India

व्हॅक्सिन आल्यानंतरही कोरोनासोबतंच जगायला शिकणं भाग आहे - डब्ल्यू. एच. ओ.  

कोरोना महामारी हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा असून सर्व जगानं एकत्र येऊन पावलं उचलली नाहीत तर भविष्यातही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

Credit : File

कोरोनाविरूद्धची लढाई व्हॅक्सिन आल्यानंतरही सुरूच राहणार असून कोरोनासोबतंच जगायला शिकणं आता आपल्याला भाग आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं सोमवारी घेतलेल्या आपल्या यावर्षीच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे आता लस दृष्टीक्षेपात आल्यानंतर कोरोनाविषयी कसलीही भीती बाळगायचं कारण नाही, अशा पसरवल्या गेलेल्या भ्रमाचा भोपळा यानिमित्तानं फुटला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉक्टर मार्क रायन यांनी, "कोरोना विषाणूची जीवघेणी भीती बाळगण्याचं कारण नसलं तरी कमी प्रमाणात का ह़ोईना या विषाणूचा धोका व्हॅक्सिननंतरही कायमचं राहणार आहे," अशा इशारा या पत्रकार परिषदेत दिला. जागतिक आरोग्य संघटनेचे आणखी एक वैद्यकीय अधिकारी डेव्हीड हायमन यांनी हर्ड इम्युनिटी आणि व्हॅक्सिनबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला बाजूला ठेवत, विनाकारण फार आशावादी होत सगळंच पूर्ववत होईल असा फाजील आत्मविश्वास बाळगणं मूर्खपणाचं ठरणार असल्याचं सांगितलं‌. लसीच्या शोधामुळे आणि आरोग्य सुविधांवर भर देऊन आपल्याला प्राणहानी कमी करता येऊ शकेल. किंबहुना ती आपण करतंच आहोत. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या लसीच्या वापरानंतर कोरोनाचा कुठलाही धोकाच जगाला राहणार नाही, असा दावा करण्यासाठी कुठलाही सक्षम पुरावा आमच्याजवळ नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सोमवारी सांगितलं.

"कोरोना महामारी हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा असून सर्व जगानं एकत्र येऊन पावलं उचलली नाहीत तर भविष्यातही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते," हा धडा आपल्याला यातून मिळाला असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केलं. सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांनी एकत्र येऊन काम केलं तरच भविष्यातील आगामी संकटांचा सामना करता येईल. लस घेतल्यानं आपल्याला पुन्हा कोरोनाची लागण होणार नाही किंवा आपल्यामुळे कोणाला कोरोनाचा संसर्ग होणारंच नाही, असा दावा कोणीही करू शकत नाही. "कोरोना विषाणू सातत्यानं विकसित होत असून, होईल ती सर्व काळजी घेत या विषाणूसोबतंच जगण्याची सवय आपल्याला करून घेतली पाहिजे," असं सांगत स्वामीनाथन यांनी लस आल्यानंतरही सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याची सूचना यावेळी दिली.

इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्यानं विकसित आणि अधिक धोकादायक विषाणूचा शिरकाव आता भारतातही झाला असून या विषाणूची लागण झालेले किमान ६ रुग्ण भारतात आढळले असल्याचं वृत्त आहे‌. हा आकडा प्रत्यक्षात आणखी जास्त असण्याची भीती व्यक्त केली जातेय‌. तूर्तास इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्यात. अमेरिकेनंतर कोरोनाची लागण झालेल्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर असून भारतात एक करोड पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे. तर जगभरात आत्तापर्यंत ८ कोटी पेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी १८ लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. कोरोनातून बऱ्या होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्यानं आढळलेला हा कोरोनाचा विकसित विषाणू अधिक घातक आणि संसर्गजन्य असल्याचं आढळल्यानं अजूनंही चिंतेचंच वातावरण आहे.