Quick Reads
राष्ट्रीय सडक नाट्य दिवस: पथ नाट्य करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या सफदर हाश्मी यांची आठवण
अर्थात : कॉ. सफदर हाश्मी जन्मदिवस
-योगेश कुदळे
१९१७ च्या रशियन क्रांतीनंतर लगेचच सादर केलेलं मायकोवस्कीच, ‘मिस्ट्री बुफे’ हे नाटक त्या काळातलं तंबूत केलं जाणारं नाटक ज्या मध्ये क्रांतिकारी गाण्यांचा समावेश करून ते शहरातल्या चौका चौकात सादर केलं गेलं. या नाटकाबद्दल सफदर Right to Perform मध्ये म्हणतो, “या प्रकारच्या नाटकांचे शेकडो प्रयोग कामगार पर्वाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये केले जात होते, जे लोकांना प्रचंड आवडत होते.” सफदर हाश्मीचं, या नाटकाच्या माध्यमातून सुरु झालेल्या क्रांतिकारक नाट्य चळवळीबद्दल अस म्हणनं होत की, “हे नाटक म्हणजे एका नव्या पद्धतीच्या Agitprop Theatre ची सुरुवात होती’, जे रस्त्यांवर, चौकांमध्ये, कारखान्याच्या गेटवरती, घराच्या अंगणात, खेळाच्या मैदानात, इतकच नव्हे तर अगदी शेतातल्या खळ्यातदेखील करता येऊ शकतं. हे सरळ सरळ राजकीय नाट्य होतं. लोक जिथं राहतात, जिथं वावरतात तिथं सहजासहजी करता येणारं नाटक. खर तर नाटक करायची ही पद्धत स्वयंसेवी होती आणि लोकांच्या स्वभावाशी साम्य असणारी होती. हा नाट्य प्रकार म्हणजे लोकांना दैंनदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्या सांगणारा आणि त्या समस्यांचं विश्लेषण करणारा आणि त्याच बरोबर त्या जाणून घेऊन समजावून सांगण्याचा एक मार्ग होता. दर वर्षी राजकीय जलसे, जुलूस आणि राजकीय सण - उत्सवाच्या प्रसंगी अशा प्रकारची नाटकं रशियातील शहरांच्या रस्त्यावर दाखवली जायची.
जगभरामध्ये या प्रकारची नाटक राष्ट्रांच्या उभारणीसाठी, लोकशाही टिकविण्यासाठी, युद्धाच्या, आणीबाणीच्या प्रसंगी केली जात होती. चीनमध्ये, विएतनाममध्ये तर जपानच्या विरोधात पाच वर्ष युद्धाच्या दरम्यान, क्युबन क्रांतीनंतर लगेच, लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये मानवमुक्तीच्या संगरामध्ये, मेक्सिको मधील शेतमजुरांच्यात साधारण या प्रकारचच Agitprop Theatre प्रचलित झालं होतं. १९६० च्या दशकात फ्रांस मध्येदेखील या प्रकारच्या Agitprop Theatre ची सुरुवात झाली होती. अशा प्रकारे एका विश्वव्यापी सत्यासारखा भारतामध्ये सडक नाटकानच्या स्वरूपात Agitprop Theatre ने जन्म घेतला. अर्थात भारतामध्ये रूढ अर्थाने सडक नाटकाने जरी उशिराने जन्म घेतला असला तरी इतर राष्ट्रांच्या तुलनेत सगळ्यात जास्त प्रमाणात भारतामध्ये सडक नाटकांचा वापर लोक प्रबोधन करण्यासाठी केला गेला. भारतामध्ये याची नीव भलेही इप्टा सारख्या संस्थेने रोवली असली तरी सफदर हाश्मीच्या जन नाट्य मंच (जनम) ने या साऱ्यांच्या पुढे जाऊन आपला वेगळा ठसा या क्षेत्रात उमटवला आहे.
