India
मुनव्वर फारुकीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नामंजूर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात यासाठी अपील करण्यात आलं होतं.
धार्मिक भावना भडकविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला कॉमेडियन मुनव्वर फारूकी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. फारूकी यांना या आधी तीन वेळा जामीन नाकारण्यात आला होता. मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नामंजूर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात यासाठी अपील करण्यात आलं होतं.
फारूकी यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान हिंदू देवी-देवतांवर आपत्तीजनक भाषेमध्ये टीकाटिप्पणीकेल्याचा, तसंच त्यामुळं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर एफ नरिमन आणि न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठासमोर फारुकी यांची याचिका सुनावणीसाठी आली होती.
भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण सिंह गौंड यांचा मुलगा एकलव्य सिंग गौड यांच्या तक्रारीनंतर फारुकी आणि अजून एका व्यक्तीस अटक करण्यात आली होती. गौड यानं असा गुन्हा दाखल केला होता की नववर्षानिमित्त इंदूर शहरात मनरो कॅफेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कॉमेडी शो च्या दरम्यान फारुकी यांनी हिंदू देवी देवता व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आपत्तीजनक भाषेत टिप्पणी केली. दंडाधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही असं फौजदारी दंडविधानाच्या कलाम ४१ मध्ये नमूद केल्याचं फारुकी यांच्या वकिलानं सांगत, ही कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या पाळली गेली नसल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.
"सतत हिंदूद्वेषी विनोद करणाऱ्या मुनव्वर फारूकीच्या या शो ला मी आणि माझे सहकारी तिकीट खरेदी करून मुद्दाम गेले होतो. हिंदू देवता, गोध्रा हत्याकांड आणि गृहमंत्री अमित शहांबद्दल अपमानास्पद वक्तव्य हा कॉमेडियन करत असताना आम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा हॉल रिकामा करायला लावून आम्ही मुनव्वर आणि या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या ४ जणांना तुकोगंज पोलीस स्थानकात घेऊन गेलो," अशी माहिती तक्रारकर्त्या गौर यांनी त्यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
मूळचे गुजरातमधील जुनागढचे राहीवासी असलेले मुनव्वर फारूकी विनोदी शैलीतून राजकीय सामाजिक विषयावर भाष्य करण्याच्या आपल्या शैलीमुळे भारतातील आघाडीच्या स्टॅन्ड अप कॉमेडियन्सच्या यादीत आघाडीवर आहे. संवेदनशील विषयांवर विशेषतः हिंदूंच्या धार्मिक भावनांवर विनोद केल्यानंतर अडचणीत अडकल्याची कॉमेडियन्सवर आलेली ही पहिलीच वेळ नाही.