India

महाराष्ट्रातला शेतमाल बस कुरिअरनं पाठवण्याच्या व्यवस्थेला लॉकडाऊनचा मोठा फटका

फळं, फुलं आणि औषधं, तसंच इतर पदार्थांच्या निर्मात्यांनाही याचा फटका बसला आहे.

Credit : नम्रता देसाई

नम्रता देसाई/पणजी: महाराष्ट्र राज्यात उत्पादित हापूसचा एप्रिल-मे हा महत्त्वाचा हंगाम आहे. याच दरम्यान कोरोनाचा विळखा पडल्याने गोव्यात येणारा हापूस आंबा यंदा कमी प्रमाणात येताना दिसत आहे. महाराष्ट्र-गोवा राज्यात होणाऱ्या बस कुरिअर व्यवस्थेद्वारे सुमारे दरमहा २० ते २५ लाख उत्पादन व्हायचे. कदंबा परिवहन संलग्न असणाऱ्या या कुरिअर व्यवस्थेच्या चालकांमध्ये सध्या यामुळे काळजीचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातील मालवण, वेंगुर्ला, देवगड, सावंतवाडी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात थेट शेतकरी ते ग्राहक यांच्यातील व्यापारी संबंधांना बस कुरिअर व्यवस्थेद्वारे पाठबळ मिळाले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी संलग्न गुणिना आणि कदंब परिवहन महामंडळाच्या वतीने ओमकार लॉजिस्टिक्स अशा दोन कंपन्यांद्वारा शेतमालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा गोव्याला केला जायचा. मात्र या सर्व व्यवहारावर कोरोनामुळे मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे फळं, फुलं आणि औषधं. तसंच इतर वस्तू व पदार्थांच्या निर्मात्यांनाही याचा फटका बसला आहे.

याविषयी गुणिना पार्सलचे ईश्वर चेचणी यांनी सांगितले की, "महाराष्ट्र राज्यात उत्पादित अनेक फळांना गोव्यात मोठी मागणी असते. यामध्ये हापूससह डाळींब, कलिंगड, द्राक्ष अशा काही उत्पादनांना जोडून घरपोच वस्तू पोहचवण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे बस सेवा स्थगित असल्याने मालाचा पुरवठा करण्यासाठी बस उपलब्ध झाल्या नाहीत. वाहतूक बंद असल्याच्या फटक्यामुळे फक्त वाहतूक (ट्रान्स्पोर्टेशन) खर्च बघता सुमारे २५ कोटींचे नुकसान झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळांच्या संलग्न वस्तू पुरवठा सेवेचा आधार लघुउद्योग, बचत गट आणि नवीन तसेच कमी आर्थिक क्षमता असणाऱ्या व्यावसायिकांना होता. सध्या गोव्यातील तोट्यात सुरू असणाऱ्या बस कुरिअर सेवेला घरघर लागली आहे. निविदा प्रक्रियेने सुरू झालेल्या या सेवेला अवघे काही महिने झाले असतानाच कोरोनामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच महाराष्ट्रातून गोव्यात शेतमाल येण्यास अडचणी येत असल्याने राज्यात अनेक फळांची अनुपलब्धता दिसून येत आहे.

पुढील अंदाजे ३ ते ४ महिने या सेवा देणाऱ्या कंपन्या बंद राहिल्यास शेतमालाचा शेतकरी ते ग्राहक संपर्क कमी होऊन शेतकऱ्यांना व्यापारी, अडते यांच्या विक्री व्यवस्थेवर विसंबून रहावे लागू शकते. तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ व मागणी असून जर उत्पादित माल पुरवण्यासाठीची सेवा कार्यरत नसल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसू शकतो.

 

यावर उपाय काय?

सध्या महाराष्ट्र व गोवा राज्य परिवहन महामंडळामधील फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी बस कुरिअर सेवा कंपन्यांचा संपर्क सुरू आहे. यामध्ये फक्त शेतमाल व अत्यावश्यक नाशिवंत मालाच्या वाहतूकीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ३५ बस उपलब्ध करून द्याव्यात यासाठी गुणिना पार्सलचे ईश्वर चेचणी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी संपर्क साधला आहे. या ३५ बस उपलब्ध झाल्यास महाराष्ट्रातील २०० हून अधिक बसस्थानकांपर्यंत शेतमाल व बचत गटांची उत्पादने तसेच अत्यावश्यक वस्तू आणि औषधे पुरवणे शक्य होणार आहे.