India

सरकारविरोधात फेसबूक पोस्ट शेअर केल्याबद्दल एल्गार परिषदेच्या हर्षाली पोतदारला अटक

एप्रिल २०२० ला मोहसीन शेख यांची फेसबुक पोस्ट शेअर केल्याबद्दल हर्षालीवर मुंबईच्या माता रमाई पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Credit : Shubham Patil

एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक आणि रिपब्लिकन पॅंथर्स या जातीअंत चळवळीच्या कार्यकर्त्या हर्षाली पोतदार यांना सोशल मीडियावरून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली आज अटक करण्यात आली. बुधवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए ए नांदगावकर यांनी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आज आयपीसीतील कलम १५३ (अ) अंतर्गत पोलीसांनी तिच्यावर ही कारवाई केली.

एप्रिल २०२० ला तबलीगी जमातीच्या सदस्यांवर कारवाई करून मुस्लीमांना लक्ष्य करण्यात आल्याच्या विरोधात लिहीलेली मोहसीन शेख यांची फेसबुक पोस्ट शेअर केल्याबद्दल हर्षालीवर मुंबईच्या माता रमाई  पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. "याच प्रकरणात आम्ही हर्षाली पोतदारसह मोहसीन शेखला अटक केली आहे," अशी माहिती माता रमाई पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तर "नेमक्या कोणत्या गुन्ह्याखाली ही अटक करण्यात येत आहे, याची कोणतीच कल्पना मला नसून सामाजिक तेढ निर्माण होईल असा कोणतंच भाष्य मी कधी केलं नाहीये," असं स्पष्टीकरण हर्षाली पोतदार यांनी अटक होण्यापूर्वी दिलं.

"३० जानेवारी २०२१ ला गणेश कला क्रीडा मंचात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेला आणि परिषदेतील कार्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठीच ही खोटी कारवाई करण्यात आल्याचा आरोप एल्गार परिषदेच्या आयोजकांनी केला असून सरकारनं आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एल्गार परिषद होणारंच," असा विश्वास परिषदेच्या आयोजकांनी व्यक्त केलाय. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, कबीर कला मंच आणि भीम आर्मीसारख्या अनेक राजकीय - सांस्कृतिक संघटनांचा या एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात सहभाग आहे.

भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा दिन अभियान या आयोजक संघटनेनं "एका बाजूला भीमा कोरेगावमधील दंगल घडवून आणलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेसारख्यांविरोधात पुरावे उपलब्ध असूनही न्याय आणि समतेसाठी लढणाऱ्या एल्गार परिषदेच्या निर्दोष कार्यकर्त्यांना खोट्या आरोपांखाली तुरूंगात डाबून ठेवलं जातंय. संविधानाप्रती हर्षालीची असलेली निष्ठा सर्वश्रूत असून सामजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असा कुठलाही विभाजनवादी मजकूर तिने प्रसिद्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं सांगत हर्षाली पोतदारला आपलं समर्थन जाहीर केलं.

३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर  १ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगाव शौर्यदिनी झालेल्या दंगलीनंतर पोलीसांकडून एल्गार परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात केली होती. ३ वर्षांनंतरही हे कार्यकर्ते अजूनही अटकेत आहेत. यात अनेक बुद्धीजीवी लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. जातीभेदाला विरोध करून संविधानाच्या रक्षणासाठीच ही परिषद असल्याचं सांगत भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यासाठी येत्या ३० जानेवारीलाही पुन्हा एल्गार परिषद होणार आहे. आजच्या अटकेमुळे आता ही परिषद होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहेत. सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करून हिंसा माजवण्यासाठीच ही परिषद भरवली जात असल्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा दावा असून दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात हिंसा भडवणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना संरक्षण देऊन सरकार संवैधिनीक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांविरोधातंच सूडाचं‌ राजकारण करत असल्याचा एल्गार परिषदेच्या आरोप आहे.