India
मालेगावमध्ये कापडउद्योगातील कामगार रस्त्यावर
राष्ट्रीय टाळेबंदीमुळे इथला कामगार वर्ग पूर्णपणे बेरोजगार झाला आहे.
- अजित रत्नाकर
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे राज्याच्या केंद्रस्थानी आलं आहे. अत्यंत घनदाट लोकवस्ती असलेल्या या शहरात कोरोनाच्या प्रसाराचा वेग आणि मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. रुग्णांच्या संख्येनुसार आरोग्यसुविधा अपुऱ्या आहेत. एकीकडे कोरोनाशी सामना करणं हे मालेगावकरांसमोरचं मोठं आव्हान असताना ढासळत्या अर्थव्यवस्थेशीही दोन हात करणं कठीण होऊन बसलं आहे.
मालेगावची देशातली ओळख म्हणजे हातमाग व्यवसायात अग्रेसर असलेलं शहर आणि दुसरी ओळख म्हणजे कायदा-सुव्यस्थेच्या दृष्टीने संवेदनशील शहर. २००६, २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी, अनेकदा झालेल्या लहानमोठ्या दंगलींनी या शहराला हादरवून सोडलं असलं तरी इथला श्रमिक वर्ग पुन्हा जिद्दीने उभा राहिला आणि त्यानेच हे शहर जिवंत ठेवलं. आज कोरोनाचा प्रसार आणि अनुक्रमे टाळेबंदीमुळे तोच श्रमिक देशोधडीला लागण्याचं चित्र दिसत आहे. इथला हातमाग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. आधीच नोटबंदी आणि जीएसटीमुळे हा व्यवसाय अडचणीत आला होता. या व्यवसायात मुस्लीम समूह सर्वाधिक प्रमाणात कार्यरत आहे. मालेगावातील स्थानिक आणि उत्तर प्रदेश, बिहार येथून स्थलांतरित झालेले मजूर या हातमाग, यंत्रमागावर काम करतात. त्याचबरोबर इथला स्थानिक बौद्ध समाजदेखील हातमाग, यंत्रमाग व्यवसायातला कामगार आहे.
सध्या राष्ट्रीय टाळेबंदीमुळे इथला कामगार वर्ग पूर्णपणे बेरोजगार झाला असून कामगारांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे. ही बिकट परिस्थिती बघता परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे निघून गेले आहेत तर स्थानिक मजूर बिकट अवस्थेत जगत आहेत.
कालच रमजान ईद पार पडली. मुस्लीम धर्मियांसाठीचा महत्त्वाचा समजला जाणारा संपूर्ण रमजान महिनाही प्रचंड आर्थिक अडचणीत गेलेला आहे. या महिन्यात गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. त्यासाठी मुस्लीम समुदाय एकत्रितपणे काही रक्कम जमा करतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक ‘जकात’ म्हणून जी रक्कम गोळा करतात, त्यातून अनेक उपयुक्त कामं केली जातात. गरीब-गरजू कुटुंबातल्या मुलींची लग्न, अंध- अपंग नागरिकांना मदत, शिक्षणासाठी मदत अशी विविध प्रकारची मदत गरजूंना या महिन्यात केली जाते मात्र, लॉकडाऊनमुळे यंदा यावरही मर्यादा आली आहे.
एकूणच मालेगावमधल्या ठप्प झालेल्या कापड व्यवसायाबद्दल इथले तरुण व्यापारी राहुल सोनार यांनी इंडी जर्नलला सांगितलं, "मला महिन्याला चार टन आडवा धागा आणि चार टन उभा धागा असा आठ टन माल लागतो. एक टन मालासाठी लाख रुपये मोजावे लागतात. कारागीर, मजुर, हमाली, ट्रान्सपोर्ट, मेंटेनन्स यांचा खर्च दोन ते अडीच लाख...असे दहा ते साडेदहा लाख रुपये दरमहिना यात गुंतवावे लागतात. सध्या काम पूर्ण ठप्प आहे आणि फेब्रुवारीपासून जो माल पुरवला आहे, त्याचं पेमेंटच आलेलं नाही. हातात खेळतं भांडवल नाही.’’ सोनार त्यांच्या कारखान्यातील कामगारांच्या अवस्थेबद्दल सांगतात, "माझ्याकडे काम करणाऱ्या बाराएक मजुरांना मी मागचे दोन जमेल तशी आर्थिक मदत केली. त्यावर त्यांची रोजी चालली पण, रमजान महिना, ईदसारख्या सणासाठी अनेक मजुरांनी पैशांची मागणी केली होती पण मी स्वतः हतबल असल्याने जास्त काही करू शकलो नाही. आमचा पैसाही मार्केटमध्ये अडकल्याने आता काम करणाऱ्या मजुरांनाही अजून आर्थिक मदत करणं शक्य नाहीये.’’
