India

'माझा बळी तुम्हाला देत आहे जेणेकरून तुमचं मूकबधिर झालेलं अंतर्मन थोडं तरी हादरेल', आत्महत्येपूर्वी वकिलाचं सरकारला पत्र

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टिक्रीत वकिलाची आत्महत्या.

Credit : The Print

दिल्लीनजीकच्या सिंघू सीमेवर आणि टिक्री इथं देशभरातले काही लाख शेतकरी आंदोलनासाठी गेला जवळपास एक महिना ठाण मांडून आहेत. यादरम्यान शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आत्महत्येच्या काही घटना घडल्या. यातच रविवारी अमरजित सिंघ, या फाझिल्का जिल्ह्यातील ५५ वर्षीय वकिलानं 'आपण शेतकऱ्यांचा अटळ विनाश घडवून आणतील अशा कृषी कायद्यांच्या विरोधात आपला जीव देत आहोत,' असं सांगत आपलं आयुष्य संपवलं. याआधी एका शीख धर्मगुरूंनी आपलं जीवन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी संपवलं होतं. 

अमरजित सिंघ हे पंजाबच्या फाझिल्का शहराचे रहिवासी होते व तिथल्या बार कौन्सिलचे सभासदही होते. सिंघ यांनी बहादुरगढ इथं विषारी पदार्थ सेवन करून स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर त्यांना रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथं उपचारासाठी नेण्यात आलं असताना त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी त्यांनी सरकारवर आपला रोष व्यक्त करत लिहिलेलं आत्महत्येपूर्वीचं पत्र सापडलं आहे. 

या पत्रात सिंघ लिहितात की ते शेतकरी आंदोलन आणि नव्या शेती कायद्यांच्या निषेधार्थ स्वतःचा जीव संपवत आहेत. "तुम्हाला (मोदी सरकार) जनतेनं बहुमतानं विजयी केलं आहे आणि तुमच्यावर संपूर्ण विश्वास टाकला आहे. स्वातंत्र्यानंतर असं घडलं असेल की जनतेनं तुमच्याकडे उज्ज्वल भविष्याची आशा ठेऊन लोकांनी पाहिलं," असं या पत्रात लिहीत सिंघ पुढं म्हणतात, "मात्र तुम्हाला प्रचंड दुःखी होत मला लिहावं लागत आहे ली तुम्ही फक्त अदानी आणि अंबानींसारख्या निवडक समूहाचे पंतप्रधान बनला आहात. शेतकरी आणि कामगारांसारखी सामान्य जनता तुमच्या तीन काळ्या कायद्यांमुळं फसवलं गेल्याचा अनुभव घेत आहे."

 

त्यांच्या पत्रात त्यांनी पुढं म्हटलं आहे, "जनता रस्त्यावर मतांसाठी नाही तर त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या भविष्यासाठी आणि उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी आहे. तुम्ही काही भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी सामान्य जनता आणि देशाचा कणा असलेल्या शेतीची विनाश करत आहात. सामान्यांच्या तोंडचा घास हिरावून घेऊन त्यांना सल्फोस (विषारी द्रव) खाण्यास भाग पाडू नका. तुम्ही फक्त जनतेलाच नाही तर तुमच्या शिरोमणी अकाली दलासारख्या राजकीय सोबत्यांना देखील फसवलं आहे."

"जनतेचा आवाज हा देवाचा आवाज आहे, तो ऐका. असं म्हटलं जातं की तुम्हाला गोध्रासारखे आणखी बळी हवे आहेत आणि या जगभर समर्थन लाभलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मी आता माझा बळी तुम्हाला देत आहे जेणेकरून तुमचं मूकबधिर झालेलं अंतर्मन थोडं तरी हादरेल," असं म्हणत सिंघ आपलं पत्र संपवतात.