India

भारतीय वायूसैन्यासमोर संख्येचं आव्हान

भारतीय वायु सेनेकडं किमान १० स्क्वॉड्रन (१६० ते १८० विमानं) कमी आहेत.

Credit : इंडी जर्नल

राकेश नेवसेगेल्या आठवड्यात भारतीय वायु सेनेच्या दोन विमानांचा मध्य प्रदेशमधील मोरेना इथं सराव करत असताना अपघात झाला. या अपघातात भारतीय वायु सेनेचं एक सुखोई ३० आणि एक मिराज या लढाऊ विमानांचा अपघात होऊन मिराजचे वैमानिक विंग कमांडर हनुमंतराव सारथी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक लढाऊ विमानाचा वैमानिक घडवण्यात प्रचंड पैसा आणि वेळ लागतो. त्यामूळं एखाद्या वैमानिकाचा अपघाती मृत्यू होणं अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या पाच वर्षात भारतानं अनेक विमान अपघात पाहिले आहेत. त्यात अनेक वैमानिकांचा मृत्यूही झाला आहे. पण त्यातही विमानांचं होणार नुकसान सध्या वायु सेनेसमोर वेगळं आव्हान उभं करत आहे.

जगातील कोणतीही वायु सेना अपघातमुक्त नाही. अपघात हा त्यांच्या कामाचा भाग असतो. मात्र भारतीय वायु सेनेत अपघातांचं प्रमाण बरंच जास्त आहे. या अपघातांमुळं अनेक शूर वैमानिकांना त्यांचा जीव तर गमवावा लागतो, पण बऱ्याचदा त्यात विमानांची हानीही होते आणि अनेक विमानं पुन्हा वापरण्याजोगी राहत नाहीत. 

भारतीय वायु सेनेसमोर असे अपघात आधीच असलेल्या प्रश्नांना अधिक गंभीर रूप देत आहेत. प्रश्न आहे घटत्या स्क्वॉड्रन संख्येचा. भारतीय वायु सेनेच्या मतानुसार भारतीय वायुसेनेकडे दोन आघाड्यांवर (चीन आणि पाकिस्तान) युद्ध लढण्यासाठी ४२ स्क्वॉड्रन असल्या पाहिजेत. स्क्वॉड्रन म्हणजे विमानांची टीम. अशा एका स्क्वॉड्रनमध्ये भारतीय वायु सेना १६ ते १८ विमानं ठेवते. पण सध्या भारतीय वायु सेनेकडं फक्त ३२ स्क्वॉड्रन उपलब्ध आहेत.

हा भारतीय वायु सेनेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतीय वायु सेनेत सध्या इतकी कमी विमानं सेवेत आहेत की चीन विरोधात सुरू असलेल्या सीमावादाप्रसंगी भारतीय नौसेनेची विमानं गोव्यातून लडाखमध्ये आणावी लागली होती.

 

म्हणजे भारतीय वायु सेनेकडं किमान १० स्क्वॉड्रन (१६० ते १८० विमानं) कमी आहेत. त्यातही त्यातील अनेक विमान अत्यंत जुन्या पिढीची मिग-२१ विमानं आहेत. या मिग-२१ विमानांची निवृत्ती २०१० च्या आधी होणं अपेक्षित होतं. पण नवीन विमानं घेण्यात झालेल्या उशिरामुळं या अत्यंत जुन्या विमानांना अजूनही वापरवं लागत आहे. भारतीय वायु सेनेत सध्या सर्वात जास्त अपघात या विमानांचा होतो. सध्या भारतीय वायु सेनेत १२५ च्या आसपास मिग-२१ विमानं आहेत. भारतीय वायु सेना इंग्लंड आणि फ्रांसनं बनवलेल्या जॅग्वार विमानांचा जगातील शेवटचा वापरकर्ता आहे. भारताने १४० जॅग्वार विमानं मागवली होती. त्याचं प्रमाणं भारताकडं रशियन मिग २९ आणि फ्रांसचे मिराज विमानं अनुक्रमे ६९ आणि ५७ च्या संख्येत आहे.

