India

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप करतंय घोडेबाजाराचा प्रयत्न : ओमर अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा आरोप.

Credit : The Week

जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास प्राधिकरणाच्या निवडणुकांचा परवाच निकाल लागला. जम्मू काश्मीरचा, विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पार पडलेली ही पहिलीच निवडणूक होती. निवडणुकांचा निकाल लागण्याअगोदरपासून जम्मू काश्मीरमधील गुपकार युतीच्या काही नेत्यांना प्रशासनानं प्रतिबंधात्मक कारवाईअतंर्गत अटक केली. "प्रशासनानं ही अटक भाजप नेत्यांच्या आदेशांवरून केली असून भाजप आता घोडेबाजार करतंय. गुपकार युतीच्या निवडून आलेल्या उमेदवारांना साम-दाम-दंड-भेद मार्गानं विकत घेत आहे," असा आरोप नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

"जम्मू काश्मीरच्या जनतेनं भाजपला नाकारलं आहे. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी भाजपनं केलेला लोकशाहीचा खून लोक विसरले नाहीत. त्यांनी भाजपला नाकारलं, भाजपला स्वबळावर जिंकता आलं नाही, त्यामुळेच भाजप आता गुपकार युतीचे उमेदवार फोडत आहे," असं अब्दुल्लांनी निकालानंतर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं आहे.

 

 

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत तिथल्या जनतेनं गुपकार युतीच्या बाजूनं कौल दिला असून जम्मूमध्ये भाजप तर काश्मीरमध्ये गुपकार युती आघाडीवर आहे. एकूण २८० मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली होती. त्यात, काश्मीर खोऱ्यात गुपकार युतीला ७२ जागांवर विजय मिळाला आहे. खोऱ्यातल्या एकाही जिल्ह्यात भाजपला यश मिळवता आलेलं नाही. जम्मूमध्ये मात्र भाजपनं ६ जिल्ह्यांत आघाडी घेतलेली आहे तर उर्वरित चार जिल्ह्यात गुपकार युतीला यश मिळालं आहे. गुपकार युतीला एकूण ११० जागा मिळाल्या असून भाजपला ७५ जागा मिळाल्या आहेत, तर इतर मतदारसंघ कॉंग्रेससह अपक्ष उमेदवारांनी जिंकले आहेत. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह तिथल्या आणखी काही स्थानिक पक्षांनी मिळून गुपकार युती तयार केलेली आहे.भाजपेतर सात पक्षांच्या या युतीनं एकदाही या निवडणुकांसाठी प्रचार केला नाही. तरीही जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वासाठी गुपकार युतीला पसंती दिली आहे.