भारतामध्ये सडकनाटक चळवळीच्या अनुषंगाने ज्या ज्या कार्यकर्त्या कलावंतानी योगदान दिले त्यामध्ये सगळ्यात अग्रणी नाव निर्विवादपणे कॉ. सफदर हाश्मी यांचंच असू शकतं. सडक नाटक करताना जीवाची तमा न बाळगता हौतात्म्य पत्करणारी व्यक्ती म्हणजे सफदर! आणि म्हणूनच कॉ. सफदर हाश्मी यांचा जन्म दिवस देशभरामध्ये ‘राष्ट्रीय सडकनाटक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कॉ सफदर हाश्मी यांचा जन्म १२ एप्रिल १९५४ साली झाला. सांस्कृतिक अंगाने लोक प्रबोधन करण्यासाठी जे माध्यम सफदर हाश्मी यांनी निवडले ते म्हणजे सडकनाटक होय. सडक नाटकासारख्या प्रभावी सांस्कृतिक माध्यमाचा सर्वात चांगला आणि कल्पक वापर कॉ.सफदर हाश्मीसारख्या कलावंत असणाऱ्या कार्यकर्त्याने अगदी योग्य रीतीने करून सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी केलेला आढळतो. सडकनाटकासारखं दुधारी सांस्कृतिक शस्त्र समजल्या जाणाऱ्या माध्यमाचा वापर मार्क्सवादी असणाऱ्या कॉ सफदर हाश्मी यांनी समाजामध्ये आढळणाऱ्या वाईट चालीरीती, प्रथा तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत विवेकी पद्धतीने केलेला आढळतो. सांस्कृतिक अंगाने समाज प्रबोधन या प्रेरणेने सफदर हाश्मी यांनी १९७३ साली जनम (जन नाट्य मंच ) या सांस्कृतिक संघटनेची स्थापना केली. जनम या संस्थेच्या माध्यमातून सडकनाटकासारख्या प्रबोधन करणाऱ्या चळवळीला लोक चळवळ, जन चळवळ बनविण्याच मोठ काम सफदर हाश्मी यांनी केल. खर तर या जनम चा खरा जन्म झाला तो “मशीन” या सडकनाटकाचे सादरीकरण करून.
सफदर हाश्मी यांनी इंग्रजी साहित्यातून एम ए केलेलं असल्यामुळे त्यांना साहित्याची चांगली जाण होती. ते स्वतः सुंदर गायचे, कविता लिहायचे, नाटक लिहायचे. अभिनय आणि दिग्दर्शन हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या नाटकांपैकी अत्यंत महत्वाची सडकनाटकं म्हणजे, ‘औरते’, ‘गाव गाव से शहर शहर तक’, ‘डी टी सी का धांदली’, ‘राजा का बाजा’ ही होत. त्यांनी केलेल्या या सडक नाटकांची लोकांनी आणि तत्कालीन सरकारने ही दखल घेतली होती. सफदर हश्मींच्या सडक नाटकांना राजसत्ताही घाबरत असे.
सफदर एक कवी मनाचा अभ्यासू कार्यकर्ता, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलेच्या क्षेत्रात नव काही तरी करू पाहणारा कलावंत! लोक प्रबोधनाचं आणि लोकांच्या राजकीय जाणिवा जागृत करण्याचं व्रत हाती घेतलेला प्रबोधक होता. सफदर च्या सडकनाटकाचा केंद्रबिंदू हा श्रमिक, कष्ट करणारा सामान्य माणूस (स्त्री आणि पुरुष) होता. प्रत्येक श्रमिकाला वाचता लिहिता आलं पाहिजे, जेणे करून त्याला त्याचा हक्क मिळेल, अधिकारांचा जाणीव होईल म्हणून त्याने हिंदीमध्ये एक गाणं लिहीलं. या गाण्याचा ‘रे रस्ते करणार्यानो रे ओझी वाहणाऱ्यानो’ असा अनुवाद डॉ.माया पंडित यांनी केला तसेच त्याच्या अनेक सडक नाटकांचा मराठी अनुवाद आहे देखील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नाट्यसंस्थांनी केला. चौफेर वाचन हे सफदर च्या व्यक्तिमत्वाच प्रमुख लक्षण. सफदर च्या आयुष्यामध्ये पुस्तकांना अनन्य स्थान होतं. पुस्तक मानवाचं मस्तिष्क घडवतात, पुस्तकं मानवाचं आयुष्य बदलतात, पुस्तकं मानवाची मित्र आहेत अशा आशयची कविता ‘किताबे कुछ केहना चाहती है’! सफदर वाचन संस्कृती जोपासावी म्हणून लिहित होता. सफदर एक विचार होता अन आहे हे त्याच्या कविता, लेख, गीत, नाट्य आदींच्या माध्यमातून दिसून येईल.
एकीकडे श्रीमंत गरीब वाढत जाणारी दरी, दुसरी कडे भांडवलदारांकडून कामगारांचं केलं जाणारं शोषण तर तिसरेकडे सरकारची चुकीची धोरणं अश्या परिस्थितीमध्ये सडक नाटकाच्या माध्यमातून समाजाला सक्षम असा सांस्कृतिक पर्याय देण्याचे काम कॉ सफदर हाश्मीनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केल असं म्हणल तर वावग ठरू नये.
