India
मराठवाडा: परभणीच्या अनेक गावांना कधी दिसणार विकासाचा रस्ता, त्रस्त ग्रामस्थांचा प्रश्न
आज मराठवाडा मुक्ती दिनी, परभणीच्या बेहाल गावांची व्यथा.

ज्या भागात तीन-चार दिवसांच्या पावसानं पूर येऊन गावाचा संपर्कच तुटतो, त्या ठिकाणी मूल जन्माला घालणं हे दिव्य असतं. परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात, दुधना नदीला मागच्या आठवड्यात पूर आला आणि एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी चक्क एका थर्माकोलच्या ताराफ्यावरून घेऊन जावं लागलं. ही घटना मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्णमध्ये ८ सप्टेंबर रोजी घडली.
"जिल्ह्यातले रस्ते अजिबात चांगले नसणं, हे मागास असल्याचं लक्षण आहे. रस्त्यांच्या बाबतीत परभणी एवढा दळभद्री जिल्हा दुसरा नसेल. काही वर्षांपूर्वी खराब रस्त्यामुळे सोनपेठच्या नागरिकांनी सतत काही दिवस आंदोलन केले होते. त्यानंतरही सोनपेठच्या रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची तर पार चाळणी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातल्या रस्त्याबाबत कठोर भूमिका घेऊन संबंधितांना जाब विचारण्याची गरज आहे," असं मराठवाड्याच्या परिस्थितीची सखोल जाण असणारे ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले.
"रस्त्यांच्या बाबतीत परभणी एवढा दळभद्री जिल्हा दुसरा नसेल."
औरंगाबाद जिल्ह्यातील अंगद लिंबोरे यांची पत्नी शिवकन्या अंगद लिंबोरे या गर्भवती असल्याने त्यांच्या माहेरी टाकळी नीलवर्णला आल्या होत्या. गेल्या महिन्याभराच्या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळं अनेक ठिकाणी पूरपरिस्तिथी निर्माण झाली. धरणं आणि नद्या भरून वाहत होत्या. परभणीतील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग दुधना नदीत करण्यात आला. नदीला आलेला पूर आणि गावापर्यंत येणारे रस्ते बंद होते, तसेच नदीवर असणाऱ्या एकमेव पुलावरदेखील पाणी आलं होतं, अशी माहिती पीडित महिलेचे भाऊ राहुल कुटारे यांनी इंडी जॉर्नलशी बोलताना दिली. ८ सप्टेंबरला सकाळ पासून शिवकन्या यांना प्रसूतीवेदना होत असल्यानं कुटारे कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन तरी कसं जायचं? शेवटी राहूल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना थर्माकोलच्या तराफ्यावरून तिला घेऊन जायचं ठरवलं.
विठ्ठल वाटोरे गावकऱ्यांच्या अडीनडीला हे तराफे उपलब्ध करतात. या दोन तराफ्यांच्या आधारानं नदी ओलांडताना वाटोरे एक तराफा ओढत होते तर शिवकन्या यांचे दोन भाऊ रमेश आणि राहुल, पोहत दुसऱ्या तराफ्यावर असणाऱ्या शिवकन्या आणि २ महिलांना नदीच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेले. नदी ओलांडल्यानंतर परभणी येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केलं गेलं. वेळेवर दवाखान्यात दाखल केल्यानं शिवकन्या यांची प्रसूती सुखरूप पणे झाली आणि त्यांनी त्यांच्या लहानग्याला जन्म दिला. सध्या आईची आणि बाळाची प्रकृती चांगली आहे.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आली असली आणि अनेक वेगवेगळी सरकारंही येऊन गेली असली, तरी महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्याकडं त्यांची दयाशील नजर गेलेली नाही. एकीकडे श्रीमंती आणि विकास मिरवणारा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील या भागाला ज्या प्रकारच्या हलगर्जीपणातून वागवतो ते पाहून हे लक्षात येते की हा विकास किती असमान झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील विठापूर ते शिर्शी फाटा हा १० गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता १७ किलोमीटरचा आहे. हा रास्ता बनवून घायची मागणी या गावातील गावकरी २००६ पासून करत आहेत. त्यांनी आंदोलनाचे आजवर अनेक मार्ग अवलंबले आहेत, मात्र त्यातील कशाचाच परिणाम सत्ताधाऱ्यांवर होताना दिसत नाही, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे.
याबाबत माहिती देताना स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुधीर बिंदू म्हणाले, "रस्त्याचा प्रश्न आम्ही आजही सोडलेला नाही, पण त्यावर अजून म्हणावं तसं उत्तर मिळालेलं नाही. खासदार म्हणतात आम्ही पंतप्रधान ग्रामीण विकास योजनेमध्ये हे टाकलं आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणतात आम्ही आमच्या माध्यमातून करून घेतो, आमदार म्हणतात मी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन करून करून घेतो, असं सर्व जण आम्हाला आश्वासनं देत राहतात. मात्र प्रत्यक्षात कोणी काहीही काम करत नाही, ना कोणत्या सरकारी कागदावर हे काम आलं आहे."
