Quick Reads

लॉकडाऊनमुळे येणार 'सेक्स'वर 'हे' निर्बंध? हे वाचून थक्क व्हाल!

धक्कादायक: मथळा पाहून तुम्ही लगेच क्लिक कराल!

Credit : Shutterstock

या आणि अशा शेकडो हेडलाईन्समधून तुम्हाला दिवसभर वेगवेगळ्या पोर्टल्स आणि वृत्तमाध्यमांच्या वेबसाईट्स क्लिक करण्यासाठी आकर्षित करत असतात. तुम्ही या तथाकथित 'बातम्यांवर क्लिक करता आणि या वेबसाईट्सना क्लिक मिळवून देता. जितके जास्त क्लिक, तितकी त्या वेबसाईटवर जाहिरातीमधून कमाई, तितकी या वेबसाईट्सची सोशियल मीडिया आणि गुगल सारख्या सर्च इंजिनवर अल्गोरिदम जास्त दखल घेतं. याच आकडेवारीचा वापर करून जास्तीत जास्त कचरा कोण पुरवेल याची स्पर्धा सुरु होते. 

क्लिकबेट समजून घ्यायचं असेल तर सोपं आहे. बातमीची हेडलाईन किंवा मथळा म्हणजे एखाद्या बस किंवा ट्रेन वर ती बस किंवा ट्रेन कुठं जाणार आहे याची पाटी आहे असं समजा. आता समजा तुम्हाला कोल्हापूरला जायचं असेल, तुमच्या घरची एखादी व्यक्ती आजारी आहे आणि तुम्हाला तिथं लगेच पोहोचणं गरजेचं आहे. तर तुम्ही ती बस किंवा ट्रेन घेता आणि मग आतमध्ये तुम्हाला कळतं की ही बस कोल्हापूरला जातच नाही तर भलतीकडेच जाते, तर तुम्हाला एका महत्त्वाच्या क्षणाला फसवलं गेलं असेल आणि तुम्हाला राग येणार की नाही? मग तुम्हाला चुकीच्या मथळ्यांचा वापर करून क्लिक करायला लावल्याचा राग का येत नाही? तुम्हाला अडचणीच्या क्षणी जेव्हा महत्त्वाची माहिती पोहोचायला हवी तेव्हा ती पोहोचली नाही तर तुमचं नुकसान तर होतंच आणि फसवणूकही. 

तर रोज रोज एप्रिल फुल होण्यापासून स्वतःल वाचवा. अशा मथळ्यांवर क्लिक करणं सोडा. महत्त्वाच्या बातम्यांवर आवर्जून क्लिक करा, शेअर करा आणि शक्य झाल्यास स्वाभिमानानं स्वतंत्र असलेल्या माध्यमांना आर्थिक मदत करा! 

 

#SayNoToClickBait #GiveUsNews