Quick Reads
मसजिद - सामाजिक न्याय, सांस्कृतीक आणि राजकीय परिवर्तनाचे केंद्र
मसजिदी या कधीही नुसत्या प्रार्थनागृहासारख्या नव्हत्या.
सरफराज अहमद | अरब समाजजीवनात इस्लाम पश्चात झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रीयेत मसजिदींचे ऐतिहासिक महत्त्व दुर्लक्षीत करता येत नाही. अरब समाजाला मानवीहिताचे राजकीय मुल्यभान देऊन, त्यांच्यात ज्ञानजिज्ञासा, अन्यायाविषयीची चिड, मानवी समाजातल्या नैसर्गिक समानतेची आणि अनैसर्गिक विषमतेची जाणिव, आर्थिक शोषण, गुलामगिरी, स्त्रीदास्यत्व, वेठबिगारी, लष्करी दास्यव्यवस्था आणि संपूर्ण टोळीजीवनाला एका समान राजकीय सुत्रात बांधण्यासाठी जे प्रयत्न प्रेषितांच्या माध्यमातून झाले आहेत त्या सर्वांच्या केंद्रस्थानी मसजिद आहे. मसजिदींच्या माध्यमातून घडलेल्या ऐतिहासिक परिवर्तनाचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा हा इस्लामच्या जन्म आणि विकासात मसजिदींनी दिलेले योगदान, दुसरा टप्पा खलिफांच्या काळात मसजिदींनी इस्लामी समाजजीवनाला एकात्मिकता प्रदान करण्यात आणि त्याच्यात ज्ञान, तंत्रज्ञान, नैतिकतेविषयीची निष्ठा, सामाजिक आणि राजकीय सजगता निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा समावेश होतो. तिसरा टप्पा हा इस्लामच्या वेगवेगळ्या प्रदेशातील प्रवेशानंतर सुरु होतो. या टप्प्यात मसजिदींमधल्या या व्यवस्थेची जबाबदारी थेट मुस्लिम समाजावर होती. उलेमा (विद्वान), सुफी, मदरश्यातील शिक्षक, सुफी खानकाहमधील पहिल्या श्रेणीचे शिष्य, राज्यकर्ते, राज्यकर्त्यांचे कुटूंबीय, बादशाहांचे प्रमुख सरदार, उच्चपदस्थ आधिकारी या सर्वांनी मसजिदींना मुस्लिम समाजाच्या पलिकडे समाजातील सामान्य माणसाशी जोडण्याचा प्रयत्न केले.
इस्लामच्या पुनर्स्थापनेपश्चात स्थापन झालेली पहिली मसजिद म्हणून मदिनेतील ‘मसजिद ए कुबा’चा उल्लेख येतो. पण इस्लामच्या इतिहासात ‘मसजिद ए कुबा’पेक्षा मदिनेतील ‘मसजिद ए नबवी’चा उल्लेख आधिक आहे. कारण मदिनेत आल्यानंतर प्रेषितांनी जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेसाठी जे निर्णय घेतले आहेत, त्यातील बहुतांश निर्णय या ‘मसजिद ए नबवी’ मधून घेतलेले आहेत. इस्लाम आणि त्याच्या इतिहासामध्ये जी महत्वाची ऐतिहासिक धार्मिक स्थाने आहेत त्यामध्ये ‘मसजिद ए हरम’ अर्थात काबागृह जिथे मुसलमान हजयात्रेसाठी जातात त्याचा क्रमांक वरचा आहे. त्यानंतर ‘मसजिद ए नबवी’ आणि जेरुसमलेमची ‘मसजिद ए अक्सा’ वगैरेंचा समावेश होतो.