लोमटे यांनी सांगितल्या प्रमाणे गेल्या आठवड्यात केकरजवळा (ता.मानवत) येथे झालेल्या अपघातात दोन जीव हकनाक बळी गेले. याचं कारण सुद्धा जिल्ह्यातला रस्त्यांचा प्रश्न हेच आहे. गेल्या अनेक महिन्यापासून परभणी ते मानवत रोड हे रस्त्याचं काम रखडलं आहे. या रस्त्याची विदारक स्थिती पाहू जाता गेल्या अनेक महिन्यांपासून परभणीहून उमरी मार्गे पाथरी अशी वाहतूक सुरू आहे.
सरकारनं या प्रश्नाची दखल घ्यावी म्हणून इथल्या गावकऱ्यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मतदानावरदेखील बहिष्कार टाकला होता होता. मात्र त्याचा परिणाम उलटा झाला, असंही या भागातील लोक मानतात. गावातील लोकांनी मतदान केलं नाही म्हणून आता जिल्ह्यातले पुढारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असं ते सांगतात.
नंदकिशोर पारंडे परभणीतील लासिना गावात राहतात. त्यांच्याकडे २७ म्हशी होत्या. लासिनातून ते रोज सोनपेठ म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी दूध विकायला जायचे. गावाला सोनपेठशी जोडणारा रस्ता कच्चा असल्यानं त्यांना अनेक कसरती कराव्या लागत. वाहतूक करताना कधी दूध सांडत होतं, तर कधी चिखलातून गाडी घेऊन जावं लागत होतं. कित्येक वेळा तर आधीच खराब असणारा रस्ता पावसानं आणखीच खराब झाल्यानं गाड्याच जाऊ शकत नसत.
त्याबाबत पारंडे सांगतात "या दीड-दोन वर्षात जवळपास पंधरा लाखाचा नुकसान झालंय. एक तर दुधाचा भाव हा मुद्दा आहेच, पण सर्वात किचकट रस्त्याचा प्रश्न होता. आम्ही दररोज २०० लिटर दूध विकायचो, मात्र रस्त्यानं जाणंच कठीण झालं होतं. दररोज दूध सांडायचं. त्यातून होणार नुकसान खूप जास्त होतं, म्हणून सर्व म्हशी विकून आम्ही आता शेती करतोय."
की आता शेतीही बंद करायची?
मात्र आता शेतीत जे पिकवत आहेत ते बाजारपेठेपर्यंत कसं घेऊन जायचं, की आता शेतीही बंद करायची, असं दुर्दैवी द्वंद्व पारंडे परिवाराच्या समोर आजही उभं आहेच.
शिवसेनेशी संलग्न कार्यकर्ते कृष्णा पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन चर्चा देखील केली आहे. हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून निर्माण व्हावा म्हणून मागणी देखील केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पिंगळें इंडी जर्नलला सांगतात की दिवाळी पासून या रस्त्याचं काम सुरु होईल.
परभणीचे ग्रामविकास योजनेचे अधिकारी, या प्रश्नाविषयी इंडी जर्नलनं चौकशी केली असता, त्या माहितीसाठी तुम्हाला रीतसर ईमेल पाठवाव लागेल असं म्हणाले. मात्र ईमेल आयडी पाठवतो असं त्यांनी सांगूनही नंतर कोणताही संपर्क त्यांच्याशी होणं शक्य झालं नाही.
परभणी जिल्ह्याच्या वार्षिक योजना २०१८-१९च्या अहवालानुसार महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, यांच्याकडील 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजना' या योजनेसाठी रु.२२८४.३५ लाख इतकी रक्कम मंजूर झाली होती. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२१-२२ नुसार मराठवाड्याला रु. २५०० कोटी मंजूर हे रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर झाले आहेत.
या निधीची विल्हेवाट कशी लागली, त्याचं परिवर्तन चांगले रस्ते आणि उत्तम वाहतूक व्यवस्था यात का झालं नाही, नक्की घोडं कुठं अडतंय, हे एखाद्याला न उलगडणारं कोडं वाटावं, अशा परिस्थतीत इथली गावं आपलं जीवन जगत आहेत. पत्रकारांना मिळोत ना मिळोत, मात्र इथल्या ग्रामस्थांना तरी त्यांच्या व्यथांची उत्तरं मिळतील, अशी अपेक्षा मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त एक सामान्य व्यक्ती नक्कीच करू शकतो.