Americas

करारानंतर मेक्सिको अमेरिकेकडे जाणाऱ्या निर्वासितांवरच्या प्रतिबंधाबाबत आक्रमक

शेकडो निर्वासितांवर मेक्सिकोच्या प्रशासनाकडून कारवाई

Credit : Reuters

निर्वासितांचा आणि विस्थापनाचा प्रश्न जगभर पेट घेत आहे आणि अशात जवळपास सगळीच सरकारं निर्वासितांवर कडक निर्बंध लावत आहेत. मंगळवारी मेक्सिको सरकारनं, मेक्सिको-होंडुरास सीमेतून मेक्सिकोत शिरून अमेरिकेकडं निघालेल्या शेकडो निर्वासितांवर कारवाई करत त्यांना सीमा ओलांडून मेक्सिकोमध्ये यायला प्रतिबंध केला. यानंतर अनेक निर्वासितांनी आपला आणि आपल्या लहान मुलांचा जीव धोक्यात घालत सीमेवरील नदी ओलांडून मेक्सिकोमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला. मेक्सिको सरकारनं हे अमेरिकेशी नुकत्याच झालेल्या कराराचा भाग म्हणून केल्याचं सांगितलं जात आहे.

दरवर्षी दक्षिण अमेरिकेच्या अनेक गरीब आणि अप्रगत देशांमधून उत्तरेकडच्या सधन देशांकडं लाखो लोक निर्वासित होतात. दक्षिण अमेरिकेतलं दारिद्र्य, असुरक्षितता, ड्रग्स आणि ड्रग कार्टेल्सच्या हिंसेतून मुक्त होण्यासाठी अवैध मार्गानं उत्तर अमेरिकेच्या समृद्धीच्या आणि सुरक्षिततेच्या आकर्षणानं घर-दार सोडून निघतात. अशा प्रकारे अवैध प्रवेशाच्या प्रयत्नात दरवर्षी शेकडो लोक आपला जीव गमावतात. अमेरिकेत राष्ट्रपती म्हणून डॉनल्ड ट्रम्प निवडून आल्यापासून या प्रकारच्या निर्वासितांवर आणखी जाचक निर्बंध लावण्यात आले आहेत.

मेक्सिको त्यामानानं निर्वासितांबाबत फार कठोर भूमिका घेतली नव्हती. मात्र अमेरिकेच्या दबावाखाली मेक्सिकोने नुकताच एक करार केला आहे, त्याअंतर्गत मेक्सिको आपल्या अंतर्गत भूभागातून प्रवास करू पाहणाऱ्या अशाप्रकारच्या अवैध निर्वासितांवर निर्बंध लावेल अशी अट आहे. त्याचाच परिणाम म्हणून मेक्सिको सरकारनं 'अभूतपूर्व' पद्धतीनं निर्बंध लावण्याचं आश्वासन अमेरिकेला दिलं आहे.

मंगळवारी सकाळी, प्रामुख्यानं होंडुरास या शेजारच्या देशातला निर्वासितांचा एक जथ्था मेक्सिकन सीमेवरील पुलावर पोहोचला, मात्र मेक्सिकन सरकारनं या जथ्थ्याला प्रवेश नाकारला. समोरून नकार आल्यानं जथ्थ्यातील शेकडो निर्वासितांनी थेट सीमेवरील नदीत शिरून ती ओलांडून मेक्सिकोमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र मेक्सिकोच्या पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत त्यांना मागं जायला भाग पाडलं. "आमची मुलं तहानलेली आहेत, भुकेजली आहेत, आम्हच्याकडं दुसरा काय पर्याय होता?" असं एका होन्डूरन निर्वासित नागरिकानं एजेन्से फ्रांस प्रेसे या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं. 

या निर्वासितांची वैध प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर त्यांना मेक्सिको सरकार त्यांच्या मूळ देशात परत पाठवणार आहे. मात्र या निर्वासितांच्या ८ प्रतिनिधींना मेक्सिकोमध्ये प्रवेश देऊन मेक्सिको सरकारशी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. हे प्रतिनिधी 'कायद्याचं पालन करण्याचं आश्वासन देत असू तर आम्हाला अमेरिकेच्या सीमेपर्यंत जाण्याची परवानगी द्या' अशी मागणी करण्याची शक्यता आहे. मेक्सिको सरकारने, 'निर्वासितांनी मेक्सिकोत राहून  करावं, मात्र त्यांना अमेरिकेच्या सीमेकडे जाऊ  नाही' असं म्हटलं आहे. "ते आम्हाला फसवतायत, ते आत्ता नोंदणी करवून घेतील आणि नंतर आम्हाला वेचून बाहेर काढतील," असं आणखी एक निर्वासित नागरिकाचं मत होतं.