India

महिला व बाल विकास विभागाच्या भरती प्रक्रियेत फेरफार झाल्याचे आरोप

भारतीय जनवादी युवा संघटनेने विभाग आयुक्तांकडे झालेल्या निवडीचा पुनर्विचार करण्याची मागणी केलेली आहे.

Credit : महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभागातल्या भरतीमध्ये चुकीची प्रक्रिया राबवून, अनेक पात्र उमेदवारांचा हक्क डावलल्याचा आरोप राज्यातील जवळपास १० उमेदवारांनी केला आहे. अनेक पात्र उमेदवार असतानाही, अनुभव आणि पात्रता नसणाऱ्या उमेदवारांची नावं, निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीत आल्याचा आरोप या उमेदवारांनी, महिला व बाल विकास आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे. भारतीय जनवादी युवा संघटनेने (DYFI) विभाग आयुक्तांकडे झालेल्या निवडीचा पुनर्विचार करण्याची मागणी केलेली आहे. 

"या भरतीमध्ये अनेक उमेदवार पात्र असतानादेखील त्यांना त्यांच्याकडे चुकीची कागदपत्रं असल्याचं सांगून बाद ठरवण्यात आलं आहे, आणि ज्यांना अनुभव नाही, अशा उमेदवारांना पात्र ठरवलं आहे. त्यामुळं संपूर्ण भरतीप्रक्रियेत फेरफार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही,"  एका उमेदवाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. 

तो पुढे म्हणाला, "निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझ्यासारख्याच अनेक उमेदवारांची नावं आली असूनही आम्हाला कागदपत्रं चुकीची असण्याचं कारण देऊन डावलण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे आमचा अनुभव वेगळ्या विभागांमधला असल्या कारणानं, आमची अनुभव कागदपत्रं, या पदांसाठी बरोबर नसल्याचं ठरवलं गेलं. पण हे निकष उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी का सांगितले गेले नव्हते? माझ्यासारख्याच बऱ्याच जणांना इतर विभागांचा अनुभव आहे. माझं नाव यादीत सर्वप्रथम आहे, तरीही माझी मुलाखतदेखील न घेता मला या भरतीसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे."

याविषयी इंडी जर्नलशी बोलताना भारतीय जनवादी युवा संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर मोटे म्हणाले, "साधारण १० ते १५ उमेदवारांनी भरतीप्रक्रियेत फेरफार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, आणि त्यांची यादी व संपर्क क्रमांक महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्तांना त्या उमेदवारांनी, आणि आम्हीदेखील सुपूर्द केलेली आहे. पण याविषयी अधिक चौकशी करण्याचं आश्वासन देण्याऐवजी आयुक्तांनी हे सगळे आरोप व्यक्तिशः घेऊन, आमचं निवेदनही स्वीकारण्यास नकार दिला. आम्ही उद्या (म्हणजेच बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी) परत एकदा आयुक्तांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत."

या अटीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांपैकी एक उमेदवार पुणे जिल्ह्यातील असल्याची व तरीही त्यांना पात्र ठरवलं गेल्याची माहितीदेखील मोटे यांनी आयुक्तांना दिल्याचे सांगितले आहे. 

"भरतीप्रक्रियेतील एका पदासाठी उमेदवार सामाजिक पदव्युत्तर (Masters in Social Work - MSW) असणं आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातील निवड झालेला एक उमेदवार अपात्र असण्याची आमच्याकडे खात्रीशीर माहिती आहे, पण शासकीय चुकीमुळे होऊ शकणारी उमेदवाराची बदनामी टाळण्यासाठी आम्ही त्याचे/तिचे नाव जाहीर न करता, आयुक्तांना दखल घेण्यास सांगितले," मोटे यांनी सांगितले. 

भारतीय जनवादी युवा संघटनेने जाहीर केलेली उमेदवार यादी रद्द करून नवीन यादी जाहीर करण्याची मागणी महिला व बाल विकास विभागासमोर ठेवली आहे. 

संघटनेने असाही आरोप केला आहे की विभागाने जेव्हा १७ सप्टेंबर २०१९ रोजी भरतीसंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात दिली, त्यावेळी भारतीप्रक्रियेबाबत कोणतेही निकष त्यामध्ये जाहीर केले गेलेले नव्हते. "जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, तेव्हाच पात्रतेचे निकशदेखील जाहीर करण्यात आले. यामुळेच मर्जीतील उमेदवार यादीत वरच्या स्थानी यावे अशाप्रकारे निकष तयार केल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच, एकूणच प्रक्रियेत काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय आम्हाला आहे," मोटे यांनी स्पष्ट केले. ते असेही म्हणाले की अनेक उमेदवारांचे संबंधित अनुभव नाकारून, MSCIT पास असण्यासारख्या निकषांवरून अनेक उमेदवारांना प्राधान्य दिले गेले आहे. 

याबाबत विचारले असता विभाग आयुक्त ऋषिकेश यशोद यांनी सांगितले की त्यांना या १० उमेदवारांच्या आक्षेपाबद्दल यापूर्वी काही माहिती नव्हती, आणि ते लवकरच या प्रकरणाची शहानिशा करतील. 

ते पुढे म्हणाले, "ज्या उमेदवारांचे अर्ज अपूर्ण आहेत, त्यांना आम्ही तसा शेरा दिलेला आहे, आणि ज्यांची अनुभवसंदर्भातील कागदपत्रं चुकीची असल्याचं आढळून आलं होतं, त्यांना ते कळवण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त ज्यांचे अर्ज पूर्ण आहेत, आणि ज्यांची कागदपत्रं योग्य आहेत, अशा सर्व उमेदवारांची नावं याद्यांमध्ये असून, त्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत."

यापलीकडे बाकी कुठल्याही मुद्द्यावर आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर प्राप्त झालं नाही.