' 'रांगडे'पणा, ते खोटं, नाटकी आहे हे माहित असून सुद्धा आपलं वाटतं. हा सौंदर्यशास्त्राचा लढा आहे एका अर्थानं, आणि विरोधकांना हे अजूनतरी उमजलेलं नाहीये असं वाटतं.

यातली मेख ही की एकीकडे एकनाथ शिंदे सामान्य व्यक्ती आहेत, जे मुख्यमंत्री झालेत, हा सामाजिक न्यायाचा भाग असू शकतो, मात्र त्यांनी ज्या राजकीय 'महाशक्ती' सोबत हातमिळवणी केली आहे, त्या महाशक्तीच्या धोरणांबाबत, त्यांच्या कथित हिंदुत्वाच्या परिणामांबाबत ते स्पष्ट काहीच सांगत नाहीयेत. हिंदुत्वाचा प्रत्यक्ष अर्थ काय? त्याचा त्यांच्यासारख्याच सामान्य घरातल्या माणसांवर काय परिणाम होणार आहे? त्यांच्या महाशक्तीची आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरची आर्थिक धोरणं काय? याची उत्तरं स्वतः शिंदेनाही ठाऊक नसतील किंवा असली तरी मग त्यांची त्यांना मूक संमती असेल आणि त्या अर्थानं ते सामान्य असूनही त्याच अभिजन वर्गाचे वाटेकरी आहेत ज्याचा ते विरोध केल्याचा दावा करत आहेत. हे द्वंद्व सामान्य माणसानं समजून घ्यायला हवं, की फक्त प्रतिनिधित्व ही अर्धीच लढाई ठरते, प्रतिनिधित्वाच्या मागचं राजकारण जेव्हा सामाजिक न्यायाचं होईल, तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय झाला असं म्हणता येईल.  

आजच्या भाषणाबाबत एकनाथ शिंदे यांचे आपण सामान्य जनता म्हणून आभारच मानायला हवेत, की किमान सरकार आणि इथली 'लोकशाही' यांचा प्रामाणिक मूळ उद्देश त्यांनी लोकांसमोर मांडला. सामान्य माणसाच्या यामुळं हे लक्षात येईल की त्याचा वर्ग हीच त्याची खरी ओळख आहे. त्याच्या मुलांना कोणी फोनवर काही कोटींचं कंत्राट देणार नाहीये आणि ना कोणत्या गुन्ह्यातून फोनवर कोणी सोडायला येणार आहे. शिंदे साहेब 'आपल्यातले' असले तरी त्यांनी वर जाण्याची शिढी चढून झालेली आहे. त्यांनी तसं म्हटलं देखील की भाजप आणि त्यांच्यासोबत आलेल्या बंडखोर आमदारांचा निधीचा बॅकलॉग ते भरून काढणार आहेत. ते त्यांच्या वर्गाचे हितसंबंध जपणार आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळं सामान्यांना आपले वर्गीय हितसंबंध ओळखायची ही निकडीची वेळ आणि संधी आहे, असंच म्हणायला हवं.