मालेगाव शहरातले आणखी एक यंत्रमाग व्यावसायिक सांगतात, "सध्या कोरोनामुळे स्थिती भयंकर अवस्थेत आहे. त्यामुळे पुन्हा हा व्यवसाय कधी सुरू होईल? याची शाश्वती नाही. काही महिन्यांनी कोरोना आटोक्यात आला तरी व्यवसाय पुन्हा सुरु करणं कुणालाच शक्य नाही. एखाद्याने प्रयत्न केला, तर तो महिनाभरही टिकू शकणार नाही. शिवाय लूमवर काम करताना डिस्टन्स पाळणं शक्य नाही, कारण मशीनचा धागा तुटला तरी दोन कारागीरांना एकत्र मिळून तो लावावा लागतो आणि कांडी भरणाऱ्याला प्रत्येक मशीनवर स्वत: जाऊन रिकाम्या कांड्या गोळा कराव्या लागतात. त्यामुळे हा उद्योगच असा आहे की यात सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही.’’
शहरात दोन ते तीन लाख नोंदणीकृत पावरलूम्स (यंत्रमाग) आहेत. नोंदणी न केलेल्या पावरलूम्सची संख्याही जवळपास तेवढीच आहे. संपूर्ण शहरात साधारण दोन ते अडीच लाख कामगार या लूम्समध्ये काम करतात. त्यापैकी ८० टक्के कामगार हे मुस्लीम आहेत. यात तरुणांची संख्या अधिक असून ते महिन्याकाठी आठ ते दहा हजार रुपये या कामातून कमावतात. नूरबाग परिसरातील तिशीचा एक तरुण अल्ताफ शेखनं सांगितलं, "लॉकडाऊनमुळे सर्वच कामगार परेशान आहेत. खूप लोकांना मदत मिळत नाहीये. सुरुवातीला लूम मालकांनी थोडी-थोडी मदत केली, आता तेही बंद झालंय. अख्खा रमजान महिना असाच गेला. ना रोजे चांगले झाले ना ईद. पावशेर खजूर आणून दोन-तीन दिवस पुरवत होतो. इफ्तारीच्या वेळी घरातल्या प्रत्येकानी फक्त एकेक खजूर खायचा. फळं नाही की काही नाही. नाही तर दरवर्षी आम्ही रोजा सोडताना फळं आणि भरपूर काही खायचो. आता माझ्याजवळ काहीच पैसा उरला नाही. थोडाफार पैसा होता, तो टायफॉईडच्या उपचारासाठी घालवला. झोपडपट्टीत साथ आली होती टायफॉईडची...मग खासगी दवाखान्यात झाला खर्च.’’
इथल्या लूम्समध्ये काम करणाऱ्या कामगारांची एक वेगळीच कार्यसंस्कृती आहे. सर्व कामगारांना दर महिन्याऐवजी दर आठवड्याला पगार दिला जातो. साधारण २३०० रुपये ते ३००० रुपये आठवड्याला दिले जातात. शुक्रवार हा सुट्टीचा दिवस असतो. बहुसंख्य कामगार मुस्लीम असल्याने या सुट्टीच्या दिवशी ते सामूहिक नमाज अदा करतात. आठवड्याभराचा किराणा खरेदी करतात, बाजारात फिरतात, घटकाभर मनोरंजन करतात तसंच हा दिवस त्यांच्यासाठी गोडधोड, चिकन-मटण इ. बनवून खाण्याचा दिवस असतो. कोरोनामुळे मात्र आता त्यांच्यासाठी हे सारंच दुरापास्त झालेलं आहे आणि दोन वेळच्या खाण्याचीच विवंचना आहे. यामध्ये परिस्थितीनं सर्वाधिक गांजला गेलाय तो इथला हमाल आणि रजफणी भरणारा कारागीर. हमाल कोणत्याही एका कारख्यान्यात नोंदणीकृत कामगार म्हणून काम करत नाहीत, तर ते चार ते पाच वेगवेगळ्या कारखान्यांचं सामान इकडून तिकडे वाहून नेतात. या कामाचं ठराविक असं प्रमाण, वेळ नसतो. जो कारखानदार ज्या दिवशी बोलवेल, त्यादिवशी त्याचा माल वाहून नेऊन ठरलेल्या ठिकाणी टाकायचा, अशीच गत फणी भरणाऱ्यांची. त्यामुळे हमाल आणि फणी भरणारे पूर्णपणे असंघटित. त्यामुळेच मागील दोन महिन्यांत त्यांना काहीही पैसे कुणाकडूनही मिळाले नाहीत आणि कारखानदारही त्यांना काही मदत देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे हमाल आणि फणी भरणारे सध्या तरी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवर जगत आहेत.
पावरलूम उद्योग म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये यंत्रमागावरील कापड व्यवसायासाठी काही शहरं प्रसिद्ध आहेत. इचलकरंजी (कोल्हापूर), भिवंडी (ठाणे), धुळे आणि मालेगाव (नाशिक). मालेगाव शहराचा हा प्रमुख व्यवसाय आहे किंबहुना शहराची अर्थव्यवस्था याच उद्योगावर अवलंबून आहे.
