India

आक्रमक दिल्ली पोलिसांच्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, अनेक जखमी

ट्रॅक्टर चालवत निघालेल्या या शेतकऱ्याचा मृत्यू ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातामुळे झाला असल्याचा पोलीसांचा दावा आहे.

Credit : Caravan Magazine

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत कूच करायला निघलेल्या या शेतकऱ्यांवर लाठी आणि अश्रूधूरांचा वापरही पोलिसांकडून केला जातोय. प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांनी आयोजित केलेल्या या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले आहेत. सिंघू, टिकली, चिल्ला आणि गाझियापूर या दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर्स घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. 

ट्रॅक्टर चालवत निघालेल्या या शेतकऱ्याचा मृत्यू ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातामुळे झाला असल्याचा पोलीसांचा दावा आहे. मात्र, पोलीसांनी गोळीबारात जखमी झाल्यानंच सदरील शेतकऱ्यांचा वाहनावरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी हा मृतदेह रूग्णवाहिकेच्या ताब्यात देण्यास नकार दिला असून डॉक्टर्स शवविच्छेदन अहवालात मोडतोड करून पोलीसांना क्लीन चीट देतील, असा आक्षेप शेतकरी आंदोलकांनी घेतलाय. 

काही मोजके शेतकरी ठरलेला मार्ग सोडून आयटीओ आणि लाल किल्ल्याकडे गेले असले तरी मी संख्या फारच कमी आहे. बहुतांश शेतकरी परवानगी मिळालेल्या मार्गांवरूनंच शांततापूर्ण पद्धतीनं मार्गक्रमण करत आहेत. दुसऱ्या मार्गांवरून निघालूल्या बाकीच्या मोजक्या शेतकऱ्यांशी बोलून ठरलेल्या मार्गांवरूनंच रॅली जाईल, याची आम्ही खातरजमा करू. "ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रूधूर सोडणाऱ्या पोलीसांना आपुलकीचं सांगणं आहे की, 'तुम्हीही आमचीच लेकरं आहात. मोदी-शहाचे गुलाम नव्हे. त्यामुळे आपल्याच लोकांवर बळ वापरण्याऐवजी पोलीसांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावं," गाझियापूर सीमेवरील एका शेतकऱ्यानं द वायरला दिलेली ही प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. 

प्रजासत्ताक दिनाची राजपथावरील परेड पार पडल्यानंतरंच पोलिसांनी शेतकऱ्यांच्या या ट्रक्टर रॅलीला परवानगी दिली होती. काही आंदोलकांनी ठरलेल्या मार्गाचा अवलंब न करता घुसखोरी केल्याचा आरोप करत पोलीसांकडून शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आला. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ही रॅली रोखण्यासाठी पोलीसांनी आखलेले बॅरिकेड्स तोडून आगेकूच केली. लाल किल्ला परिसरात पोहचलेल्या या शेतकऱ्यांनी किल्ल्यावर झळकणाऱ्या तिरंग्यासोबतंच शीख धर्मियांचा आणि शेतकरी आंदोलनाचं चिन्ह बनलेल्या 'निशाण साहेब' हा ध्वजही लाल किल्ल्यावर फडकावला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज हटवून हा निशाण साहेब ध्वज बसवल्याचा खोटा अपप्रचार काही माध्यमं करत असून प्रत्यक्षात तिरंग्याला धक्काही न लावताच त्याच्या बाजूला या शेतकऱ्यांनी तिरंग्यासोबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं प्रतिक बनलेला हा ध्वज फडकावला. शिवाय आंदोलनकर्ते शेतकरीच हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर गीत गात दिल्लीकडं कूच करत असल्याचं चित्र आहे.