Quick Reads
नाटक परिचय: आईन्स्टाईन वर काही टिपणे
अतिशय कमी साधने वापरून गॅब्रिएल इमॅन्युएलने आईन्स्टाईनचे व्यक्तिमत्त्व पकडले आहे.
प्रत्यय निर्मित आईन्स्टाईन- सापेक्षता सांगणारा माणूस या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग २ जुलै रोजी कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. त्यावेळी प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतील लेख.
जॉन पोलान्यी | अनुवाद: शरद नावरे | शास्त्रज्ञ म्हणून आईन्स्टाईनने एवढी उंची गाठली होती, की मागे वळून पाहता तीनशे वर्षांपूर्वीचा आयझॅक न्यूटन कुणीही मध्ये न येता सरळ त्याला दिसला असता. अशा मनुष्याचे जीवन खरे तर जर त्याने प्रूस्टप्रमाणे आपल्या या अभ्यासिकेच्या सर्जनात्मक एकांतात काढले असते. पण ज्या वैज्ञानिक क्रांतीला आईन्स्टाईनने मोठा हातभार लावला, ती युरोपात अशा काळी अवतरत होती की युरोपला वारंवार येणाऱ्या वेडाच्या झटक्यापैकी एका झटक्याच्या प्रभावाखाली युरोप होते. आइन्स्टाईनचे आयुष्य त्यामुळे केवळ एका प्रतिभासंपन्न मनुष्याचे जीवन नव्हते, तर मानवी संस्कृतीमधील एका उलथापालथीच्या काळात एका नव्या जगाच्या पहाटेमध्ये जिचा शेवट होता, अशी ती काळरात्रदेखील होती.
आपला एकविसावा वाढदिवस त्याने एकोणिसशे साली साजरा केला. त्यावेळी न्यूटनला ग्रहण लावू शकेल त्या झाडांचे चिन्ह त्याच्या आयुष्यात अजिबात दिसत नव्हते. त्याची तत्कालीन आणि तातडीची गरज होती ती एखादी नोकरी मिळवायची. त्याच वर्षी त्याने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदवी मिळवली होती. त्याला मार्क चांगले होते, मात्र शिक्षकांच्या मनात त्याची प्रतिमा होती ती त्याच्या गोंधळल्या रूपाची. आजच्याप्रमाणे त्या काळीदेखील विद्यापीठे अत्यंत प्रतिभावान लोकांच्या साठी पोषक असे वातावरण निर्माण करणारी नव्हती. किंबहुना अशा लोकांना सहन करणारी देखील नव्हती. दुसऱ्या बाजूला त्या काळी किंवा सद्यकालीन प्रतिभावंतांना देखील विद्यापीठाचे प्रत्येक बाबतीत नाक खुपसणे सहन होणारे नव्हते.
आज आपण आईन्स्टाईनच्या दिसण्याची सांगड या जगातील किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करण्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाशी घालतो. अर्थात असे करण्याने आपण सत्याच्या जवळ जातो हेही खरेच आहे, पण त्यात पारलौकिक संतापेक्षा देखील आपल्या अवताराविषयीची त्याची बेपर्वाई विशेष करून दिसून येते, आणि त्याच्या भावी नोकरी दात्यांना हा पैलू ताबडतोब नजरेत भरून खटकत असे. हा माणूस नियमांच्या चौकटीची परवा करणार नाही तो त्रासदायक ठरणार आहे अशा पद्धतीचे त्यांचे आडाखे चुकीचे नव्हते.
हा माणूस नियमांच्या चौकटीची परवा करणार नाही तो त्रासदायक ठरणार आहे अशा पद्धतीचे त्यांचे आडाखे चुकीचे नव्हते.
