India

१००रु/लिटर दूध आंदोलनाला महाराष्ट्र किसान सभेचा पाठिंबा

हरयाणामधल्या काही तरुण शेतकऱ्यांनी कालपासून दूध १०० रुपये लिटर या किंमतीनं विकायचं ठरवलं आहे.

Credit : Lokmat.com

हरयाणामधल्या काही तरुण शेतकऱ्यांनी कालपासून दूध १०० रुपये लिटर या किंमतीनं विकायचं ठरवलं आहे. पेट्रोल आणि डिझेल जर १०० रुपये प्रति लिटर दरानं भारतीय जनतेला परवडत असेल, आणि वाढत्या दरांमुळं आमचा उत्पादन खर्च वाढत असेल, तर आम्ही तयार केलेलं दूधसुद्धा सर्वांनी एवढंच महाग विकत घेण्याची तयार ठेवावी, अशी भूमिका हरयाणामधल्या खाप पंचायतींनी घेतली आहे. महाराष्ट्रातदेखील अखिल भारतीय किसान सभेच्या अजित नवले यांनी या कॅम्पेनला समर्थन दिलंय.

देशातील अनेक राज्यांमधील सोशल मीडियावर याबाबतीत कॅम्पेन सुरु झालंय. फक्त दूधच नाही तर टोमॅटो, कांदा, मिरची आणि इतर अनेक भाज्यांचेही अशा प्रकारचे दर ठरवून शेतकऱ्यांनी एक यादी जाहीर केली आहे. "शेतकरी १०० रुपये म्हणाले म्हणजे त्यांना लगेच ते मिळाले असं होत नसतं. आपण शेतीमालाचे मालक असल्यानं आपली मालकी असलेल्या शेतीमालाचे दर ठरविण्याचा अधिकार आपला आहे हा आत्मविश्वास शेतकऱ्याच्या मनात निर्माण होणं, हे या कॅम्पेनचं उद्दिष्ट आहे," नवले म्हणाले.

नवले यांच्या मते हा भाव जर खरंच मिळवायचा असेल तर यासाठी दोन गोष्टी करणं गरजेचं आहे - 'सरकारवर शेतकरी चळवळीचा दबाव तयार करायची गरज आहे. बहुसंख्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी अशा अनेक संघटना कधी नव्हे ते एकत्र आलेत. त्याचबरोबर दुसरीकडे शेतकऱ्यांची तोलमोल करण्याची शक्ती वाढवावी लागेल. यासाठी सगळं शेतीमाल एकाच वेळी बाजारात आणून बाजारभाव पाडण्याऐवजी शेतीकडे व्यवसायाच्या नियमांनुसार बघून टप्प्या-टप्प्यानं माल बाजारात आणायला सुरवात करावी लागेल. यासाठी शेतकऱ्यांच्या कंपन्या, गट उभे करावे लागतील, गोदामं बांधावी लागतील. शेतीमाल अधिक टिकवण्यासाठीची यंत्रणा तयार करावी लागेल,' असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रातील कंपन्या राज्यातील शेतकऱ्यांना आधार भावाएवढा सुद्धा देत नाहीत. जर शेतीमालाच्या बाजारपेठेतही अशी मक्तेदारी निर्माण झाली तर अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. म्हणूनच कृषी कायद्यांना आमचा विरोध आहे. पेट्रोल-डिझेलचे दर इतके वाढले तरी याविरुद्ध कोणी आवाज उठवत नाहीये. पण दूध किंवा भाज्यांचे दर वाढले तर मात्र  त्याविरुद्ध लोकं बोलतात. जेव्हा आम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या की जर पेट्रोल १०० रुपयाला  असेल, तर दूधपण १०० रुपयांना घ्या, तर त्यावर अशी उत्तरं आली की जर दूध १०० रुपयांना झालं तर लोकांना जगता येणार नाही, महागाई वाढेल. जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची चर्चा होते, शेतीमालातून कमी भाव मिळतोय, तो वाढवलं पाहिजे यासाठी आंदोलनं  होतात, तेव्हा मात्र हे लोकं काही बोलत नाहीत. याच देशातल्या  आत्महत्त्या, त्याची निकालात कोणाला दिसत नाही," नवले म्हणाले.

सध्याची दिल्लीच्या सीमेवरची शांतता ही वादळापूर्वीची शांतता, आणि जबरदस्त आंदोलनाची तयारी चालू असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.