India

दुष्काळात मानव-वन्यप्राणी संघर्षात वाढ: शेतकऱ्यांसमोरील बिकट आव्हान

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा वनक्षेत्राच्या बाहेर होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत.

Credit : इंडी जर्नल

 

तुषार बिडवे । २०२३ च्या पावसाळयात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं राज्यातील १५ जिल्यांतील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. सुकलेली पिकं आणि पाण्याच्या चणचणीबरोबरच जंगलाच्या जवळील, संरक्षित जंगलांच्या बाहेरील गावांमधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानव-वन्यप्राणी संघर्षाला सामोरं जावं लागत आहे. 

ऊन्हाळा सुरू झाल्यावर जंगलातील पाणवठे आटायला सुरुवात होते. पावसाची टक्केवारी घटल्यावर येणाऱ्या दुष्काळात ही परिस्थिती आणखीनच गंभीर होते. या पाणवठे, धरणालगतच्या गावातील जंगलांच्या आश्रयानं वावरणारी जंगली श्वापद आणि त्यांच्या मागावरील बिबटे, वाघ आणि इतर मांसभक्षी यामुळं मनुष्यवस्तीत येण्याचं प्रमाण वाढतं आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढतो.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा वनक्षेत्राच्या बाहेर होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. पुणे वनविभागाच्या आकडेवारीनुसार २०१८ नंतर ८० पेक्षा जास्त माणसांवर वन्यप्राण्यांचे हल्ले हे संरक्षित जंगलांच्या बाहेर झाले आहेत. त्याउलट संरक्षित वनक्षेत्रात माणसांवर झालेल्या हल्ल्यांचा आकडा हा ८ आहे. यातील बहुतांश हल्ले हे वन्यप्राणी पाण्याच्या अधिवास शोधण्यासाठी बाहेर आल्यानंतर त्याचा वनक्षेत्राच्या बाहेरील वावरामुळं झाला असल्याचं वनविभाग सांगतो. हे हल्ले जानेवारी ते जून या दरम्यान सर्वाधिक पाहायला मिळतात. त्यामुळे दुष्काळामुळे पाण्याचे साठे आटल्यामुळे मनुष्य आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष वाढतो, असा पॅटर्न सध्या बघायला मिळत आहे.

 

“जंगलातील चारा वाळला की तृणभक्षी प्राणी खाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळं मांसाहारी प्राणीदेखील त्यांच्या मागावर जंगलाबाहेर येतात.”

 

“उन्हाळा सुरू झाला की पाण्याचे नैसर्गिक स्रोत (नदी, नाले, तलाव) याच्यातील पाणी फेब्रुवारी नंतर आटायला सुरुवात होते.मे महिन्यात ही परिस्थिती खडतर बनते. त्यामुळे जंगली श्वापदं त्यांच्या अधिवासाबाहेरील पाण्याचे साठे शोधायला बाहेर पडतात. यात मानवनिर्मित (विहिरी, शेततलाव) पाणी स्रोतांच्या जवळ त्यांचा माणसाशी संघर्ष होण्याची शक्यता असते,” पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितलं. 

जंगलातील शिकारी प्राण्यांची भक्ष्यं असलेले प्राणी कमी झाले, तरी शिकारी अधिवास बदलतात, असं विविध संशोधनातून वेळोवेळी सामोर आलेलं आहे. “जंगलातील चारा पूर्ण वाळला की तृणभक्षी प्राणी खाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळं त्यावर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणीदेखील त्यांच्या मागावर जंगलाबाहेर येतात,” चव्हाण पुढं सांगतात. 

मांसाभक्षी प्राण्यांची वाढती संख्या, जंगलातील इतर प्राण्यांचे कमी होत जाणारे अधिवास, संरक्षित जंगलातील वाढलेल्या शिकारी, बफर झोनच्या पलीकडे जंगलात विस्तारणारी गावं आणि दुष्काळासारख्या कारणांनी होणारी प्राण्यांचं स्थलांतरं, अशी अनेक कारणं मानवाचा वन्यप्राण्यांशी संपर्क वाढवत आहेत. मानव-प्राणी संघर्षाच्या वाढत्या घटनांनी मानवाला निसर्गाविरुद्ध उभे केलं आहे. या संघर्षामुळं आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी समुदायाचं जीवन आणि उपजीविका गंभीर तणावाखाली आली आहे, असं तज्ञ सांगतात.

गेल्या काही महिन्यांत देशातील इतर राज्यांमधील मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या गंभीर घटना समोर येत आहेत. केरळमध्ये गेल्या २ महिन्यांत ९ जणांचा अशा संघर्षाच्या घटनांमध्ये मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी केरळ सरकारनं मानव-वन्यप्राणी संघर्ष राज्य-विशेष आपत्ती म्हणून जाहीर केली. शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये ओडिशात मानव-रानटी हत्ती संघर्षात १४९ जणांचा बळी गेला. या दोन्ही राज्यांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यापासूनची, म्हणजे २०२३-२४ ची आकडेवारी अजून जाहीर करण्यात आली नसली, तरी ही संख्या निश्चितच वाढत असल्याचं वन विभागाचे अधिकारी सांगतात.

