India

कोरोनावर मात करून दाखवणाऱ्या केरळच्या रॉकस्टार आरोग्यमंत्री

कोरोना नावाच्या विध्वंसापासून केरळच्या सजग आरोग्यमंत्र्यांनी केरळला कसं वाचवलं त्याची गोष्ट.

Credit : द गार्डियन

कोरोना नावाच्या विध्वंसापासून केरळच्या सजग आरोग्यमंत्र्यांनी केरळला कसं वाचवलं त्याची गोष्ट. सांगितलीय इंग्लंडमधले आघाडीचे वृत्तपत्र गार्डीयन मध्ये लॉरा स्पिनी यांनी.

२० जानेवारी २०२०. नेहमीसारखाच आणखी एक सामान्य दिवस. केरळच्या आरोग्य मंत्रालयातील सचिव रोजच्या कामांना सुरुवात करतच होते, तेव्हढ्यात त्यांना एक फोन आला. केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा बोलत होत्या. चीनमध्ये एक नवीनच सापडलेला विषाणू धुमाकूळ घालतोय, त्याची माहिती नुकतीच इंटरनेटवर आली होती. तो विषाणू आपल्यापर्यंत पोचू शकतो काय, असा त्यांचा प्रश्न होता. सचिवांनीही ती माहिती वाचली होती. त्यावर विचारही केलेला असावा. कारण त्यांनी तत्क्षणी उत्तर दिलं. होय. येऊ शकतो.

उर्वरित भारताला आणि जगातल्या बहुसंख्य देशांना या संदर्भात जाग यायच्या दोन महिने आधीच केरळच्या आरोग्य मंत्री शैलजा यांनी चीनमधील या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. सर्वांत आधी, आणि अतिशय वेगाने हालचाली सुरू करणारे केरळ हे केवळ भारतातलेच नाही, जगातले पहिले राज्य ठरले.

आणि चार महिन्यांच्या कालावधीत, जगभरात सर्वत्र लक्षावधी लोकांना गाठण्यात आणि त्यांपैकी काही लाख लोकांचे जीव घेण्यात यशस्वी ठरलेल्या कोरोना विषाणूला केरळमध्ये फक्त ५२४ लोकांना गाठता आलं. पैकी चार जणांचा मृत्यू झाला. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात संसर्गामुळे बाधित एकही नाही. या राज्याची एकूण लोकसंख्या आहे ३,५ कोटी. आणि दरडोई सरासरी उत्पादन २,२०० पौंड्स प्रतिवर्ष. या तुलनेत इंग्लंडची लोकसंख्या केरळच्या दुप्पट, तर दरडोई उत्पादन ३३,१०० पौंड्स, म्हणजे केरळच्या पंधरा पट आहे. तेथे आतापर्यंत चाळीस हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले. अमेरिकेत केरळच्या दहापट लोकसंख्या आणि सरासरी दरडोई प्रतिवर्ष उत्पादन ५१,००० पौंड्स. म्हणजे केरळच्या पंचवीस पट. तेथे आजपर्यंत ८२,००० पेक्षा जास्त लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. या दोन्ही देशांतील मृत्यू संसर्गामुळे जास्त झाले.

केरळच्या ६३ वर्षीय आरोग्यमंत्री के के शैलजा, ज्यांना तेथील लोक प्रेमाने शैलजा टीचर म्हणतात, त्यांना या काही दिवसांत आणखी काही उपाध्या मिळाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक लोकप्रिय उपाधी म्हणजे कोरोनाची कर्दनकाळ रॉकस्टार आरोग्यमंत्री!

अतिशय उत्साही, आनंदी वृत्तीच्या आणि माध्यमिक शाळेत शास्त्र विषयाच्या एकेकाळच्या शिक्षिका असलेल्या शैलजा टीचर कर्दनकाळ? रॉकस्टार? पण लोकांना नव्हे, तर रोगाला प्रतिबंधित करता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखविल्यामुळं त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात सार्वत्रिकरित्या जी प्रेमादराची भावना आहे, तिचं प्रतिबिंब लोकांनी त्यांना दिलेल्या या टोपण नावांमध्ये उमटलं आहे. 

