Quick Reads

पुस्तक ओळख: माध्यमांची पोल-खोल करणारं 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट'

माध्यमांच्या विश्लेषणातलं एक जग पालटणारं पुस्तक

Credit : Raptis Rare Books

माध्यमं. आज आपण माध्यमांच्या इतक्या सान्निध्यात राहतो, की आपल्याला आता वास्तव जग आणि आपली समज, यांच्यामध्ये माध्यमांची कुबडी घेतल्याशिवाय कशाचाही अर्थ लागतच नाही. म्हणजे समजा, तुमच्या शहरातल्या एका रस्त्यावर काही लोकांचा मोर्चा निघाला. कदाचित तुमच्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर. तुम्ही एक नागरिक म्हणून त्याबाबत, त्यातल्या मुद्द्यांबाबत काहीच दखल, साहसा तरी घेणार नाही. पण थोड्याच वेळात टीव्हीवर तो तुमच्याच शहरातला मोर्चा 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून दाखवला गेला, तर तुम्ही जेवता-जेवता आपल्या घरातल्यांशी, फोनवर मित्रांशी किंवा सोशल मीडियावर इतरांशी त्याची चर्चा करू लागता. म्हणजे जो मोर्चा तुमच्या जवळच घडत होता, त्याबाबत तुम्हाला फरक तेव्हाच पडला, जेव्हा माध्यमांनी तुम्हाला दखल घेण्याबद्दल सूचित केलं! 

यालाच, नोम चॉम्स्की आणि एडवर्ड हर्मन, हे प्रसिद्ध अमेरिकी भाषा व माध्यम तज्ञ म्हणतात, 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट', अर्थात, 'निर्मित संमती'. नोम चॉम्स्की हे विख्यात भाषा शाश्त्रज्ञ आहेत. त्यांनी आयुष्यभर अनेक महत्त्वाच्या थियरी व भाषाशास्त्रीय मॉडेल विकसित केले. एडवर्ड एस. हर्मन, हे माध्यम विश्लेषक आहेत. या दोघांनी, १९८८ मध्ये एकत्र येऊन, माध्यमांना समजून घेण्याचं, त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांचा परिणाम समजून घेण्याचं मॉडेल म्हणून 'प्रोपागंडा मॉडेल' मांडलं आणि त्याबाबत लिहिलेलं त्यांचं पुस्तक म्हणजे 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट'. 

लोकशाहीमध्ये किंवा लोकाभिमुख व्यवस्थेमध्ये, सरकार काय असतं? तर सरकार अशी एक यंत्रणा असते, ज्यात सामान्य माणूस, किंवा नागरिक, त्याच्या वतीनं कारभार सांभाळायची शक्ती एका व्यवस्थेला प्रदान करतो. हे सरकार म्हणजे जनतेचं प्रतिनिधित्व करणारी कारकुनी व्यवस्था. पण या व्यवस्थेचा वापर करून, समाजातील विशिष्ट वर्ग, सामान्य जनतेकडून हा अधिकार आणि संपत्ती गडप करू पाहत असतो. हा वर्ग, श्रीमंत धनिक, उद्योजक, राजकीय वर्चस्व असलेले गब्बर नेते, अशा 'उच्च' व्यक्तींनी बनलेला असतो. त्यांना आवडत नसतं, की ते जे सार्वजनिक संपत्तीची लूट करत आहेत, त्यावर जनतेचं नियंत्रण असावं.

यांच्यावर जनतेच्या बाजूनं वाचक ठेवावा, म्हणून निर्माण झाली माध्यमं. या वरच्या वर्गातल्यांचे भ्रष्टाचार पकडणं, त्यांचा खोटेपणा उघडकीस आणणं, त्यांना जनतेच्या प्रश्नांना आणि जनतेच्या हितासाठी जबाबदार धरणं, हे माध्यमांचं काम. म्हणजे माध्यमं ही इमारतीतल्या चौकस चौकीदाराप्रमाणे असावीत, जी इमारतीत सर्वांच्या सार्वजनिक मालमत्तेची चोरी आणि नुकसान होऊ देणार नाहीत. मात्र या वरच्या वर्गाला, या माध्यमांना नियंत्रिक करण्याची आणि माध्यमांचं स्वरूप उलटं करून उलट त्यांना वरच्या वर्गाच्या हितासाठी जनतेच्या विरोधात होणं शिकवता आलं. हे या वर्गाला कसं जमलं, याची चर्चा आणि सखोल उलगडा म्हणजे हे पुस्तक.