मसजिद ए हरम – ट्राईब पार्लमेंट ते इस्लामचे पवित्र प्रार्थनागृह
‘मसजिद ए हरम’ अर्थात काबागृहाचा एक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय केंद्र म्हणून इस्लामच्यापुर्वी आणि नंतरही काही काळ झालेला वापर अतिशय लक्षवेधी आणि ऐतिहासिक आहे. अरब टोळीजीवनात, टोळीराज्याला नैतिक अधिष्ठान देऊन त्याला एकसंध ठेवण्यात ‘मसजिद ए हरम’ ने खूप मोठे योगदान दिले आहे. प्रेषितांच्या पुर्वी आणि प्रेषित इब्राहीम यांच्या पश्चात ‘मसजिद ए हरम’ टोळीराज्याची ‘ट्राईब पार्लमेंट’ म्हणून ओळखली जायची. या ट्राईब पार्लमेंटला ‘दारुल नद्वा’ हे नाव दिलेले होते. काबागृहातल्या या ‘ट्राईब पार्लिमेंट’ मधूनच मक्का शहराच्या साऱ्या व्यवस्थेची सुत्रे हालत होती. इस्लामी इतिहासाचे अभ्यासक डॉ. मोहम्मद हमिदुल्लाह हे त्यांच्या ‘खुतबात ए बहावलपूर’मध्ये लिहीतात, ‘त्याकाळात मक्का एक शहरी राज्य होते. त्याचे क्षेत्रफळ १३० चौरस मैल होते. तेथे बादशाहतीऐवजी एक सामुहीक प्रतिनीधीमंडळ होते. म्हणजे हे वजीरांचे प्रतिनिधीमंडळ मक्का शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत होते. थोडक्यात सांगायचे तर यामध्ये दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांसाठी वेगवेगळे वजीर होते. काबागृहाचा दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी एक वजीर होता. काबागृहातल्या नित्योपचारासाठी दोन वजीर होते. करसंकलनासाठी एका वजीराची नेमणूक केलेली होती. काबागृहात स्थापन केलेली ‘दारुल नद्वा’ ही एक अशी राजकीय संस्था होती, तेथे ज्यावेळी राजकीय आपत्ती अथवा समस्या उद्भवायची त्यावेळी ज्येष्ठ वजीरांची सभा बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जात होती. मक्का शहरातील ज्याचे वय ४० पेक्षा आधिक आहे, तो नैसर्गिकरित्या ‘दारुल नद्वाचा’ सदस्य मानला जात असे. फक्त अबू जहल आणि अन्य एकाला काबागृहात चालणाऱ्या दारुल नद्वाचा वयाची ४० वर्षे पुर्ण करण्याआधीच सदस्यत्व देण्यात आले होते. दुसऱ्याचे नाव इतिहासाच्या साधनांमध्ये आढळत नाही. पण अबु जहलविषयी माहिती दिलेली आहे. त्याला त्याच्या अचाट बौध्दीक क्षमतेचा आधार घेऊन हे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. (हा अबु जहल प्रेषितांचा सर्वात मोठा विरोधक म्हणून ओळखला जातो.) दारुल नद्वामध्ये ज्या विभागाची इतिहासात विशेष चर्चा होते तो विभाग म्हणजे परराज्य धोरण विभाग एखाद्या राज्याशी संबंधांची दिशा निश्चित करणे, युध्दाची घोषणा करणे वगैरे काम या विभागाकडून केले जात होते. हा विभाग प्रेषितांपश्चात ज्यांच्याकडे इस्लामी राज्याची धुरा सोपवण्यात आली होती त्या हजरत उमर यांच्याकडे होता. याशिवाय दिवाणी विभाग इस्लामोत्तर काळातील प्रेषितांचे सहकारी हजरत अबु बक्र यांच्याकडे होता. ’ (पृष्ठ क्र. १९८-२००)