शैलजा यांनी काय केलं? चीनमधील या नवीन विषाणूबद्दल वाचल्यानंतर तिसऱ्याच दिवशी, म्हणजे २३ जानेवारीला त्यांनी तात्काळ प्रतिसाद पथकाची पहिली बैठक घेतली. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, २४ तारखेला या पथकाने नियंत्रण कक्ष सुरु केला आणि केरळमधील सर्व चौदा जिल्ह्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तीन दिवसांनी, २७ तारखेला चीनमधील ऊहान येथून विमानाने पहिला कोरोनाग्रस्त केरळमध्ये येऊन धडकला, त्याच्या आधीच केरळने जागतिक आरोग्य संघटनेची चतुःसूत्री अंमलात आणली होती: चाचण्या घ्या-शोधून काढा-अलग करा-उपचार करा.

चीनकडून आलेल्या विमानातून प्रवासी उतरताच त्यांची चाचणी घेण्यात आली. ज्यांच्या अंगात ताप होता, अशा तिघांना लगेचच जवळच्या इस्पितळात हलवण्यात आलं. उरलेल्या प्रत्येकाला, तोपर्यंत तेथील स्थानिक मल्याळी भाषेत छापून घेतलेली कोरोना बद्दलची माहितीपत्रके देऊन घरी अलग राहण्याबद्दल समजावून सांगण्यात आलं. इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे चाचणी अहवाल त्यांना कोरोना आजार झालाय, असे आले. पण तो आजार त्यांच्यापर्यंतच रोखण्यात आला. त्याचा प्रसार आणि फैलाव झाला नाही. शैलजा म्हणतात की ही पहिली विजयी सुरुवात होती, पण लवकरच हा विषाणू चीनच्या बाहेर पडला आणि जगभर सर्वत्र पसरला.

फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसांत व्हेनिसवरून आलेल्या एका मल्याळी कुटुंबाने विमानतळावरील नियंत्रण पथकाला चकविले, आणि तोपर्यंत सुनिश्चित झालेली कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता अथवा प्रवासाबद्दल कोणतीही माहिती न देता गुंगारा देऊन गुपचूप स्वतःचे घर गाठले. जेंव्हा कोरोनाचे रुग्ण सापडले, तेंव्हा वैद्यकीय अधिकारी सतर्क झाले आणि त्या रुग्णाच्या संपर्काचा माग या कुटुंबापर्यंत आला. पण तोपर्यंत हे कुटुंब शेकडो लोकांच्या संपर्कात आले होते. सरकारी यंत्रणेने त्या कुटुंबाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला शोधून काढले. यासाठी जाहिरातीची आणि समाजमाध्यमांची मदत घेण्यात आली. या सर्वांना अलग करण्यात आले. त्यामध्ये कोरोनाचे सहा रुग्ण सापडले.

आणखी एका गटाची बांधणी करण्यात आली. पण आता परदेशातून, विशेषतः आखाती देशातून केरळमधील लोक मोठ्या प्रमाणावर परत येऊ लागले. त्यांपैकी काहींनी येताना तो विषाणूही सोबती म्हणून बरोबर आणला होता. मग २३ मार्च रोजी राज्यातील सर्व चारही विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे थांबविण्यात आली. दोनच दिवसांनंतर संपूर्ण भारताने राष्ट्रीय पातळीवर स्वतःला कुलूपबंद करून घेतले.

