India

क्यार वादळामुळं कोकणातली शेती उध्वस्त

शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची मागणी

Credit : google

क्यार वादळाची पाठ धरून आलेला बेमोसमी पाऊस. पावसाने झोडपून पीकाच्या लोंबीला आलेले कोंब. आडवी झालेली नाचणीची पीकं. तळशेतीत पुरुषभर साचलेल्या पाण्यावर तरंगलेलं भाताचं पीक. अवकाळी पावसाने असं झोडपल्यावर उरलं सुरलं वाचवून घरी नेण्यासाठी धडपडणारा शेतकरी. भिजलेल्या धान्यापीकाला घरी आणल्यानंतर मोड येताहेत. हे चित्र आहे कोकणातील शेतीचं.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर ऐन दिवाळीत सत्त्तासमिकरणे जुळत असताना कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. क्यार चक्रीवादळासह आलेल्या बेमोसमी पावसाने कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीने भात, नाचणीसह वरी पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकणातील शेती दोन प्रकारची आहे. एक माळावरली शेती जिला सड्याची शेती असंही म्हटलं जातं. सड्यावरच्या शेतीत नाचणी आणि वरी पीक घेतलं जातं. दुसऱ्या प्रकारची शेती ही तळशेती असते जिथे भाताचे पीक घेतलं जातं. सध्या झालेल्या अतिवृष्टीने दोन्ही प्रकारच्या शेतीचं झालेलं नुकसान मोठं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३०० हेक्टर ते सिंधूदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी आणि वरी पीकांचे नुकसान झाले असून शासनाने लवकर पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

साधारपणे शेतीतील पीकाचे झालेले नुकसान मोजताना सातबारावरील पीकपेरा विचारात घेतला जातो. परंतू कोकणातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पीकपेऱ्याची नोंद सातबाऱ्यावर केलेली नसते. त्यामुळे पीकक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा होणे गरजेचे आहे. त्यात जमिनीचे मूळ मालक वेगळे आहेत. शेती कसणारे मक्ता पद्धतीने शेती कसत असतात. शेतजमीन दुसऱ्याच्या मालकीची असते. अशावेळी स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील यांना सोबत घेऊन पंचनामे होणं गरजेचं आहे.



वरची दळवीवाडी इथले गणेश सोंडकर यांची एक एकर शेती आहे. ज्यात ते वरी, नाचणी, भाताचे पीक घेतात. सोंडकर म्हणाले, “आजवर सरकारने कोकणाच्या शेतकऱ्याकडे लक्ष दिलेले नाही. याअगोदर पंचनामे झाले तरी आम्हाला मदत मिळालेली नाही. यावेळी झालेलं नुकसान मोठं आहे. पण सरकारला जाग आलेली नाही. स्थानिक अधिकारी लक्ष देत नाहीत.”

गुहागर येथील तरुण शेतकरी पंकज दळवी म्हणाले, “नेतेमंडळी नांगरणी स्पर्धा भरवतात. यामुळे शेती लागवड वाढेल आणि तरुण शेतीकडे वळतील असं त्यांना वाटतं. पण अशा बिकट परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या मागे असलं पाहिजे हे विसरून गेले आहेत."

कोकणातील शेतकऱ्यांची समस्या थोडी इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळी असल्याचे सांगताना दळवी पुढे म्हणाले, “कोकणातील शेती कर्ज काढून केली जात नाही. त्यामुळे इथे कधी कर्जमाफी मिळत नाही. इथला शेतकरी अशा नैसर्गिक आपत्तीत अडकला असताना सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून थेट नुकसानभरपाई दिली पाहिजे.”

गुहागरच्या तहसिलदार लता धोतरे यांच्याशी संपर्क केला असता कृषीविभाग आणि कृषिअधिकारी काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. शेतीव्यतिरिक्त नागरी भागात नुकसान झाले असल्यास पाहणी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

कृषिअधिकारी अभिजित गडदे यांना नुकसानभरपाईविषयी विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आले नसल्याचं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, “कोकणातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला नाही. सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष निवडणुकीत होते. त्यामुळे याकडे लक्ष जाऊ शकले नाही. पंचवीस तारखेपासून आम्ही प्राथमिक पाहणी सुरू केलेली आहे. ज्यांनी विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी क्लेम फॉर्म भरावेत अशा सूचना दिलेल्या आहेत." 

सातबारावर पीकपेरा नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीविषयी विचारले असता ते म्हणाले, “त्यासाठी वरून जे आदेश येतील त्यानुसार काम करणार आहोत. ऑगस्टमध्ये आम्ही खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचे पंचनामे आम्ही केले होते. सध्या अतिवृष्टीने झालेलं नुकसान मोठं आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश येणे अपेक्षित आहे. एकदा आदेश आले की नोंदी नसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणात स्थानिक ग्रामसेवक, तलाठी यांची मदत घेण्यात येईल."



भातशेतीव्यतिरिक्त आंबा, नारळ, सुपारी, काजू झाडांची पडझड व मच्छीमारांच्या जाळी वाहून जाणे, बोटींच नुकसान झालेल्या घटनांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

गुहागरमध्ये अजित विचारे यांची अर्धा एकर शेती आहे. त्यात नाचणी आणि भात लागवड करतात. अख्खं भाताचं पीक पाण्यात तरंगतयं. भात आडवा झालाय. बहुतांश पीक वाया गेलं आहे. महसूल विभागातलं कुणीही विचारपुस करायला आलेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली.

क्यार चक्रीवादळामुळे कोकण किनाऱ्यालगत असलेल्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुर परिस्थितीने शेतीचे मोठे नुकसान झाले. सध्या मराठवाड्यातल्या काही जिल्हांमध्ये शेतपीकांना अवकाळी पावसाचा फटका बसून कापूस, बाजरी, मका पीक वाया गेले आहे.