आयुष्यातील सहा वर्षे म्युनिकच्या हायस्कूलमध्ये काढली होती आणि शिस्तीबद्दल त्याच्या मनात कायमची अढी बसली होती. विशिष्ट चाकोरीतून विचार करण्याच्या हडेलहप्पीचा संबंध त्याने आपल्या शाळेतील शिस्तीच्या आग्रहाशी लावला होता. जिथे त्याच्या पूर्वजांनी अनेक शतके वास्तव्य केले होते त्या जर्मनीबद्दल त्याच्या मनात तीव्र नावड निर्माण झाली होती. त्याच्या वडीलांच्या इंजिनियरिंग वर्कशॉपच्या वारंवार निघणाऱ्या दिवाळ्या मुळे त्याच्या कुटुंबियांनी म्युनिक सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्याच्या शाळेने त्याने काही सांगण्यापूर्वीच, तातडीने त्याला शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तुझे वर्गात असणे त्रासदायक आहे आणि इतर विद्यार्थ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो या शब्दांमध्ये शाळेने ते व्यक्तही केले होते. त्यानंतर लगेचच आपल्या सरळमार्गी आई-वडीलांच्या मागे जर्मन राष्ट्रीयत्व झुगारून देण्याची परवानगी देण्यासाठी त्याने टुमणे लावले. त्यावेळी तो अवघा सोळा वर्षाचा होता. त्यानंतर पाच वर्षे त्याला राष्ट्रीयत्व नव्हते. १९९० सालामध्ये त्याला स्वीस डिप्लोमा आणि राष्ट्रीयत्व मिळाले. विद्यापीठातील जागा मिळवण्यासाठी त्याला आणखी नऊ वर्षे थांबावे लागले. यातील बराचसा काळ त्याने बर्न येथील स्वीस पेटंट ऑफिसात एक दुय्यम क्लार्क म्हणून काढला. दिवसभराचे काम संपल्यानंतर तो घरी जाऊन विद्यापीठात असताना त्याच्या मनात ज्या बीज रुपात पडल्या होत्या, विशेषतः रेण्वीक गतिशास्त्राबद्दल, उत्सर्जित ऊर्जेच्या स्वरुपाबद्दल आणि स्थलकालाच्या गुणधर्माबद्दल तो विचार करीत असे. हे सगळे विज्ञानविषय महाकाय व्याप्तीचे होते. एखाद्या गणिती मनुष्याने एका नंतर दुसऱ्या गणिती सूत्राकडे उड्या मारत शेवटी काही तरी धक्कादायक निष्कर्ष काढणे, एवढ्या पुरते मर्यादित नव्हते अशा पद्धतीने केवळ किरकोळ संशोधन तेवढे करता येते. त्याने निवडलेले विज्ञान विषय यपेक्षा खूप जास्तीची मागणी करणारे होते. मूलभूत गणिती कौशल्याबरोबरच एका अंतर्विरोधपूर्ण गोष्टीची मागणी करणारे- एकाच वेळी गगनभरारी घेऊ पहाणारी प्रतिभा आणि शिस्तपूर्ण कल्पना शक्ती, एकाच वेळी अधिक कल्पनारम्यतेचे मायाजाल विणणे- एकदा नाही, अनेकदा- आणि जेव्हा त्यावर मूलगामी गंभीर टीका होते, त्यावेळी त्या निसरड्या वस्त्राला घट्ट धरून ठेवणे, ही केवळ अलौकिक प्रतिभावंतालाच जमणारी गोष्ट आहे.
असंही म्हटलं जातं की म्युनिकच्या प्रशियन पद्धतीच्या शाळेच्या शिस्तीचा त्याला जो मनापासून तिटकारा होता त्यामध्ये त्याच्या रुढ पदार्थ विज्ञानाच्या संकल्पनांना आव्हान देणाऱ्या बंडखोरपणाची देखील बीजे होती. पण आपण निःपक्षपातीपणे विश्लेषण करायचे ठरवले, तर याच शिस्तीमध्ये आईन्स्टाईनने अंगीकारलेल्या अतिशय पद्धतशीर निर्धाराचा देखील उगम सापडतो. त्याला चिकाटीने काम करत राहण्याची जिद्द, येणाऱ्या अपयशाने खचून न जाता थकून जातात यशोमंदिराचे शिखर गाठण्याची जिद्ददेखील दिली
आईन्स्टाईन ने आमंत्रित केलेल्या एका पाहुण्याने त्यांच्या भेटीचे वर्णन केले आहे:
तो त्याच्या अभ्यासिकेत समोर गणिती समीकरणांच्या ढीगभर अस्ताव्यस्त कागदांचा गठ्ठा घेऊन बसला होता. उजव्या हाताने लिहिणे आणि डाव्या हातात कडेवर त्याचे लहान मूल घेतलेले, अशा प्रकारे त्याचे काम चालू होते. त्याच वेळी थोरल्या चरण जिवाच्या प्रश्नांना उत्तरे देणे हे देखील सुरू होते ते थोरले चिरंजीव बरोबर खेळत होते मला त्याने एक मिनिट मी संपवतो माझं काम असे म्हणून माझ्याकडे हातातले मूळ सोपवले आणि तो पुन्हा आपल्या कामाकडे वळला.
