India

कोरोनामुळे महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष

शिक्षकांच्या मृत्युमुळं इतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Credit : इंडी जर्नल

राहुल शेळके । गेल्या वर्षभरापासून कोरोनानं थैमान घातलेलं आहे. त्यात भारतात डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या कमी असल्यानं त्यांच्यावर असलेल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी सरकारी शाळेतील शिक्षकांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणीचं आणि लसीकरण मोहिमेचं काम करावं असा शासनाचा आदेश आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नागरिकांच्या तपासणीच्या कामावर असताना काही जिल्हा परिषद शिक्षकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. आता पर्यंत महाराष्ट्रात २०० शिक्षकांचा मृत्यु झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांना नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्राणवायू आणि तापमान पातळी तपासण्याची मोहीम सरकारद्वारे राबवली जात आहे. त्यात शिक्षकांना सरकारद्वारे तापमान तपासणी यंत्र, प्राणवयू तपासणी यंत्र, वैद्यकीय हातमोजे आणि मुखपट्टी देण्यात आली होती. त्यात काही शिक्षकांना पिपीइ किट मिळालेले नाहीत असं दिसून आलं.

 

जिल्हा परिषद शिक्षकांना नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्राणवायू आणि तापमान पातळी तपासण्याची मोहीम सरकारद्वारे राबवली जात आहे.

 

विशाल धुमाळ हे जिल्हा परिषद शिक्षक आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, "सरकारनं कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणीचं आणि जनजागृतीचं काम आम्हाला दिलं आहे. आम्हाला दोन तपासणी यंत्रांव्यतिरिक्त अजून काहीही दिलेलं नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काम करत आहोत, त्यामुळे घरच्यांनाही कोरोना होण्याचा धोका संभवतो, अशा वेळेस सरकारनं आम्हांला आर्थिक सुरक्षा पुरवावी आणि आमच्या सर्व कुटुंबाला विमा संरक्षण देण्यात यावे."

लसीकरणाची मोहीम चालु झाल्यापासून या शिक्षकांचं काम अजून वाढलं आहे. लसीकरणाबद्दल जनजागृती करणं, नागरिकांच्या लसीकरण नोंदणी मधील समस्या दूर करणं, लसीकरण केंद्राची माहिती देणं अशा प्रकारची कामं शिक्षकांना करावी लागत आहेत. 

शिक्षिका रुपाली परदेशी यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, “सरकारनं कोरोना काळात अशी कामं लावणं चुकीचं आहे. आम्हाला घरचं काम करावं लागतं, त्यासोबत ऑनलाईन पद्धतीनं तासिका घेतल्यानंतर पुर्ण दिवस लसीकरण मोहीम आणि तपासणी मोहीम राबवावी लागते. घरात लहान मुलं असल्यामुळं त्यांना सांभाळून परत यासर्व गोष्टींचा ताण सहन करावा लागत आहे. लहान मुलांना कोरोना होण्याचीही भीती असते. त्यात सरकारने आम्हाला आर्थिक सुरक्षा दिलेली नाही.”

 

"आम्हाला घरचं काम करावं लागतं, त्यासोबत ऑनलाईन पद्धतीनं तासिका घेतल्यानंतर पुर्ण दिवस लसीकरण मोहीम आणि तपासणी मोहीम राबवावी लागते."

 

कोरोना नियंत्रण कक्षात कामाला असणाऱ्या विशाल लोंढे यांनीही असं सांगितलं की, “मी कोरोना नियंत्रण कक्षात कामाला आहे त्यामुळे कोरोना रुग्णांचे सारखे फोन येत असतात. नागरिकांना रुग्णालया सबंधीत सर्व माहिती द्यावी लागते. सकाळी कामाला लवकर यावे लागते त्यामुळे शाळेचे काम आणि विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. कधी कधी ऑनलाईन वर्ग घेणे अवघड होऊन जाते त्यामुळे अर्धे वर्ग सकाळी आणि अर्धे संद्याकाळी असे नियोजन करावे लागत आहे.”

कोरोना काळात शिक्षकांच्या मृत्युमुळे इतर शिक्षकांच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी सरकारकडे आरोग्य विषयक सुविधांच्या मागण्यांसाठी आग्रही आहेत  

कविता गवळी म्हणाल्या, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक शिक्षकांच्या मृत्युच्या घटना समोर येत आहेत. घराबाहेर पडताना आता भीती वाटत आहे अशा वेळेस सरकारने आमच्या आरोग्याच्या रक्षणासाठी विमा योजनेची तरतूत करावी तसेच ज्या शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे अशा शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्माच्याऱ्यांना आर्थिक मदत करावी.”

त्यात कोरोनाच्या कामावर असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण जलद गतीने पुर्ण करावे तसेच डॉक्टर आणि पोलिसांप्रमाणे शिक्षकांनाही विमा योजना लागू करावी. विविध रुग्णालयां मध्ये शिक्षकांसाठी राखीव बेड उपलब्ध असावेत अशी शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांची सरकारकडे मागणी आहे.