India
‘लव जिहाद’विरोधात बिहारमध्ये कायदा नाही : जदयू
दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रतिपादन.
बिहारमधल्या पटना इथं काल पार पडलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत जदयूनं ‘लव जिहाद’ विरोधात बिहारमध्ये कायदा करू दिला जाणार नाही, असं सुतोवाच केलं. भाजपशासित राज्यात झालेला असा कायदा धर्माच्या आधारावर लोकांमध्ये दुफळी निर्माण करतो, त्यामुळे बिहारमध्ये अशा धार्मिक विभाजन करणाऱ्या कायद्यांना स्थान नाही, असं यावेळी जदयूनं स्पष्ट केलं.
दरम्यान या सभेतच नीतीश कुमार यांनी जदयुच्या राष्ट्रीय प्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आर.सी.पी सिंग यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
या सभेत, अरुणाचल प्रदेशातील ऑपरेशन ‘लोटस’चीही सविस्तर चर्चा झाली. अरुणाचलमध्ये भाजपनं जनता दल युनायटेडचे सहा आमदार आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या पक्षाचा एक आमदार, अशा तब्बल सात आमदारांना फोडून स्वत:कडे वळवण्यात यश मिळवलंय. त्यामुळे या ‘ऑपरेशन लोटस’ वर जदयू नाराज आहे. या सात आमदारांमुळे अरुणाचल विधानसभेत भाजपचं पारडं आणखी जड झालं आहे, तर विरोधकांची संख्या १२ आमदारांवर येऊन ठेपली आहे. मात्र अरुणाचलमध्ये भाजपनं जदयूला पाडलेल्या खिंडारानं जदयूच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असली, तरी जदयूनं थेट भाजपवर निशाणा साधणं टाळलं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेनंतर नीतीश कुमार यांनी, पत्रकार परिषदेतही भाजपच्या या डावाबाबत पत्रकारांनी विचारलेले प्रश्न टाळले आहेत. नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री असल्याने आणि तिथली सत्ता टिकवण्यासाठी त्यांना भाजपसोबत राहणं अपरिहार्य असल्यानेच, ते भाजपविरोधात बोलणं टाळत आहेत. दरम्यान, ‘नीतीश कुमार यांची एनडीएसोबत कुंचबणा होत आहे. त्यामुळे ते (कुमार) अजूनही एनडीए सोडून राजदसोबत येण्याचा विचार करू शकतात,’ असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी म्हंटलं आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये जदयू आणि भाजप यांची युती नाही, पण बिहारमध्ये मात्र ती आहे. भाजपसारखा पक्ष विरोधी गोटातले नेते फोडण्यात माहीर आहे, परंतु त्याआधी तो आधी एनडीएच्या घटक पक्षांबरोबर संबंधित राज्यात सत्ता स्थापन करतो, या पक्षांच्या जीवावर तिथं आपला पक्ष मजबूत करतो आणि मग या घटक पक्षांनाच खिंडारं पाडतो. हीच निवडणुकांच्या राजकारणासाठी भाजपची रणनीती आहे, असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. आता ‘लव जिहाद’विरोधात कायदा करण्याच्या मुद्द्यावर नीतीश कुमारांच्या जदयूनं भूमिका घेतली आहे खरी, पण ती तडीस नेण्यात ते किती यशस्वी ठरतात, हे पाहणं महत्वाचं आहे. वेळ पडली तर या मुद्द्यावरून जदयू बिहारमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याची टोकाची भूमिका घेतं की, तसा बाका प्रसंग आल्यास भाजप बिहारमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ राबवतं, हे पाहणं रंजक असेल, नीतीश कुमार यांच्या जदयूची ही खरी कसोटी असेल.