प्रेषितांच्या नेतृत्वाखाली मक्का विजय संपादन केल्यानंतर या व्यवस्थेत काही बदल करण्यात आले. पण त्या काळातही काबागृहाचे सामाजिक, सांस्कृतिक केंद्र म्हणून असलेले महत्व अबाधित राहिले. प्रेषितांच्या काळात जवळपास विद्यापीठासारखी व्यवस्था काबागृहाच्या परिसरात अस्तित्वात होती. डॉ. महमूद अहमद गाजी त्यांच्या ‘महाजिरात ए सिरत’ या ग्रंथात लिहीतात, ‘कुरआनची आयत अवतरीत झाल्यानंतर शिक्षक ते लिहून घेत आणि घरोघरी जाऊन ती आयत लोकांपर्यंत पोहचवली जात असे. त्यामुळे याचा उल्लेख अरबस्तानातील खुले विद्यापीठ असा केला तर वावगे ठरणार नाही. जिथे लिहीण्यासोबत वाचण्याची कला शिकवली जात होती. लिखित ग्रंथसंग्रह देखील तेथे उपलब्ध होता. प्रेषित जोपर्यंत मक्का शहरात वास्तव्यास होते तोपर्यंत हीच पध्दत रुढ अवलंबली जात होती. मदिनेतील समृध्दीकाळात मात्र या विद्यापीठाची व्यवस्था शासकीय पातळीवर पाहिली जाऊ लागली.’(पृष्ठ १४४)
मदिनेतील मसजिद ए नबवी
काबागृहानंतर इस्लामच्या इतिहासातील सर्वाधीक महत्वाची मसजिद म्हणून ज्याचा उल्लेख होतो, ती मसजिद ए नबवी ही मसजिद आहे. प्रेषितांनी मक्केतील अरबांच्या त्रासाला कंटाळून मदिनेला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. मदिनेत स्थलांतरीत झाल्यानंतर सुरुवातीला ‘मसजिद ए कुबा’ ही इस्लामच्या इतिहासातली पहिली मसजिद सुरु करण्यात आली. त्यानंतर ‘मसजिद ए नबवी’ चे बांधकाम करण्यात आले. मसजिदीची जागा दहा दिनार देऊन खरेदी करण्यात आली. त्यानंतर तेथे मसजिद आणि मदरसा या दोन्ही इमारती बांधण्याचे निश्चित करण्यात आले. या मसजिदीच्या भिंती दगड-विटांचा वापर करुन तर छताचे बांधकाम झाडांची लाकडे वापरुन करण्यात आले. मसजिदीजवळ वेगवेगळ्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. मसजिदीच्या जवळ एक चबुतरा बांधण्यात आला. त्याला सुफ्फा असे म्हटले जात होते. हे मदिनेतील पहिले विद्यालय होते.
सुफ्फा याचा अर्थ विचारपीठ असा होतो. सुफ्फाचा उल्लेख आता निवासी विद्यापीठ म्हणून केला जातो. वेगवेगळ्या भागातील शिक्षक विचारवंत याठिकाणी येत असत. सुफ्फामधील विद्यार्थी दोन प्रकारचे होते. मदिनातील विद्यार्थी सुफ्फामध्ये शिक्षण घेतल्यानतंर रात्री घरी परतत. तर बाहेरील विद्यार्थी सुफ्फा मध्येच मुक्काम करीत. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी ‘मसजिद ए नबवी’मध्येच व्यवस्था होती. सुफ्फामध्ये प्राथमिक स्तरापासून तत्वज्ञानापर्यंतचे शिक्षण दिले जात होते. पहिल्या स्तरावरच्या विद्यार्थ्याला अक्षरओळख शिकवण्यापासूनचे शिक्षण दिले जाई. प्रेषितांच्या आयुष्यातील एक प्रसंग विख्यात आहे. एकदा प्रेषित ‘मसजिद ए नबवी’ मधील सुफ्फा विद्यालयात आले. त्यावेळी काही विद्यार्थी इश्वराचे नामजप करत होते. तर काही शिक्षण घेत होते. ते पाहून प्रेषित म्हणाले, ‘दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्या तरी शिक्षण अतिशय पवित्र कार्य आहे.’ यावरुन मसजिदींचा वापर ज्ञानकेंद्र म्हणून झाला पाहिजे ही धारणा स्वतः प्रेषितांची होती.