१९०५ साली वयाच्या विसाव्या वर्षी आईन्स्टाईनने अनालेन डेर फिजिक या जर्मन जनरल मध्ये पाच पेपर्स पब्लिश केले. (ही प्रत आता संग्राहकांची दुर्मिळ वस्तू बनली असून तिची किंमत हजारो डॉलर्स मध्ये आहे.) या पेपर्समध्ये अतिशय महत्त्वाच्या नव्या सिद्धांतांची मांडणी आहे. रात्रीच्या काळोखात विस्तीर्ण अनोळखी भू प्रदेश रॉकेटमधून टाकलेल्या प्रकाशाने उजळून निघावा अशा शब्दांमध्ये या पेपरचे वर्णन नंतर लुई डिव्रगॉइल या नोबेल प्राप्त शास्त्रज्ञाने केली आहे. न्यूटनने अगदी कमी कालावधीत कॅल्क्युलस या गणित शाखेचा शोध, शुभ्र प्रकाशात लपलेले सप्त रंग आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम एका पाठोपाठ एक शोधून काढले, त्या तऱ्हेने उजळून टाकणारे प्रकाशनर्तन विज्ञान विश्वाने त्यानंतर अनुभवले नव्हते. काही वर्षातच अजूनही पेटंट ऑफिस मध्ये अडकून पडलेल्या आईन्स्टाईनचे वर्णन विसाव्या शतकातील कोपर्निकस असे (मॅक्स प्लॅंकने १९१० साली लिहिलेल्या एका पत्रातील वर्णन) संवेदनशील शास्त्रज्ञ करू लागले.
विशिष्ट सापेक्षतेवरील पेपरमध्ये आईन्स्टाईनने म्हटले होते- काल आणि स्थल, ज्यांना विज्ञानाच्या अगदी प्रारंभापासून केवल, आणि आपण राहत असलेल्या जगाचे अपरिवर्तनीय पैलू मानले गेले आहे, या वस्तुत: निरीक्षकाच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या सापेक्ष गोष्टी आहेत. केवळ एकच गोष्ट अविकारी आहे, ती म्हणजे प्रकाशगती. ही सर्वत्र अविकारी असल्याचे आढळून येते इतकी की तिच्या किंचित देखील बदल घडवण्याच्या प्रयत्नाने (उदा. अतिशय वेगवान रॉकेट वर एखादा प्रकाश दीप लावणे) याने प्रकाशगती कणभर देखील बदलत नाही. अशा प्रकारच्या असाधारण विचार प्रक्रियेतून त्याच्या ध्यानात येत गेले की ऊर्जा आणि मह यांचा अगदी सोपा संबंध असायला हवा. प्रचंड ऊर्जेने जाणाऱ्या वस्तूंच्या महा मध्ये सूक्ष्म असा फरक पडतो, आणि उलट दिशेने पाहता छोट्याशा महाचे रूपांतर अति प्रचंड ऊर्जा निर्मिती करू शकते.
अशा गोष्टी, ज्या सामान्य व्यवहारज्ञान पचवू शकत नाही, खऱ्या असतील कशावरून?