कॉ. सफदर हाश्मी यांच्या नाटकांचा केंद्र बिंदू हा कामगार, कष्टकरी शोषित समाज असायचा. सडक नाटकाच्या माध्यमातून एखाद्या सामाजिक,आर्थिक,राजकीय किंवा सांस्कृतिक समस्येवर भाष्य करत असताना, सडक नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षक आणि नाटक यांच्यातील द्वंद्व कायम ठेवण्याचे कसब सफदर हाश्मी यांच्या नाटकात होत.
०१ जानेवारी १९८९
सफदर हाश्मी यांनी सुरु केलेल्या जनम च्या माध्यामतून ८० सडक नाटकांचे आता पर्यंत ८५०० च्या वर प्रयोग झालेत. एक जानेवारी १९८९ रोजी उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे ‘हल्ला बोल’ नावाच नवीन सडकनाटक करून नव वर्ष्याच स्वागत करण्याचा मानस ठेऊन नाटक करत असताना मुकेश शर्मा नावाच्या गुंडाने सफदर हाश्मी आणि त्यांच्या गटावरती (जनम) हल्ला केला होता. या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये सफदर हाश्मी शहीद झाले.
एक वृद्ध स्त्री सफदर गेल्यानंतर स्वतःचा उर बडवून घेत, दुख व्यक्त करत म्हणत होती ‘कोणी तरी मला माझ्या सफदरची भेट घालून द्या’!
‘सगळ्यांचा ‘माझा’ सफदर आता कशाचीही तमा न बाळगता डोळे मिटून शांत पडून होता. आयुष्य भराच्या थकव्यान त्याला आता अलगद चिरनिद्रेच्या स्वाधीन केलं होत. बरेचसे परिवर्तनवादी गट सफदरची आवडती क्रांतिकारक गाणी गात ‘सफदर हाश्मी जिंदाबाद’ च्या घोषणा देत एक साथ ताला सुरात चालली होती. एकीकडे सफदर आपल्यातून निघून गेलेल्याच दुख तर दुसरीकडे व्यवस्थेबद्दलची मनात असणारी चीड या तरुणाईला अस्वस्थ करत होती. हे अस्वस्थ असणारे तरुण आपली अस्वस्थता मनात साठवून आपल्या शहीद मित्राला खांदा देऊन त्याच्या नश्वर शरीराला शेवटचा निरोप द्यायला निघाले होते. तरुणांचे गट च्या गट सफदर ला विदा करण्यासाठी त्याच्या अंत यात्रेत सामील झाले होते. क्रांतिकारी लाल रंगाच्या बावट्या मध्ये लपेटलेल सफदर च पार्थिव शरीर तमाम तरुणाईला त्याच अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध करत होत. सफदर च्या जाण्यान त्याचे सहकारी कोम्रेडस त्यांच दुख क्रांतिकारी गाण्यातून व्यक्त करत वचनबद्ध झाले होते की, ‘कॉम्रेड तुझ नाव, तुझ काम आणि तुझा विचार आम्ही विसरणार नाही आहोत, तुझा विचार किंबहुना परिवर्तनाचा विचार आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजवू.’! सफदर ला अलविदा करताना ‘सफदर हाश्मी लाल सलाम, सफदर हाश्मी जिंदाबाद’ च्या घोषणा देणाऱ्या तरुणांच्या घश्याला जखमा झाल्या होत्या, त्यांचे घसे बसले होते, कंठातून आवाज फुटत नव्हता पण तरीही यावेळी कोणीही त्यांना होणार्या वेदनांचा विचार करत नव्हत.