 

Photograph: Reuters

 

केरळातील अलगीकरण

केरळमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वोच्च पातळीवर होता तेंव्हा १,७०,००० लोकांना अलग करून ठेवण्यात आलं होतं. आणि ते आरोग्य कार्यकर्त्यांच्या कडक निगराणीखाली होते. ज्यांच्या घरात स्वतंत्र न्हाणीघर आणि स्वच्छतागृह नाही त्यांना सरकारी खर्चाने स्वतंत्र अलगीकरण कक्षांत ठेवण्यात आले. आता ही संख्या २१,००० पर्यंत रोडावली आहे. याशिवाय शेजारील राज्यांतील जे लोक राष्ट्रीय कुलूपबंद काळात येथे अडकले होते, अशा १,५०,००० लोकांची राहण्याची आणि जेवणखाण्याची व्यवस्था केली. त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली. दिवसातून तीन वेळा जेवण याप्रमाणे सलग सहा आठवडे. या लोकांना आता रेल्वेतून त्यांच्या घरी पाठविण्यात येत आहे.

खरेतर शैलजा या, आधीपासूनच भारतात सर्वांना माहीत आहेत. मागच्या वर्षी 'व्हायरस' या नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. शैलजा यांनी २०१८ सालात निपाह या धोकादायक आणि घातक विषाणूची साथ ज्या क्षमतेने हाताळली त्या कामगिरीचं यथार्थ चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. त्यातील नायिका, जिने शैलजा यांची भूमिका वठवली, ती जरा जास्तच घाबरलेली दाखवलीय - शैलजा म्हणतात. खरंतर असं आहे की भीती वाटली तरी ती दाखवून मला चालणारच नाही! आणि शैलजा यांची सकारात्मक ऊर्जा हे तर कारण आहेच, पण रोग फैलावलेल्या खेड्यांत त्या स्वतः जातात, लोकांशी बोलतात, त्यांना धीर, आधार देतात, म्हणून त्यांना हा प्रेमादर  मिळतो.

हा आजार पसरतो कसा, हेच लोकांना कळत नव्हतं. त्यामुळं लोक इतके घाबरले होते की, गाव सोडून कुठे पळून जावं, अशी त्यांची मानसिकता झाली होती. मग मी तेथे गेले, गावागावांत गेले. डॉक्टरांची पथके बरोबर घेतली. आम्ही तेथे गाव पंचायतीत बैठका आयोजित केल्या. त्यांना समजावून सांगितलं की गाव सोडून जाण्याची गरज नाही. कारण हा विषाणू हवेतून नाही, तर थेट संपर्कातूनच पसरतो. जर तुम्ही खोकणाऱ्या माणसापासून किमान एक मीटर अंतरावर राहिलात, तर तो विषाणू प्रवास करून तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही. हे आम्ही जेंव्हा त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं, तेंव्हा ते शांत झाले. आणि थांबले. 

शैलजा सांगतात की निपाह ने कोरोनासाठी त्यांची पूर्वतयारी करून घेतली. निपाह ने त्यांना हे शिकवलं की, असा कोणताही संसर्गजन्य आजार, ज्यावर औषध नाही आणि लसही नाही, त्याला तुम्ही गंभीरपणेच घेतलं पाहिजे. पण एका अर्थी या दोन्ही साथींना हाताळण्याची पूर्वतयारी त्या आयुष्यभर करत आल्यात. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) त्या सदस्य आहेत. हा पक्ष केरळच्या राजकारणात १९५७ सालापासून, म्हणजे त्यांच्या जन्मानंतर एक वर्षांपासून, प्रभावी शक्ती आहे. (१९६४ पर्यंत हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक गट होता. मग ते दोन भाग फुटून वेगळे झाले.) चळवळींची आणि स्वातंत्र्य संग्रामाची परंपरा असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आजीने त्या काळात अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम चालवली होती. नंतर जे केरळ प्रारूप म्हणून नावारूपाला आले, त्याची सुरुवातीपासूनची घडण आणि बांधणी त्या बघत होत्या. आम्ही त्यांच्याशी बोललो, तेंव्हा या सगळ्याबद्दल त्यांना बोलायचे होते. 