अशा गोष्टी, ज्या सामान्य व्यवहारज्ञान पचवू शकत नाही, खऱ्या असतील कशावरून? जर समजा असतीलच खऱ्या, तर अनेक शतकांच्या मानवी प्रवासात त्या लक्षात कशा आल्या नाहीत? याचे उत्तर असे, की सामान्य ज्ञान सामान्य व्यवहारातील अनुभवांवर आधारलेले असते. या अनुभवांची कक्षा एकूणतेचा विचार केला तर, अतिशय मर्यादित आहे. मात्र सामान्य अनुभूतींची कक्षा निरंतर वाढते आहे. आज आपण रेडिओच्या साह्याने हजारो मैलांवरचे ऐकू शकतो. आपल्यापैकी काहींनी बाह्य अवकाशात वजनरहित अवस्थेत तरंगण्याचा अनुभव घेतला आहे. काहींनी कशा प्रकारे महा चे परिवर्तन ऊर्जेत होते, याचे प्रत्यंतर अणुऊर्जा प्रकल्पातून अथवा अणुबॉंब स्फोटातून घेतले आहे. आपण अशा काळाची कल्पना करू शकतो की जिथे स्थिर घड्याळांच्या सापेक्ष गतिमान घड्याळे किंचित संथपणे काम करत असतील. या सगळ्या विशिष्ट सापेक्षतेच्या कक्षेत येणाऱ्या गोष्टी आहेत. १९०५ मध्ये या भाकितांची थापा म्हणून संभावना केली गेली. (आईन्स्टाईन हा एक नंबरचा थापाड्या आणि ठकसेनांचा बादशहा आहे -लेनार्ड). या सगळ्या गोष्टी सामान्य अनुभवाच्या कक्षेत आल्या आहेत. मानवी प्रतिभेच्या क्षितिज रेषेवरील प्राक्कथने असे आज त्यांचे स्थान आहे.
काही वर्षांनंतर एका मित्राला लिहिलेल्या पत्रात आईन्स्टाईन म्हणतो की एकाच निरीक्षकाकडे दोन घड्याळे असणे, ही गोष्ट देखील त्याच्या कल्पनाशक्तीला ताण देणारी होती! अजूनही त्याची जीविका पेटंट ऑफिसमधल्या तुटपुंज्या पगारावर चालली होती. अर्थात त्याची बढती तृतीय श्रेणीचा तांत्रिक तज्ञ या पदावरून द्वितीय श्रेणीचा तांत्रिक तज्ञ या पदावर झाली होती. आधुनिक कोपरनिकसला अजूनही विद्यापीठातील एखाद्या नोकरीची आस होती. झुरिच विद्यापीठातून १९०८ साली सैद्धांतिक पदार्थ विज्ञानाची एक जागा भरायची होती, आणि त्यासाठी आईन्स्टाईन एक अतिशय तगडा उमेदवार होता. पण राजकीय कारणावरून ती जागा फ्रिडरिख ॲडलरला देऊ केली गेली. ॲडलरने या देकाराचे उत्तर खालीलप्रमाणे दिले:
जर आईन्स्टाईन सारखा मनुष्य मिळवणे एखाद्या विद्यापीठाला शक्य असेल, तर तिथे मला नियुक्ती देणे हास्यास्पद ठरेल. आईन्स्टाईनशी तुलना करता संशोधन करण्याची माझी पात्रता कणभर देखील नाही. अशा एखाद्या मनुष्याला नेमण्याची संधी, ज्याच्यामुळे विद्यापीठाची पातळी कैक पटीने उंचावून आपल्या सगळ्यांनाच लाभ होणार असेल, तर केवळ राजकीय कारणावरून ही संधी गमावणे चुकीचे ठरेल…
आज सर्वत्र बोकाळलेली, राजकीय कारणामुळेच होणार्या सर्वच संस्थांतील खोगीरभरती पाहता इतिहासापासून कुणीच काही शिकायला तयार नाहीत, याची खात्री पटते.
ॲडलरने केले आहे त्या पद्धतीचे निवेदन केवळ असाधारण आहे. आईन्स्टाईनला तिथे नोकरी मिळाली. दोन वर्षानंतर तो प्रागच्या अधिक चांगल्या प्रकारे प्रस्थापित विद्यापीठात गेला. त्यावेळी प्राग ऑस्ट्रिया- हंगेरी साम्राज्यात मोडत होते. इथे देखील डॉक्टर जाऊमन बरोबरच्या स्पर्धेत तो कदाचित दाबला गेला असता. जाऊमनच्या कानावर त्याच्या उमेदवारीला काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे गेले, त्या वेळी त्याने स्वत:हून आपली उमेदवारी मागे घेतली. मात्र त्यावेळी त्याने दिलेली कारणे ॲडलर पेक्षा वेगळी होती- ज्या विद्यापीठात आधुनिकतेचा पुरस्कार केला जातो, मात्र गुणवत्तेला महत्त्व दिले जात नाही- अशा विद्यापीठाशी मला काही देणे घेणे नाही...
