India

जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची जोरदार वर्णी

अहमदनगर, औरंगाबाद, हिंगोली आणि नंदुरबार, या चार जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही पावसाची तूट.

Credit : इंडी जर्नल/आयएमडी

जून महिन्यात दडी मारलेल्या पावसानं जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात जोरदार वर्णी लावल्यामुळं जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरीएवढा किंवा जास्त पाऊस पडला. भारतीय हवामान विभागानुसार (आयएमडी) अहमदनगर, औरंगाबाद, हिंगोली आणि नंदुरबार, या चार जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही पावसाची तूट दिसतेय.

जूनच्या पहिल्या आठवड्यातील हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी होता. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे चित्र बदललेलं दिसतंय. नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे यावर्षी मान्सून सुरु झाल्यापासून प्रथमच सक्रिय स्थितीत आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता वाढली आहे. आयएमडीनं पुढचे ४ दिवस सिंधुदुर्ग, रत्त्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, ठाणे, पालघर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, मुंबई शहरांमध्येही बुधवार ते शुक्रवारमध्ये तीव्र ते अतितीव्र पाऊस होण्याचा अंदाज आहे.

 

 

जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड, ठाणे, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा गोंदिया व गडचिरोली जिल्हांमध्ये तीव्र अतिरिक्त पाऊस झालाय, तर पुणे, सातारा, नाशिक, बीड,उस्मानाबाद, लातूर, यवतमाळमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय. सांगली सोलापूर, परभणी, जालना, अकोला, बुलढाणा, वाशीम, जळगाव, धुळे जिल्ह्यांत साधारण सरासरीएवढा पाऊस आहे.

यावर्षी पूर्वमोसमी पाऊस राज्यातील अनेक भागांमधून जवळपास गायबच असल्यानं नागरिक पावसाळ्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र जून महिन्यात ढगाळ वातावरणानं जरी मार्च-मेमधल्या उष्णतेपासून दिलासा दिला असला, तरी पाऊस मात्र सरासरीपेक्षा कमीच होता. यावर्षी मान्सून सर्वसाधारण असेल असं पावसाळ्या आधीच्या अंदाजांमध्ये म्हटलं गेलं होतं. त्यानुसार राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार असल्याचं हवामानतज्ञांनी सांगितलं होतं.

देशभारत यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जूनमध्ये पडणारा पाऊस हा एकूण मोसमी पावसाच्या १५ टक्के असतो तर जुलैमधला पाऊस ३५ टक्के असतो. त्यामुळं या महिन्यातला पाऊस हा खरिफ पिकांच्या पेरणी आणि वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तांदूळ, गहू, मूग, सोयाबीन, कांदा ही राज्यातील काही मुख्य खरिफ पिकं आहेत.