ज्या दिल्लीतले चौक आणि निर्जीव रस्ते सफदर हाश्मी च्या सडक नाटकांनी आणि गाण्यांनी जिवंत व्हायची तेच रस्ते चार जानेवारीला प्रचंड गर्दी असताना देखील शांत वाटत होते जणू ते देखील सफदर च्या अंत यात्रेची वाट बघत होते. कोणालाही काहीच समजत नव्हत नेमक काय झाल? का झाल? सफदर गेलाय हा विचारच कुणी पचवू शकत नव्हत किंबहुना कुणाला पटतच नव्हत. पण जीवन म्हणजे मृत्युसारख एक भयंकर सत्य आहे, या सत्याला सामोरे जाण्याच औदार्य फक्त सफदर चे सहकारी असलेले कोम्रेडस अन त्याची जीवनसाथी कॉ. मोलोयाश्री हाश्मी करो जाणो. कारण पतीच्या मृत्युनंतर अवघ्या दोन दिवसात म्हणजे चार जानेवारी १९८९ रोजी सफदर हाश्मी यांच्या जीवन साठी कॉ मोलोयोश्री हाश्मी यांनी ‘हल्ला बोल’ हे सफदर याचं अपूर्ण राहिलेलं नाटक जिथे सफदर हाश्मी यांच्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी केल. पतीच्या म्रीत्यू ला अवघे दोन दिवस झालेत आणि ही महिला त्याच अर्ध राहिलेलं नाटक पूर्ण करते, या साठी लागणार मानसिक बळ कोठून येत? तर त्याच उत्तर आहे मानवी मेंदू मधील सर्जनशील आणि परिवर्तनाचा विचार! जे सडक नाटकाच व्युह्छेदक लक्षण आहे. सफदर च्या शहादत नंतर एक झाल की सडकनाटक करणाऱ्या गटांची संख्या किती तरी पटीने वाढली होती. सफदर हाश्मी गेल्या नंतर एम के रैना वगैरे मंडळीनी सफदर हाश्मी मेमोरिअल ट्रस्ट ची स्थापना (सहमत) केली होती. याच सहमत तर्फे सफदर च्या म्रीत्युनंतर आलेला त्याचा पहिला जन्मदिवस (१२ एप्रिल) हा ‘राष्ट्रीय सडकनाटक दिन’ म्हणून साजरा करायचा म्हणून घोषणा केली. (खर तर ज्या सफदर ला सडकनाटक करताना शहादत प्राप्त झाली त्याचा जन्मदिवस हा खरोखरीच राष्ट्रीय सडकनाटक दिन असायला हवा.) तर त्या दिवशी फक्त बंगालमध्येच सडकनाटकाचे हजार भर प्रयोग झाले. पूर्ण भारतभर तीस हजारपेक्षाही अधिक सडकनाटकाचे प्रयोग अन तीनशेहून अधिक सडकनाटक करणारे ग्रुप तयार झाले तर लाखोंच्यावर लोकांनी सडकनाटकाचे प्रयोग पाहीले होते.
सफदर च्या मृत्यूच सार दुख विसरून त्याचे जन नाट्य मंच चे सहकारी अन सफदर ची जीवनसाथी कॉ. मोलोयाश्री हाश्मी त्याच बरोबर कॉ.सुधन्वा देशपांडे, इत्यादी सहकारी सफदर चा विचार पोहोचविण्यासाठी कंबर कसून तयार झाले ते आजतागायत. सफदर च्या हौतात्म्याला तीस वर्षे पूर्ण होऊनही सडक नाटकाच्या माध्यमातून सबंध देशभरामध्ये सांस्कृतिक चळवळ गतिमान करत असतानाच लोक प्रबोधन करण्याच काम ही मंडळी करत आहेत. सफदर चा एक साथी अन गो.पु.देशपांडे यांचा मुलगा सुधन्वा देशपांडे जो सफदर वरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस त्याच्यासोबत होता. तो नुसता त्या घटनेचा साक्षीदार नाही तर तोही त्या हल्ल्यामध्ये जखमी झाला होता. त्या कॉ. सुधन्वा देशपांडे यांनी नुकतच सफदर हाश्मी च्या जीवनावर बेतलेल ‘Halla Bol: The Death and Life of Safdar Hashmi’ या शीर्षकाच इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक लिहिलय. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक १ जानेवारी २०२० रोजी ज्या ठिकाणी सफदर वर हल्ला झाला त्या गाजियाबाद शहरातील झंडापूर येथे कॉ.सीताराम येचुरी, जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांच्या हस्ते झाला होता. खर तर सफदर हाश्मीला जाऊन आता तीस वर्षे होऊन गेली. पण या त्याच्या सहकार्यांनी खर्या अर्थाने सफदरला त्यांच्या नाटकातून अन गाण्यातून जिवंत ठेवण्याच काम केलय अन करत राहतील. या मंडळीनी सफदर च्या मृत्यूच दु:ख न करता, त्याच्या मृत्यूचा शोक न करता सफदरच्या मृत्यूचे सोहळे करायला सुरुवात केली. कोणत्याही क्रांतीकारकाला त्याच्या मृतुचे सोहळे साजरे करावे असच वाटत असत. नेहमी त्याच्या मृतूचा सोहळा दर वर्षी जानेवारीच्या एक तारखेला सफदर ने सुरु केलेल्या जन नाट्य मंच या संस्थेमार्फत गाजियाबाद शहरामध्ये भरवला जातो.
सदर लेखन माझ्या आगामी 'सडकनाटक : सिद्धांत आणि कृती' या पुस्तकातील आहे, आज सफदर चा जन्म दिवस आहे त्यानिमित्ताने.
#National_Street_Theatre_Day
#Birthday_Safdar_Hashmi
(एडिट १२ एप्रिल २०२१, दुपारी ३.४३ वा: या लेखात काही वाढ करून लेख सुधारित करण्यात आला आहे.)