प्राग मध्ये असताना आईन्स्टाईन गुरुत्वाकर्षणाच्या स्वरुपाबद्दल एका नव्या निष्कर्षाला आला. १९११ मध्ये त्याने सांगितले की सूर्यासारख्या अतिशय विराट वस्तू जवळून जाणाऱ्या प्रकाशकिरणांचा मार्ग वाकतो हे त्याच्या गुरुत्व सिद्धांतनापासून निघणारे एक भाकित आहे. त्याने ही मार्गच्युती किती असावी हे देखील सांगितले.
एखाद्या प्रतिभावंताचे संपूर्ण बहरणे ही क्वचितच लांबलचक आणि दीर्घ काळापर्यंत चालणारी गोष्ट असते. आईन्स्टाईनची सर्वतोपरी महान कामगिरी- सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत- हे आता व्यवस्थितपणे मार्गाला लागले होते. १९१४ साली त्याने आपल्या स्वत:च्या तिरस्कारापरोक्ष आपण बर्लिनला स्थलांतर केले. त्याचे कारण म्हणजे बर्लिन त्या काळी विज्ञानाचे जागतिक केंद्र होते. पेटंट ऑफिस मधल्या एकांतातल्या वातावरणात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर देखील आपल्याला एका सर्वोत्तम वैज्ञानिक भवतालाची गरज आहे हे आईन्स्टाईनने जाणावे, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
बर्लिनला आल्यानंतर १९१५ च्या नोव्हेंबरात सामान्य सापेक्षतेचा सिद्धांतनाची पायाभरणी (The Foundation of General Theory of Relativity) हा आपला पेपर संपवला. या पेपर मध्ये त्याने आपल्या एका दशकापूर्वीच्या स्थल आणि कालाबद्दलच्या मांडणीचा विस्तार केला. युक्लिडने सांगितलेल्या, आणि न्यूटनने वापरलेल्या भूमितीशी वास्तविक स्थलाचे गुणधर्म जुळत नाहीत, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वक्र स्थळासाठी वापरली जाणारी भूमिती त्यासाठी आवश्यक आहे. त्याच्या सिद्धांतनाप्रमाणे अशा पृष्ठभागाची वक्रता, विशेषतः विराट वस्तुमानाच्या आकाशस्थ गोलकांच्या भोवताली वापरणे भाग असते. परिणामी अशा वस्तूंच्या जवळून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग वाकल्याचे जाणवते.
हे खूपच अमूर्त अशा प्रकारचे विज्ञान-द्रव्य होते. पुढे कित्येक वर्षापर्यंत ते तसेच राहणार होते. मॅक्स बॉर्नने म्हटल-त्या काळी मला वाटले, अजूनही वाटते, की मनुष्याने निसर्गाबद्दल जो विचार केल, हे सिद्धांतन म्हणजे त्याचा कळसाध्याय म्हणावा लागेल. तत्त्वज्ञानात्मक कुशाग्रता, पदार्थविज्ञानाबद्दलची साक्षात्कारी जाणीव आणि गणिती कौशल्य याचा हा दुर्मिळ मिलाफ होता. पण अर्थात प्रत्यक्ष अनुभवाशी त्याची जोड अतिशय अल्प म्हणावी लागेल.
१९१९ मधील घटनांनी हे चित्र पालटले. काही तारकांपासून ग्रहण काळात सूर्यानजीकच्या स्थलाजवळून येणाऱ्या प्रकाशकिरणांची वक्रता मोजण्यासाठी एक ब्रिटिश मोहिम आंखण्यात आली. ग्रहणकालातील ढगांनी आच्छादलेल्या सूर्याजवळच्या ताऱ्यांचे सहा फोटोग्राफ्स ढग दूर होताच यशस्वीपणे काढले गेले. प्रकाश नुसता वाकला नव्हता तर आईन्स्टाईनने सांगितलेल्या प्रमाणात वाकला होता. दूर होणार्या मेघांनी बाजूला होऊन जणू एका नव्या विश्वाचे दर्शन घडवले होते.