 

 

महाराष्ट्रात ऊस तसंच रब्बी, खरीप पिकाच्या कापणीच्या हंगामात बिबट्याचा संघर्ष सर्वाधिक होताना दिसून येतो. वन्य प्राण्यांचे लपण्याची ठिकाणं नाहीसे झाल्यानं मानव- प्राणी संघर्षाची शक्यता असते.

“रात्रीच्या वेळी शेतावर पिकाला पाणी द्यायला जावं लागतं. अनेकदा बिबट्याचं, तरसाचं, रानडुक्कराचं दर्शन आम्हाला होत असतं. शेतावरील शेळ्या आणि कुत्री यांची शिकार होते, शेतावर जायला आता आम्हाला भीती वाटते. पण दिवसा विजेचा दाब कमी असल्यानं शेतात पाणी सोडायला रात्री जाण्याशिवाय आमच्यासमोर काही पर्याय नाही. साधारण फेब्रुवारीच्या पुढे कापणी सुरू होते, तेव्हा आमच्या भागात बिबट्याचे हल्ले वाढतात,” असं पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील शांताराम करडिले या शेतकऱ्यानं सांगितलं.

पुणे जिल्ह्यातील  शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे, ज्यांच्या मतदारसंघात मानव-बिबट्या संघर्ष मोठ्या प्रमाणात होताना दिसतो, यांनी इंडी जर्नलला दिलेल्या एका मुलाखतीत या प्रश्नावर चर्चा केली. “बिबट्या हा शेड्यूल एक मध्ये येणारा प्राणी आहे. त्याच्यावर नसबंदी करून प्रजनन नियंत्रण करता येत नाही. सध्या जुन्नर विभागामध्ये ४०० ते ५०० बिबट्यांचा वावर आहे. वीज रात्रीच उपलब्ध असल्याने रात्री शेतीला पाणी द्यायला जावं लागतं. त्यामुळे रात्री माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होतात. गेल्या दोन वर्षांत १८,००० पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेत. जवळपास २२ मानव-प्राणी संघर्ष झालेत. हे असताना राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली जातीय की ज्यापद्धतीनं विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या जवळच्या भागात शेतीसाठी जशी दिवसा वीज दिली जाते, तशी बिबट प्रवण क्षेत्रात दिली जावी.”

 

२०२२ मध्ये महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक ८५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती.

 

२०२२ मध्ये आलेल्या वनविभागाच्या सर्वेक्षणातील माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक ८५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. तसचं व्याघ्र प्रकल्पाजवळच्या मानवी वस्तीतीळ पशुधनाची शिकार होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. या भागांत मानवावर होणारे हल्ले अपघाती असले तरी अशा घटनांचं वाढतं प्रमाण हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या बिबटयांबाबत प्रकाशित पाचव्या सर्वेक्षण अहवालानुसार अशा संघर्षाच्या वाढत्या घटना बिबट्या आणि मनुष्य समुदाय दोघांसाठी आव्हानं निर्माण करत आहे. वनाच्या अधिवासाचं संरक्षण वाढवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारी संस्था, संवर्धन संस्था यांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असं निरीक्षणदेखील या अहवालात नोंदवण्यात आलं होतं. 

वनजमिनी व्यावसायिक हेतूंसाठी वळवल्यामुळं देखील प्राण्यांच्या अधिवासची ठिकाणे सार्वजनिक होऊन त्यांच्या क्षेत्रावर अतिक्रमण होतं.

“अनेकदा पिकांच्या कंपनीसाठी येणाऱ्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या तात्पुरत्या झोपड्या शेताजवळ किंवा रानात बांधव्या लागतात. पीक काढणीच्या वेळीदेखील त्यांचा संघर्ष शेतात लपलेल्या हिंस्र प्राण्यांशी होतो,”असा वनसंरक्षक एन. आर प्रवीण सांगतात.

वन्य प्राणी कश्या प्रकारे त्यांच्या अधिवासाबाहेर पडणार नाहीत यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. नैसर्गिक पाणवठ्यांबरोबरच जंगलात कृत्रिम पाणवठे बांधून त्यात प्राण्यांच्या पाण्याची सोय करायला हवी. वारंवार हल्ले होणारी ठिकाणं शोधून त्या भागांत मानव-वन्यप्राणी संघर्ष हाताळण्यासाठी वनविभागाच्या स्वतंत्र विभागाची स्थापना करणं गरजेच आहे, असं वन्यजीव अभ्यासकांच मत आहे.