या व्यवसायात यंत्रावर कापडनिर्मिती केली जाते. या प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत. साईजिंग, लूम आणि अड्डाकाम. अडड्यावर धाग्यांची निर्मिती होते व तेथून त्यावर प्रक्रिया होऊन कापड तयार केलं जातं. पाॅलिस्टर, काॅटन आणि या दोहोंच्या मिश्रणातून ‘रोटो’ या कापडाची निर्मिती होते.
हातमाग म्हणजे काय? यंत्राप्रमाणेच चरख्यावरदेखील धागा विणला जातो, यालाच "तरासन" भरणे असं म्हटलं जातं. तरासन हे मशिनवरदेखील भरलं जातं. साईजिंगमध्ये विणलेल्या धाग्यावर प्रक्रिया करतात. त्यामुळे धागा सुटसुटीत होतो. यामध्ये कांजी नावाचा पदार्थ मिसळला जातो. कांजी एकप्रकारे फेवीकॉलचं काम करते. साईजिंगच्या बॅायलरवर कांजी तापवली जाते. त्यानंतर कापडासाठी तयार झालेला माल गुजरात राज्यातील सुरत, बडोदा, अहमदाबाद आणि मुंबईलाही पाठवला जातो. त्यावर आणखी प्रक्रिया होऊन कापड तयार होतं आणि ते विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होतं.
एकूणच कापड तयार करण्याधीच्या ज्या प्रक्रिया केल्या जातात, त्यात सायजिंग प्रोसेस आणि अड्डा काम (रंगारी / साडी काम) जास्त किचकट आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही घातक आहे. रंगारी कामात, सुती कापडास रंगाच्या भट्टीत टाकून वेगवेगळ्या रंगाच्या शेडस् दिल्या जातात, त्यापासून नऊवारी साडीही तयार होते. या साड्या तयार करण्याची प्रक्रिया मोठी खडतर आहे. इथं काम करणाऱ्या कामगाराला भट्टीसमोर उभं राहून काम करावं लागतं. मग, रंगाच्या डब्ब्यात हाताने सुताला पिळ देऊन त्यात रंग मिसळला जातो व वाळत घातला जातो. पुढे इतर प्रक्रिया होऊन ते कापड बाजारात जातं. अशी सर्व प्रकारची कामं करणाऱ्या कामगारांना आधीपासूनच श्वसनसंस्थेचे आजार आहेत. सतत पावरलूममध्ये काम केल्याने या कामगारांच्या छातीत रंगांचे छोटे कण, धागे, धूळ जाऊन त्यांची श्वसनयंत्रणा आधीच कमजोर झालेली आहे, त्यात मालेगावमध्ये टीबीचा प्रादुर्भावही प्रचंड आहे. इथल्या लोकांना सतत अनारोग्यात जगावं लागतं, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे.
अतिप्रचंड गरिबी, शिक्षणाचा अभाव, एकंदरीत निकृष्ट पर्यावरण यामुळे हे काम पिढीजात स्वरूपात सुरू आहे. अनेक मुस्लीम कुटुंबातील बाप-लेक-भाऊही एकत्र लूम्सवर काम करत आहेत. शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या इतर संधींच्या अभावामुळे तुटपुंजे पैसे आणि ढीगभर आजारांच्या मोबदल्यात लूम्सवर काम करण्याव्यतिरिक्त या लोकांच्या हातात दुसरं काहीही नाही. दहा बाय दहाच्या खोलीत, प्रचंड अस्वच्छता, दाटीवाटी, कोंदट हवामान असलेल्या झोपडपट्टीत राहून, अनेक आजारांना आमंत्रण देत आणि आता कोरोनाचा सामना करत जीव मुठीत धरून इथला कापडउद्योगातला कामगार जगतो आहे.
पावरलूम, हॅंडलूम्सचा इतर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. कारखाने असलेल्या भागात चहाच्या टपऱ्या, फळांच्या हातगाड्या आणि इतर छोटीमोठी दुकानं असत. याठिकाणी दिवस रात्र वर्दळ असे. पण आता कारखानेच बंद असल्याने ही छोटी दुकानं - व्यवसायही बंद पडले आहेत. यंत्रांची देखभाल-दुरुस्ती करणारे, बेरिंग विक्रेते, हातगाडीवाले सर्वचजण घरी रिकामे बसून आहेत.
एकूणच मालेगावमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं कहर केलाय तर दुसरीकडे संपूर्ण कापडउद्योग ठप्प झालाय, या उद्योगाला नि त्यावर आधारित अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरता त्वरित धोरणं आखली तरच इथला कामगार तग धरू शकतो अन्यथा रोगराई किंवा उपासमारीने मृत्यू अशा कोंडीतून तो बाहेर पडू शकणार नाही.