त्यानंतर भारताकडे सुखोई-३० विमानं सर्वात जास्त संख्येनं उपलब्ध आहेत. भारतानं सुखोई-३० च्या एकूण २७२ विमानांची खरेदी रशियाकडून केली होती. तसंच भारतानं नुकतीच फ्रान्समधून ३६ राफेल विमानं सेवेत दाखल करण्यात आली आहेत. त्याशिवाय भारतीय बनवाटीची ३२ तेजस विमानं हळू हळू भारतीय वायु सेनेला मिळत आहे आणि अजून ८३ विमानं २०२४ पासून मिळणं सुरू होईल.

पण भारतकडं सुखोई, राफेल आणि तेजस सोडता आधुनिक विमानं नाहीत. मिग-२९ आणि मिराज विमानं त्यांच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात असून त्यांना २०३० पासून यांची निवृत्ती सुरू होईल. तीच गत जॅग्वारची आहे. तेजस विमानं येण्यासाठी ५ ते ७ वर्षाचा कालावधी लागेल. तर मिग-२१ विमानं ही लवकरात लवकर निवृत्त करणं गरजेचं आहे. असं असतानाही मोदी सरकारकडून कोणतीही घाई करताना दिसत नाही. भारतीय वायु सेनेनं कारगिल युद्धानंतर ११४ मध्यम वजनी विमानांची खरेदी करायचा विचार केला होता. पण जवळजवळ १२-१५ वर्षे प्रयत्न केल्यानंतर राफेलची ३६ विमानं त्यांच्या हाती लागली. यानंतर बाकीची विमान घेण्याच्या प्रयत्नात गेली ४ वर्षं कोणतीही प्रगती झालेली नाही. या मागे मोदी सरकारवर राफेल खरीदीबाबत झालेला भ्रष्टाचाराचा आरोप एक कारण होतं.

भारतीय बनावटीच्या तेजस विमानांना सेवेत येण्यासाठी अनेक वर्षं वाट पहावी लागली. त्यातही वायु सेना तेजसच्या कार्यक्षमतेतून समाधानी नव्हती, म्हणून त्याच्यात छोट्या सुधारणा केल्यानंतर ८३ तेजस मार्क १अ या विमानाच्या खरेदीचा प्रस्ताव मान्य झाला. तेजसमध्ये अजून सुधारणा करून तेजस मार्क २ नावानं नवीन विमान बनवलं जात असून त्याच्या निर्मितीसाठी ६ वर्षाचा किमान कालावधी लागेल. म्हणजे येत्या १० वर्षात ही स्क्वॉड्रन संख्या पूर्ण होणं शक्य नाही.

 

भारतीय वायुसेनेचं भविष्य

सध्याच्या अंदाजात भारतीय वायुसेनेला येत्या १० ते १५ वर्षात ५५० विमानं सेवेत घेण्याचं अशक्यप्राय काम पार पडायचं आहे, ज्यात मिग-२१, मिग-२९, मिराज आणि जॅग्वार अशा एकूण ३९३ विमानांच्या जागी नवीन विमानं पुढच्या दशकात घ्यायची आहेत. अपूर्ण स्क्वॉड्रन संख्या पूर्ण करण्यासाठी १८० विमान अजून वाढवावी लागणार आहेत. त्यात अपेक्षित तेजस मार्क १अ ८३ च्या संख्येत येतील. तसंच मध्यम वजनी गटातील ११४ विमानं येण्यासाठी किमान १० ते १२ वर्षाचा कालावधी लागेल. वायू सेना तेजसच्या पुढच्या पिढीची किमान १०० विमानं विकत घेणार असल्याचं प्रमुखांनी सांगितलं आहे. मात्र ती येण्यासाठी १२ वर्ष लागतील.

 

 

भारतीय वायु सेनेची स्क्वॉड्रन संख्या प्रचंड खालावली आहे. भारताला जर भविष्यात खरंच दोन आघाड्यांवर युद्ध लढायच असेल तर भारतीय वायु सेना सक्षम असणं अत्यंत गरजेचं आहे. चीननं भारताच्या सीमेलगत सैन्यबळ वाढवलं आहे. भारतीय सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी वायु सेना दल सेनेइतकंच महत्वाचं आहे. याबद्दल जर सरकारनं लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर सद्य परिस्थितीत अजून बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारनं नव्या लढाऊ विमानांची खरेदी करणं आवश्यक आहे. पण सध्या तरी सरकार याबद्दल गंभीर असल्याचं दिसत नाही.