मदिना शहरात लांबून प्रवास करुन आलेल्या प्रवाश्यांना इथे विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. सुफ्फामध्ये अतिथीगृह देखील होते. तेथे बाहेरील प्रवाश्यांच्या राहण्याची व्यवस्था होती. मदिन्यातील शेतकरी खजुराचे पीक काढल्यानंतर त्याची एक फांदी सुफ्फाला दान करीत. यातील पिकलेले खजूर मसजिद ए नबवीकडून गरीबांमध्ये वाटण्यात येत. एकदा हजरत मआज बीन जबल यांनी कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे घर विकले होते. त्यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था मसजिद ए नबवी मधील याच सुफ्फा मध्ये करण्यात आली होती.
या मसजिदीत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. ‘मिसाक ए मदिना’ या नावाने जगाच्या इतिहासातील पहिली राज्यघटना याच मसजिदीत लिहीण्यात आली. अनेक युध्दाविषयीच्या बैठकी त्याचे नियोजन देखील येथेच पार पडले. मदिनेतील शहरी प्रशासन, बाजाराची व्यवस्था, कर संकलन, शहरातील फौजदारी दंडव्यवस्था, न्यायनिवाड्याचे काम देखील मसजिद ए नबवीमधून व्हायचे.
मसजिद ए नबवीमध्ये पाचवेळच्या नमाजसाठी स्त्री पुरुष दोघेही मसजिदीत यायचे. दोघांसाठी वेगवेगळ्या ओळी केल्या जात होत्या. प्रेषितांच्या काळात स्त्रिया ईदच्या नमाजसाठी ईदगाहमध्येही यायच्या. मासिक पाळीच्या काळात नमाजमध्ये सुट असली तरी स्त्रियांना ईदगाह मध्ये येण्यास मनाई नव्हती. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जात होती. शुक्रवारच्या विशेष नमाजसाठी स्त्री पुरुष दोघे बरोबरीने यायचे. एकदा काही स्त्रियांनी आमच्या काही समस्या ज्याची चर्चा आम्ही पुरुषांसमोर करु शकत नाही, पण जी चर्चा गरजेची आहे. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यावेळी स्त्रीयांसाठी स्वतंत्र परिसंवादाचे आयोजन मसजिद ए नबवीमध्ये केले जाऊ लागले. मसजिद ए नबवीमध्ये फक्त धार्मिक स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित केले जात नव्हते. अनेकदा मसजिदीत काव्य संमेलनाचे आयोजन केले जात होते. वाद- विवाद, गटचर्चा वगैरे व्हायच्या.
मसजिद ए नबवीच्या नंतर जगात अनेक ठिकाणी याच पध्दतीच्या मसजिदी बांधण्यात आल्या. इजिप्तमधील जामिआ इब्ने तोतान, बगदादची जामिआ मन्सुर, मसजिद अब्दुल्लाह इब्ने मुबारक, तुर्कीची मोहम्मद अल् फातेहची मसजिद, सुलैमान अल् कानूनीची मसजिद, पश्चिम अफ्रिकेत जामिआ कुरुन, जामिआ जैतुनिया, उंदलूस मध्ये मसजिद ए कुर्तूबा, मसजिद ए खमरी या मसजिदी प्रार्थनागृहापेक्षा मध्ययुगीन काळातील विद्यापीठे म्हणून ओळखली जातात. आज जागतिक पातळीवर ज्या विद्यापीठांची चर्चा होते. त्यातील बहुतांशची सुरुवात मसजिदीतून करण्यात आली आहे. त्यामध्ये मदरसा अबु बकर अस्फहानी, बगदादचे जामिआ निजामीया आणि आजही सुरु असलेल्या जामिआ अल् अजहर या विद्यापीठाची सुरुवात एका मसजिदीतून करण्यात आली होती. भारतामध्ये देवबंद हे जगातील पहिल्या पाच जागतिक दर्जाच्या इस्लामी विद्यापीठात सामील असलेले विद्यापीठ आहे. या विद्यीपठाची सुरुवात देखील मसजिदीतून करण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर तेथे वेगवेगळ्या इमारती बांधण्यात आल्या. त्याशिवाय भारतात मसजिद ए अकबराबादी, मसजिद ए फतेहपुरी वगैरे मसजिदींनी केलेले ज्ञानप्रसार आणि सामाजिक जागृतीचे काम महत्वाचे आहे.