जमीन सुधारणा हा या केरळ प्रारूपाचा पाया आहे. एका कुटुंबाकडे किती जमीन राहू शकते याची मर्यादा कायद्याने निश्चित करण्यात आली. जादा असलेली जमीन शेतकरी कुळांमध्ये वाटून देण्यात आली. सार्वजनिक आरोग्याची विकेंद्रित यंत्रणा उभी करण्यात आली. आणि लोकशिक्षणात मोठी गुंतवणूक करण्यात आली. प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आणि स्वतंत्र व्यवस्थापन असलेली इस्पितळे आहेत. तसेच दहा वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 

हे इतर राज्यांमध्ये पण आहे, महाराष्ट्रातील पुणे येथील सार्वजनिक आरोग्यविषयक तज्ज्ञ एम पी करिअप्पा सांगतात-पण इतर कुठेच लोकांनी प्राथमिक आरोग्य यंत्रणेत इतकी गुंतवणूक केलेली नाही. भारतातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत केरळमधील लोकांचे सरासरी आयुर्मान जास्त आहे, आणि बालमृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. शिवाय तेथे शिक्षणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. सुशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांच्या भल्यासाठी आरोग्य किती महत्वाचे आहे, याचे तेथील लोकांना पूर्ण भान आणि जाणीव आहे.

माझ्या आजीकडून मी त्या संघर्षांबद्दल ऐकलंय - शैलजा सांगतात - शेतीची चळवळ आणि स्वातंत्र्याचा लढा. माझी आजी खूप चांगली कथाकथनकार होती. जरी कुलूपबंद अवस्थेसारखे आणीबाणीचे निर्णय केंद्र सरकारने घेतले असले, तरी भारतातल्या प्रत्येक राज्याने स्वतःची अशी स्वतंत्र आरोग्यविषयक धोरणे आखली आहेत. त्यांच्या मते, जर केरळ प्रारूप आधीच विकसित झालेलं नसतं, तर केरळ सरकारला कोरोनापासून बचाव करणं अवघड ठरलं असतं.

राज्याची प्राथमिक आरोग्य केंद्रे जुनाट झाली होती. शैलजा यांचा पक्ष २०१६ मध्ये सत्तेत आला, तेंव्हा या केंद्रांच्या आधुनिकीकरणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला. या साथीच्या आधी यातून साध्य झालेली मोठी गोष्ट म्हणजे श्वसन विकारांसाठी यंत्रणा उभी करण्यात आली. भारतातील लोकांमध्ये श्वसन विकारांचा त्रास होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. शैलजा सांगतात की, ही यंत्रणा उभी केल्यामुळे आता आम्ही कोरोनाचा रोगी वेळेत शोधू शकलो, आणि तो संसर्गातून पसरण्याची शक्यताच संपवून टाकली. श्वसन विकारांसाठीच्या आम्ही उभ्या केलेल्या यंत्रणेचा कोरोना काळात आम्हाला खूप उपयोग झाला.

जेंव्हा कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाला, तेंव्हा प्रत्येक जिल्ह्याला कोरोनासाठी दोन इस्पितळे राखून ठेवायला सांगण्यात आलं होतं. आणि प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी पाचशे खाटा यासाठी बाजूला काढण्यात आल्या होत्या. त्यासाठीची प्रवेशद्वारे स्वतंत्र ठेवली होती. श्रीमंत पाश्चात्य देशांत रोग मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर रोगनिदान चाचण्यांचा पुरवठा कमी झाला होता, त्यामुळं त्या, उघड लक्षणे असलेले रोगी आणि त्यांच्या खूप जवळ आलेले, तसेच ज्यांना लक्षणे दिसत नाहीत अशांची नमुना चाचणी घेण्यासाठी आणि जे धोक्याच्या ठिकाणी काम करीत आहेत : आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि कार्यकर्ते, यांच्यासाठी राखून ठेवण्यात आल्या.

