India

पाऊस क्वांरटाईन, राज्यात खरीप पेरणी लांबणीवर

पावसाच्या ओढीमुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडदासोबत भात लागवडीपुढं संकट ठाकलं आहे.

Credit : Agriculture Post

राकेश माळी: मृग नक्षत्राला सुरवात होऊन आठवडा उलटला, तरीही वरुणराजानं अद्याप समाधानकारक हजेरी राज्यात लावलेली नाही. त्यामुळे यंदा खरीप हंगाम लांबणीवर पडणार आहे. पावसाच्या ओढीमुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडदासोबत भात लागवडीपुढं संकट ठाकलं आहे. मॉन्सूनपूर्व पावसावर काही पेरण्या झाल्या आहेत. आता पावसानं दडी मारल्यानं जमिनीतील ओल कमी झाली आहे. परिणामी, आठवडाभरात ही पिकं वाया जाण्याचा धोका बळावला आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर भाताची रोपं टाकण्यास सुरवात केली आहे. प्रत्यक्षात अजूनही अनेक शेतकरी चांगल्या पावसाच्या हजेरीच्या प्रतीक्षेत आहेत. भातरोपांची पुनर्लागवड वेळेत न झाल्यास भाताच्या उत्पादनात घट होईल व त्याचे परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहेत.

 

पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात आभाळाकडे डोळे

राज्यातील कोरोना स्थितीत झपाट्यानं सुधार होत असल्यानं राज्य सरकार सुखावलं आहे. परंतु राज्याह पोट ज्यावर अवलंबून आहे ते शेती क्षेत्र अजूनही तहानलेलंच आहे. राज्याला पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. केरळमध्ये ३ जून रोजी मोसमी वारे दाखल झाले. या वा-यांनी अरबी समुद्रातून वेगानं प्रवास करत दोनच दिवसांत महाराष्ट्र गाठला. मात्र, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरण न मिळाल्यानं मोसमी वा-यांना फारशी प्रगती करता आली नाही. राज्यात मोसमी वारे पोहोचले खरे परंतु शेतक-यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला. पण पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात आभाळाकडे डोळे लागले आहेत. ब-याच ठिकाणी पाऊस येत असल्याची फक्त चाहूलच लागते.

 

पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरण न मिळाल्यानं मोसमी वा-यांना फारशी प्रगती करता आली नाही. राज्यात मोसमी वारे पोहोचले खरे परंतु शेतक-यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

 

परभणीतील युवा शेतकरी अनंता यादव इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले, "दरवर्षी घरची शेती असते.पण गेल्या वर्षी चांगला पाऊस आणि पीकही चांगलं आल्यानं, यावर्षी घरची काही व काही पैशानं शेती केली आहे. पण पावसानं पाठ फिरवली आहे. आतापर्यंत पेरणी होणं गरजेचं होतं. पण पाऊस नसल्यानं पेरा लवकर होत नाही, त्यामुळे पिकास येण्यास उशीर झाला तर ते पीक जोमदार येत नाही."

यादव पुढं म्हणाले की, "घरच्या शेतीत तरी नुकसान सहन केलं असतं. परंतु, पैशानं केलेल्या शेतीत जर नुकसान झालं तर घर बुडीत होण्याची वेळ येईल. आणि कर्जाचा डोंगर वाढत जाईल."

 

१५ जुलैपर्यंत पेरणीस वेळ; शेतकरी वेट अँड वॉच'च्‍या भूमिकेत

कृषी अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मका, सोयाबीन, बाजरी, तूर, कपाशीसाठी १५ जुलैपर्यंतचा वेळ शेतकऱ्यांकडे आहे. पण एक प्रश्‍न अनुत्तरित राहतो तो म्हणजे, या कालावधीत पेरण्यांना वेग येईल, असा पुरेसा पाऊस होईल काय? हवामान अभ्यासकांनी जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस धो धो होईल, असा अंदाज यापूर्वी वर्तवला आहे.

खरिपाच्या पूर्वी हवामान खात्यानं यंदाही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्यानं राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मशागतीची काम पूर्ण करीत विविध पिकांच्या लागवडीच्या दृष्टीनं आवश्यक ते नियोजन पूर्ण केलं. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसून पाऊस अक्षरशः क्वांरटाईन झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी 'वेट अँड वॉच'च्‍या भूमिकेत असून बी-बियाणं घेण्यासाठी पुढे धजावत नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

 

राज्यातील विभागनिहाय टँकरसंख्या 

 

जून संपत आला तरीही राज्यात काही ठिकाणी टँकर्स चालूच आहेत. राज्यातील विभागनिहाय टँकर संख्या.

 

सोर्स: पाणीपुरवठा विभाग

 

इकडे आड व तिकडे विहीर

जळगाव जिल्ह्यातील कजगावचे शेतकरी महेंद्र अजबसिंग पाटील म्हणाले, "चार एकर कापसाची लागवड केली असून पावसानं पाठ फिरवली आहे. विहिरीतील शिल्लक पाण्यावर दहा पंधरा मिनिटं पंप चालवून पिकाचं जतन केलं आहे. पण अजूनही पाऊस न पडल्यामुळे आता आता पीक जागवायचं कसं? हा प्रश्न आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही, तिथे पिकांना कसं द्यायचं? विहिरीत टँकर टाकून किती टाकणार? ते खिशाला परवडणारेही नाही. उभ्या पिकावर वखर फिरवून दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. वरूणराजा धावला तरंच पीक तरारी घेईल, नाहीतर शेतातल्या विहिरीतच जीव द्यावा लागेल."

पावसानं फक्त नावालाच हजेरी लावली आहे. बहुतांशी शेतकरी पेरणी योग्य पाऊस झाल्यावर पिकांची लागवड करण्यास प्राधान्य देतात. मात्र आता पावसानं जास्त ओढ दिली तर पेरणीची वेळ निघून जाण्याची शक्यता आहे. तसंच आता पेरणी केली आणि त्यानंतर पाऊस लांबला, तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे इकडे आड व तिकडे विहीर अशी विचित्र परिस्थिती निर्माण होत आहे.

भिकुबाई महाजन म्हणाल्या, "पाऊस येईल या आशेवर मका आणि भुईमुंगची लागवड केली आहे. सुरुवातीला  पाऊस आला पण आता आठ ते दहा दिवसापासून पावसानं दांडी मारली आहे. घरातील होतं नव्हतं ते सगळं शेतात टाकून झालं आहे. आमचं सगळं उठण बसणं शेतीवर असून जर दुबार पेरणीची वेळ आली तर पैसे आणायचे कुठून, हाच आमच्या समोर सर्वात मोठा प्रश्न आहे."