भारतात मसजिदींचा इतिहास
भारतामध्ये पहिली मसजिद केरळमध्ये बांधण्यात आली. त्यानंतर ज्या मसजिदी भारतामध्ये बांधण्यात आल्या त्याचे सुरुवातीच्या काळातील स्वरुप ज्ञानकेंद्रासारखे होते. महमूद गजनवीने कन्नौज येथे बांधलेली मसजिद इतिहासात आजही मसजिदीपेक्षा तत्कालीन जगातील विख्यात ग्रंथालय म्हणूनच ओळखली जाते. त्याकाळात भारतात मसजिदींसाठी ‘बकाए खैर’ म्हणजे कल्याणाचे केंद्र किंवा कल्याणाचा मार्ग असा शब्दप्रयोग केला जात होता.
मदरसा ए नासिरीया, मदरसा फेरोजशाही, मदरसा ए मोहम्मदी, मोहम्मद तुघलकच्या काळात बांधलेली शाही मसजिद दिल्ली, दिल्लीमध्येच फेरोजशाह तुघलकने बांधलेली जामिआ मसजिद या सर्व मसजिदी त्याकाळात सामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाची केंद्रे होती. मोहम्मद तुघलकने तर सामान्य विद्यार्थी शिकावा यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या. त्याने मुख्तारपूर येथे बांधलेल्या मसजिदीशेजारी असणारे विद्यालय बगदाद येथील शिक्षकांमुळे भारतीय उपखंडात नावारुपाला आले होते. परिक्षेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्याला बादशाहाबरोबर भोजनाचे आमंत्रण दिले जात होते. त्याशिवाय या मसजिदींमध्ये काजींसाठी कार्यालय बांधून दिलेले होते. स्थानिक निवाड्याची कामे तुघलकच्या काळात त्या – त्या भागातील मसजिदीत दर शुक्रवारी काझींच्या उपस्थितीत केली जात होती. मसजिदीच्या परिसरात मोहर्रमला प्रेषितांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्या स्मरणार्थ हिंदू-मुस्लिमांसाठी सहभोजनाचे आयोजन केले जाई. दिल्लीतल्या शाही मसजिदीत स्वतः मोहम्मद तुघलक अशा सहभोजनामध्ये सहभागी होत असे.
