India

म्होरक्या सिनेमाच्या प्रदर्शनात प्रस्तुतकर्त्या कंपनीचाच खोडा

दिग्दर्शक अमर देवकर यांची माहिती

Credit : म्होरक्या

दिग्दर्शक अमर देवकर यांच्या म्होरक्या या चित्रपटाला जरी अनेक ठिकाणी दणदणीत यश मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात प्रदर्शित होणं या चित्रपटासाठी एक मोठं आव्हान ठरलं. विशेष म्हणजे म्होरक्याला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. 

याबद्दल खेद व्यक्त करत देवकर यांनी ही वेळ चित्रपटाच्या प्रस्तुत्कर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालं असल्याचं इंडी जर्नलला सांगितलं.

"चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होण्यासाठी त्याच्या डीसी (डिजिटल प्रत) बुधवारपर्यंत चित्रपटगृहांमध्ये पोहोचणं आवश्यक असतं कारण त्या अपलोड होण्यासाठी २४ तास लागतात. पण म्होरक्याच्या डीसी गुरुवारी रात्री पोहोचल्यामुळे चित्रपट आज प्रदर्शित होऊ शकला नाही," देवकर म्हणाले. चित्रपट जरी शनिवारी प्रदर्शित होत असला तरी त्याला मिळणाऱ्या चित्रपटगृहांची संख्या आता कमी आहे.

"म्होरक्या चे शोज आज नसल्यामुळे सगळ्या चित्रपटगृहांनी अर्थातच वेगळ्या चित्रपटांना प्राधान्य दिल्यामुळे आम्हाला उद्यासाठी जागा आणि वेळा मिळणं कठीण झालेलं आहे. सध्या तरी आमच्याकडे अख्ख्या राज्यातील फक्त ३९ सिनेमागृह उपलब्ध आहेत," देवकर पुढे म्हणाले. 

पहिला आठवडा चित्रपटांसाठी खूप महत्त्वाचा असतो, आणि तेव्हाच चित्रपटाला योग्य संधी न मिळाल्यामुळे खूप नुकसान झाल्याचं सांगत देवकर म्हणाले, "पैशाचं नुकसान तर आहेच, पण आम्हाला साधं आमच्या प्रेक्षकांपर्यन्त पोहीचातही येत नाहिये. चित्रपटसृष्टीत हे नवीन नाहीये. नवीन दिग्दर्शकांचं आणि कलाकारांचं असं नुकसान होतंच आलंय असं आम्हाला सांगितलं जातंय. पण माझ्यासाठी काम केलेल्या ३०० कलाकारांचा इथे प्रश्न आहे. त्यामुळे मी याविरुद्ध आवाज उठवणार."