केरळमध्ये चाचणीचा अहवाल ४८ तासांच्या आत मिळतो. आखाती देश, इंग्लंड आणि अमेरिका यांसारख्या तांत्रिकदृष्ट्या विकसित देशांना त्यासाठी सात दिवस वाट पाहावी लागते. तेथे काय घडतंय? शैलजा यांना प्रश्न पडलाय. त्याबद्दल त्या मत व्यक्त करू शकत नाहीत, पण तेथील अवास्तव मृत्यूदराने मात्र त्यांना गोंधळात टाकलंय, अस्वस्थ केलंय. त्यांना वाटतं, चाचण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तसंच अलगीकरण आणि इस्पितळातील निगराणी. आणि त्या देशांतील लोकांना नेमकं हेच मिळत नाहीय. त्यांना हे खात्रीनं माहित आहे, कारण तेथील मल्याळी लोकांनी फोन केला, तेंव्हा शैलजा यांनी त्या लोकांना हे विचारून घेतलंय.

लॉकडाउनच्या नियमानुसार सर्व प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली. परिणामी भारतातील काही राज्यांत जोरदार विरोध आणि निषेध व्यक्त करण्यात आला. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बंद करण्यापूर्वी सर्व स्थानिक धार्मिक पुढाऱ्यांशी चर्चा केली, त्यामुळं केरळमध्ये कोणताही विरोध झाला नाही. शैलजा यांच्या मते, उच्च साक्षरता दर हा आणखी एक घटक आहे. शिक्षणामुळे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित झालेला असल्याने तुम्ही त्यांना वैज्ञानिक कार्यकारणभाव समजावून सांगितल्यानंतर, लोकांनी घरात थांबणं आवश्यक आहे हे त्यांना मान्य असतं.

दोन वेळा वाढ केल्यानंतर भारत सरकार १७ मे पासून कुलूपबंद अवस्थेतून बाहेर पडण्याच्या विचारात आहे. शैलजा यांना वाटतंय की, त्यानंतर या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या आखाती देशांतून मोठ्या प्रमाणात मल्याळी लोकांचा ओघ केरळकडे सुरु होईल. ते अतिशय मोठे आव्हान असणार आहे, पण आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत. त्यासाठी तीन योजना तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील शेवटच्या, तिसऱ्या योजनेनुसार, ज्यात जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा शास्त्रीय अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे; विद्यार्थी वसतिगृहे, हॉटेलं आणि सार्वजनिक सभास्थळे ताब्यात घेऊन तेथे १,६५,००० खाटांची व्यवस्था करण्याचे पूर्ण नियोजन झाले आहे. तसे झाले तर तेथे पाच हजार व्हेंटिलेटर्स लागतील. त्यांची मागणी नोंदविलेली आहे. कमी पडेल ते मनुष्यबळ. विशेषतः जेंव्हा संपर्क शोधण्याची गरज असते तेंव्हा. त्यासाठी आम्ही शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षित करीत आहोत.

ही दुसरी लाट येऊन गेली की मगच हे शिक्षक त्यांच्या शाळेकडे परत जातील. त्यांना स्वतःच्याही बाबत असंच घडावं, असं वाटतंय. कारण अजून साधारण वर्षभरात तेथील निवडणूक जाहीर होईल आणि त्यांची मंत्रीपदाची मुदतही संपेल. कोरोना लवकर संपेल, असं त्यांना वाटत नाही. मग त्यांच्यानंतर येणाऱ्या आरोग्यमंत्र्याला यशस्वी होण्यासाठी त्यांचं गुपित काय आहे असं त्या सांगतील … यावर त्या हसतात. त्यांचं नेहमीचं हसू, जे संसर्गजन्य साथीसारखं तुमच्याही चेहऱ्यावर येतं. 

काहीच गुपित ठेवायचं नाही, हेच गुपित. आणि योग्य नियोजन !

 

अनुवाद - नीतिन साळुंखे.

मूळ वृत्तांत 'द गार्डियन 'तर्फे प्रकाशित. तो इथं वाचता येईल.