अर्थात हे विश्व आइंस्टाईनसाठी नवे नव्हते.
अर्थात हे विश्व आइंस्टाईनसाठी नवे नव्हते. आपले सिद्धांत अचूक असल्याची त्याची मनोमन खात्री होती १९१४ मध्ये त्याने लिहून ठेवले होते की माझ्या एकूण सिद्धांताचे स्वरूप अचूक असल्या बद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. ग्रहण काळातील निरीक्षणे त्याचे समर्थन करो वा न करो. या गोष्टीचा अर्थ खूपच स्पष्ट आहे.
त्याच्यासाठी हे विश्व नव्हे नसेलही, पण वस्तुत: मात्र ते खरोखरी नवे होते. १९१९च्या नोव्हेंबरातील एका रात्रीत तो जगातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ बनला. -अत्यंत तेजस्वी तारा! वर्षभरात सापेक्षतेवर शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. अजूनही अधिनायक वृत्तीने विज्ञानातील एकाहून एका किचकट विषयांना तो हात घालणार होताच. पण त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम सर्जनशील वर्षे संपत आली होती. याची अनेक कारणे सांगता येतील. पहिली गोष्ट म्हणजे विसाव्या शतकातील पदार्थविज्ञानाचा डोलारा ज्या गणितावर आधारला होता त्याचे भांडार आता संपुष्टात आले होते. आता नव्या यशासाठी त्यात नवा माल भरणे आवश्यक बनले होते. १९१९ नोव्हेंबर नंतर त्याच्यावर एका बाजूला अतिप्रशंसा आणि दुसऱ्या बाजूला बदनामी, याचा भडिमार सुरू झाला होता. त्याची सदसद्विवेकबुद्धी (जिचा त्याच्याकडे फार मोठा साठा होता) आणि त्याचे राजकीय कौशल्य (जे त्याच्याकडे फारच कमी प्रमाणात होते), या गोष्टींना सतत आव्हान देण्यात येत होते. इतिहासातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ, सर्वश्रेष्ठ जर्मन शास्त्रज्ञ, सर्वश्रेष्ठ ज्यू शास्त्रज्ञ, सर्वश्रेष्ठ अमेरिकन शास्त्रज्ञ अशी अनेक बिरुदे त्याला देण्यात आली होती, आणि त्याच वेळी या लोकांचीच कडवट टीका देखील त्याच्यावर होत होती. कदाचित फक्त स्वीस लोक त्याला अपवाद म्हणावे लागतील. आपले नाव आणि आपला आवाज त्याने शांतता, अणुबॉंब प्रकल्प, आंतरराष्ट्रीय शासन यासारख्या ध्येयासाठी द्यावे, म्हणून त्याला गळ घालण्यात येत होती. ज्या प्रमाणात तो तिला बळी पडायचा- आणि अर्थातच तत्कालीन विशिष्ट संदर्भात हे करणे त्याला भाग पडायचे- त्यातून देखील जाडजूड ग्रंथ निर्मिती होत असे.
गॅब्रिएल इमॅन्युएलने आपल्या छोट्याशा नाटकाच्या अवकाशात जे काही आहे त्याच्या संशोधनातून, मनोरंजक आणि त्याच वेळेला विचारप्रवर्तक नाटकात आईन्स्टाईनचे सफाईदार रेखाचित्र काढले आहे. अतिशय कमी साधने वापरून त्याने आईन्स्टाईनचे व्यक्तिमत्त्व पकडले आहे. हा एक थोर मनुष्य होता-खूप कुतुहल बाळगणारा आणि प्रेमळ तरीही सदैव शंका ग्रस्त वैफल्य आणि अपयशाने कुरतडलेल्या इतर साध्या मनुष्य प्राण्यांप्रमाणेच.
नाटकाचे मूळ लेखक: गब्रीएल इमॅन्युएल
मराठी अनुवाद: डॉ. शरद नावरे
दिग्दर्शन आणि भूमिका: डॉ. शरद भुथाडिया
निर्मिती: प्रत्यय, कोल्हापूर