या पुस्तकात माध्यमं सत्ताधारी वर्गाच्या बाजूनं कशी काम करतात, याचा विस्तारानं उलगडा केला गेला आहे. सरकार जर लोकशाही असेल, तर त्याला प्रत्येक निर्णयासाठी जनतेची 'कन्सेंट' अर्थात संमती घेणं भाग आहे. अशावेळी, सरकार माध्यमांचा वापर करतं आणि जनतेच्या मनात असे विषय पेरतं, ज्यानं जनतेला सरकारचा निर्णय किंवा धोरण मान्यच करावं लागतं. म्हणजे सत्ताधारी वर्गाचा नफा एखाद्या गोष्टीत असेल, उदा. एखाद्या युद्धात शस्त्रास्त्र विकणाऱ्या कंपनीचा नफा असेल, तर सरकार त्या युद्धासाठी जनतेचा पाठिंबा मिळावा अशा पद्धतीनं माहिती पेरत जाते आणि माध्यमांनी केलेल्या जादूने, जनता या युद्धाला समर्थन द्यायला संमत होते, अशी ही एकूण मांडणी आहे.  तर चॉम्स्की आणि हर्मन आपल्याला सांगतात, की हे कसं शक्य केलं जातं.

या पुस्तकात ते ५ फिल्टर्सची मांडणी करतात जी माध्यमांना लावली जातात. फिल्टर म्हणजे चाळणी. या चाळण्यांमधून माहिती आरपार गेली की तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत सत्ताधाऱ्यांना सोयीची झालेली असते. यातली पहिली चाळणी म्हणजे माध्यमांच्या मालकीची. तुमची माध्यमं कोणाच्या मालकीची आहेत, त्यांच्या मालकांचे हितसंबंध कोणाशी आहेत यावरून त्या माध्यमाची दिशा कळते. सहसा हे मालक या उच्च वर्गातलेच असल्यामुळे ते त्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू देणार नाहीत. दुसरी चाळणी म्हणजे जाहिराती. जाहिरातींना माध्यमांच्या कमाईचा मुख्य स्रोत बनवलं की माध्यमं जाहिरातदारांना नाराज न करता काम करावं लागतं, त्यामुळं पुन्हा विशिष्ट वर्गाचे हितसंबंध सुरक्षित राहतात आणि माध्यमं जशी तुम्हाला जाहिराती विकतात तशी ती त्याचवेळी जाहिरातदारांना तुमची बुद्धी आणि सहमती विकत असतात.

यातली तिसरी चाळणी म्हणजे बातमीदारीतला स्रोत. अनेकदा, बातमीदारी ही सत्तेतल्या लोकांबद्दल असते. एखाद्या पत्रकाराला बित्तम्बात्मी आणायची असेल, मोठी बातमी मिळवायची असेल, तर या वरच्या वर्गात स्वतःला सामील करून घ्यावं लागतं, मैत्री करावी लागते. अशाने पत्रकारच त्या व्यवस्थेचा एक भाग बनून जातो आणि अर्थातच मग तो हितसंबंध जपू लागतो. जर एखादा पत्रकार या हितसंबंधांना क्षती पोहोचवू लागला, तर येते चौथी चाळणी, आणि ती म्हणजे नाराजी. त्या वर्गाची तुमच्यावर नाराजी झाली, की तुम्हाला मुलाखत मिळणार नाही, तुम्हाला बातम्या मिळणार नाहीत, तुम्हाला माहिती दिली जाणार नाही, तुम्हाला बदनाम केलं जाईल आणि तुम्ही वेगळे पडाल. आता शेवटची चाळणी म्हणजे शत्रू. जनतेसमोर या यंत्रणेतून एक असा शत्रू उभा करायचा, की जनता बाकी सगळं विसरून त्या शत्रूच्या भीतीने थेट सत्ताधार्यांना शरण जाईल.

म्हणजे बघा, जी व्यवस्था तुमच्या बाजूनं लढण्यासाठी होती, तीच तुमच्या बुद्धीचा ताबा घेऊन तुमच्या नकळत तुमची संमती मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते. या पुस्तकात लेखकांनी संदर्भ आणि अनेक बातम्यांचं सखोल विश्लेषण करत आपला दावा सिद्ध केला आहे. त्यात अमेरिकेच्या माध्यमांचे आणि काहीसे जुने संदर्भ असले तरी त्यातून मिळणारी दृष्टी आजही आणि आपल्याकडेही उपयोगी आहे. आज देशात अनेक ठिकाणी अनेक आंदोलनं होत आहेत. या आंदोलनाची माहिती, तुमच्या शेजारी घडत असली, तरी तुम्हाला मिळत आहे ती माध्यमातूनच. आज आपल्याही देशाला एक सत्ताधारी वर्ग आहे. या वर्गाचेही हितसंबंध आहेत. या पुस्तकाच्या मदतीनं या चाळण्या ओळखून बघा. आसपास बघा या ५ चाळण्यांमधून तुम्हाला काय करायला सांगितलं जात आहे, कोण माध्यमांचे मालक आहेत, कोण जाहिरात देतायत, कोणते पत्रकार सत्तेशी जवळीक बाळगतात, कोणत्या पत्रकारांना सत्ता शिक्षा देतीये आणि शेवटी कोणता शत्रू तुमच्यासमोर उभा केला जातोय. उघडा मग डोळे आणि स्वतःच्या डोळ्यांनी, बघा नीट.

 

पुस्तक: मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट 

प्रकाशक: व्हिंटेज बुक्स 

किंमत: ४१९ रुपये 

(हा लेख पहिल्यांदा दिव्य मराठी दैनिकात संपादित स्वरूपात प्रकाशित.)