सुफींनी मसजिदीला हिंदु मुस्लिम संवादाचे केंद्र बनवले
मोहम्मद तुघलकने राबवलेल्या मसजिदीतील हिंदू-मुस्लिम सहभोजनाची संकल्पना मुळात ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती आपल्या खानकाहमधील मसजिदीत सातत्याने हिंदू-मुस्लिमांसाठी सहभोजनाचे आयोजन करीत असत. त्याशिवाय लंगरही चालत असे. एकेदिवशी सहभोजन संपल्यानंतर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी मसजिदीतील सेवेकऱ्यांना आपल्यासोबत जेवायला बोलवण्यासाठी एका शिष्याला सांगितले. त्यावेळी शिष्याने मसजिदीच्या परिसरातील एका व्यक्तीला वगळून साऱ्यांना मोईनुद्दीन चिश्ती यांच्यासोबत जेवण्यासाठी बोलवले. हे पाहून मोईनुद्दीन चिश्ती यांनी त्याला याचे कारण विचारले त्यावेळी तो सेवेकरी म्हणाला, ‘गुरुवर्य तो भंगी आहे. आपल्यासोबत बसण्याची त्याची पात्रता नाही.’ हे ऐकताच ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे जेवणाच्या पंक्तीतून उठले त्यांनी घोषणा केली की, ‘ही मैफल जो पर्यंत त्या सामान्य सेवेकरी सफाई कामगाराची माफी मागत नाही, तो पर्यंत मी जेवणार नाही.’त्यानंतर सर्वच शिष्यांनी आणि स्वतः मोईनुद्दीन चिश्ती यांनी त्याच्याकडे दिलगीरी व्यक्त केली आणि सहभोजन पार पडले. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या काळातील ही मसजिदीतल्या सहभोजनाची परंपरा पुढे चिश्ती संप्रदायातल्या ख्वाजा बख्तियार काकी, निजामुद्दीन औलीया, नसिरुद्दीन चराग दहेलवी, ख्वाजा बंदानवाज वगैरेंनी सुरु ठेवली.
मोईनुद्दीन चिश्ती यांनी शेतकऱ्यांवर लादलेल्या कराविरोधात बादशाहकडे जी तक्रार केली होती त्याविषयीच्या बैठका अजमेरच्या मसजिदीतच पार पडल्या होत्या. शिवाय ख्वाजा बंदानवाज यांनी शेतकऱ्यांना दुष्काळात करमाफी मिळावी म्हणून मुजाहीदशाह बहामनी याला पत्र लिहीले होते. मुजाहीदशाह बहामनी याने करमाफीला नकार दिल्यानंतर गुलबर्ग्याच्या किल्ल्यातील मसजिदीसमोरच हिंदु-मुस्लिम शेतकऱ्यांना जमवून ख्वाजा बंदानवाज यांनी ऐतिहासिक भाषण केले. त्यामध्ये त्यांनी केलेली घोषणा महत्वाची होती. ते म्हणाले ‘जालीम बादशाहच्या विरोधात लढणे हे पवित्र युध्दात सहभागी होण्यासारखे मोठे पुण्यकर्म आहे. शेतकऱ्यांना करमाफी नाकारणारा बादशाह जालीम आहे. त्याच्याविरोधात लढा’ याविषयी य.दी. फडके संपादीत शिवछत्रपती खंड १ मध्ये सविस्तर वर्णन दिले आहे.
समारोप
एकुणच मसजिदी या कधीही नुसत्या प्रार्थनागृहासारख्या नव्हत्या. मसजिदींना अनाथ, प्रवासी, कर्जबाजारी, रुग्ण, असहाय्य स्त्रिया, विद्यार्थी वगैरेंना मदत केली आहे. वेळप्रसंगी जुलमी राज्यकर्त्यांच्याविरोधात संघर्षासाठीदेखील मसजिदीतूनच राजकीय भूमिका घेतल्या गेल्यात. अस्पृश्य ठरवलेल्यांना समता आणि सन्मानाची वागणूक मसजिदींनीच दिली आहे. स्वातंत्र्य आंदोलनात अनेक मसजिदी क्रांतीकारकांची आश्रयस्थाने बनली होती. त्यामुळेच इंग्रजांनी दिल्लीतील कित्येक मसजिदी उद्ध्वस्त केल्या होत्या. दिल्लीतल्या जामा मसजिदी लष्करी तळ उभारले होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर भारतात मसजिदींना अपवाद वगळता निव्वळ प्रार्थनागृहासारखे स्वरुप आले आहे. पण अनेक युरोपीय देशात, तुर्कस्तान आणि अरबस्तानात मसजिदी आजही ग्रंथालये, विश्रांतीस्थाने, सामाजिक सुसंवादाचे, सांस्कृतीक सामजिक, राजकीय जागृतीची केंद्रे आहेत.
लेखक, गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत.