Quick Reads
‘‘कश्मीरी उर्दू वर्तमानपात्रांची कश्मिरीयतची भूमिका इतर भारतीय माध्यमांची हिंदुत्वाची’’
या तुलनेत मराठीतील वर्तमानपत्रे ‘बदला’, ‘वचपा’, ‘सूड’, ‘हिंदू पर्यटक’, ‘जिहादी’ अशा आक्रमक शब्दांनी नटलेली आहेत.

कश्मीर हे बहुसंख्य मुस्लिम असलेले राज्य. कश्मीरी मुसलमानांची राजकीय समज, सांस्कृतिक मुल्यनिष्ठा कश्मिरेतर भारतीय मुसलमानांपेक्षा वेगळी. अन्यायाविरोधात आक्रमकता हा त्यांच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे. स्थानिक संस्कृतीवर जीवापाड प्रेम करणारा कश्मिरी माणूस स्वभावतः अतिथ्यशील आहे. जवळपास पाच सहा शतकांपासून कश्मीर हे उच्चमध्यमवर्ग, सरंजामदार आणि राजकारण्यांच्या आकर्षणाचा केंद्र राहिले आहे.
अमीर खुसरोंनी कश्मीरवर अनेक शेर लिहीले आहेत. कश्मीरकडे पाहूनच खुसरोंनी भारताला ‘बहीश्त ए बर जमीं’ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग संबोधले होते. गालीबनेही कश्मीरविषयी काही शेर लिहीले आहेत. तर चकबस्त ब्रजनारायण यांनी कश्मीरच्या पाहुणचाराविषयी आपल्या कवितेत खूप मार्मिक नोंद केली आहे. ते लिहीतात,
‘‘जर्रा जर्रा है मेरे कश्मीर का मेहमांनवाज
राह में पत्थर के टुकडों ने दिया पानी मुझे’’
पण कश्मीर मागच्या काही दशकांपासून दहशतवादाच्या निशाण्यावर आले. दरवर्षी शेकडो कश्मीरींचा बळी घेणाऱ्या दहशतवादाने कश्मीरच्या मुळावर घाव घातला. कश्मीरात सैन्यावर, प्रशासनावर, सामान्य नागरीकांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशातील, राज्यातील सरकार कश्मीरी माणसांच्या मागे ठामपणे उभे राहिले. या कश्मीरी माणसाला वेगळे पाडून या हल्ल्यांना धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. हे हल्ले इथल्या कश्मीरी माणसाने कश्मीरवरील हल्ले म्हणून निंदनीय ठरवले. पण २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच कश्मीरी माणसाला ‘‘ते विरुध्द आम्ही’’ या घाणेरड्या राजकारणाला तोंड द्यावे लागत आहे. देशभरातील वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनेल्स हा हल्ला हिंदूवरील असल्याचे सांगत सुटलेत. त्यामुळे देशभरातील उदारमतवादी, बहुसंख्यांकाची री ओढणारी, भाजपचे समर्थन करणारी प्रसारमाध्यमं हिंदुत्वाची भुमिका घेत असताना कश्मिरी प्रसारमाध्यमे कोणती भुमिका घेत आहेत, ते तपासून पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण कश्मीरमधील काही निवडक उर्दू वर्तमानपत्रांची वार्तांकने आणि संपादकीय भुमिका तपासून पाहूयात.
कश्मिर भाजपच्या भुमिकेचे वार्तांकन
हल्ला झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या समर्थनातील ट्रोलझुंडी देशभरात द्वेषमोहीम हाती घेऊन सक्रीय झाल्या आहेत. भाजपचे नेते मुसलमानांना लक्ष्य करुन विखारी विधाने करत आहेत. भारतभर हे एकसारखे दृश्य पाहायला मिळत असले तरी कश्मीर भाजपने मात्र वेगळी भूमिका घेतली असल्याचे कश्मीरी उर्दू वर्तमानपत्रातील वार्तांकनातून दिसून येते. कश्मीर भाजप प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांच्या नेतृत्वात पहलगाम हल्ल्याविरोधात रॅली काढण्यात आली होती. त्याची बातमी ‘कश्मीर ए उजमा’ या वर्तमानपत्राने पृष्ठ क्र.२ वर दिली आहे. त्यात ही रॅली कशापध्दतीने एकात्मतेचे प्रतीक बनली याविषयी काही निरिक्षणं नोंदवली आहेत.
यावेळी बोलताना सत शर्मा म्हणाले की, ‘‘देश या कठीण काळाचा धैर्याने सामना करत आहे. यावेळी आम्ही एकात्मतेचे दर्शन घडवत आहोत. आमच्या हुतात्म्यांचे बलीदान वाया जाणार नाही.’’ तर सुनिल शर्मा या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘‘देश आणि समाजाला या हल्ल्याने नुकसान पोहोचले आहे. या हल्ल्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामाजिक व आर्थिक पातळीवर आपल्याला हानी सहन करावी लागत आहे.’’
याशिवाय अन्य नेत्यांचीही भाषणे झाली, त्यात त्यांनी एकात्मता, बंधुता, पर्यटन, पाहुणचार अशा संकल्पनांचा वापर करत या हल्ल्याला धार्मिक रंग दिला नाही. भाजपशिवाय पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस व अन्य राजकीय पक्ष व संघटनांनीही निदर्शने केली आहेत. या निदर्शनातही सर्वांनी कश्मीरच्या कश्मिरीयतला महत्व दिले आहे.
‘ते प्रेमाच्या शोधात आले होते, आपण त्यांना हिंसा दिली’
कश्मीरमधल्या काही प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये पर्यटक पाहुण्यांवर झालेल्या हल्ल्याविषयी दुःख व्यक्त करण्यात आले आहे. मुदस्सिर शमीर हे समीक्षक व स्तंभलेखक आहेत. त्यांनी ‘‘मेहमानों के खून से रंगी सरजमीं सय्याहों के कतल पर इन्सानियत नोहकुना’’ हा लेख लिहीला आहे. या लेखात ते म्हणतात, ‘‘पाहुणचार हा आमच्या संस्कृतीचा तो पैलू आहे, ज्याविषयी आम्हाला सतत अभिमान वाटले आहे. पण या दुःखद घटनेत राज्याबाहेरील अनेक पर्यटकांना क्रुरतेने लक्ष्य केले आहे. त्यांची हत्या केली आहे. यामुळे आमची पारंपारीक व ऐतिहासिक प्रतिमाच खराब झालेली नाही तर संपूर्ण कश्मिरी समाजाच्या अंतरआत्म्याला हादरवून सोडले आहे.’’
मुदस्सिर शमीर आपला वारसा कथन केल्यानंतर लिहीतात, ‘‘या निष्पाप पाहुण्यांचा गुन्हा फक्त हा होता की, ते शांतता, सौंदर्य आणि मैत्रीचा संदेश घेऊन आले होते. पण पहलगामच्या शांत पर्वतरांगांमध्ये यांच्या आक्रोषाने ज्या किंकाळ्या जन्माला घातल्या आहेत, त्या आता जगभर ऐकल्या जात आहेत. त्यांच्या हत्येने फक्त मानवताच जखमी झाली नाही तर कश्मीरची ओळख आणि भारताच्या प्रतिमेवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.’’
मुदस्सिर यांच्या मनातील दर्द त्यांच्या लेखातील अखेरच्या परिच्छेदात आला आहे. ते लिहीतात, ‘‘ते लोक जे आपल्या मातृभूमीत प्रेम, इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याच्या शोधात आले होते, त्यांना द्वेष, हिंसा आणि मृत्यूचा तोहफा देऊन आपण परत पाठवले आहे. पर्यटक जे आपल्या जगातून काही दिवसांसाठी सौंदर्य आणि सुकून शोधत बाहेर पडतात. त्यांच्यावर भ्याड हल्ला करणे वास्तविकतः मानवतेचा आत्मा चिरडून टाकण्यासारखे आहे. बळी पडलेल्यांची छायाचित्रे…. ज्यामध्ये काही रक्तबंबाळ प्रेते होती. प्रत्येक संवेदनशील माणसासाठी कयामतीपेक्षा कमी नव्हती. अशा घटना फक्त हानी पोहोचलेल्या कुटुंबासाठी दुःखद नाहीत तर आपली सामुहीक असंवेदनशिलता, अपयशी नेतृत्व आणि क्षीण झालेल्या सामाजिक संरचनेला लगावलेली चपराक आहे.’’
‘पाहुण्यांना आमच्या हातची भाकरी नाही, तर रक्ताने माखलेली जमीन मिळालीय…’
मरिअम मेमोरीयल इन्स्टिट्यूट पंडीतपुरा काझीयाबाद येथील प्राध्यापक इग्ज इकबाल यांनी ‘‘पहलगाम की परछाईयाँ – जहां मेहमानों का खून बहा’’ हा लेख लिहीला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘‘हा हल्ला फक्त माणसांवर झालेला नाही तर मानवतेवर झालाय. पहलगामचा हा हल्ला फक्त पर्यटकांवर झालेला नाही तर कश्मीरच्या जखमी हृदयावर केलेली जखम आहे. आम्ही कश्मीरींनी पाहुण्यांना आपल्या कुटुंबियांप्रमाणे छातीशी लावले आहे. ही जमीन फक्त एक भुभाग नाही तर प्रेमाचे जिवंत प्रतिक आहे. या हल्ल्यात फक्त काही निष्पाप जीवांची हत्या झाली नाही तर आमची संस्कती, पाहुणचार, कश्मिरीयत आणि मानवतेवरील हा हल्ला डाग आहे.’’
इकबाल पुढे लिहीतात, ‘‘कुरआन म्हणते की, ज्याने एका माणसाची हत्या केली त्याने मानवतेची हत्या केली. ज्याने एका माणसाचे प्राण वाचवले त्याने मानवतेला वाचवले आहे. पण इथे तर पाहुण्यांना मारले आहे. पाहुणे तर इश्वराची दया बनून येतात. आमच्या येथे तर पाहुण्यांमुळेच आमच्या चुली पेटतात. त्यांच्यासाठी आमच्या हृदयातून दुआ निघते. हा कसला प्रकोप आहे की, त्यांच्या नशिबात आमच्या हातची भाकरी नाही तर रक्ताने माखलेली जमीन मिळावी? होय आम्ही कश्मीरी आहोत. तेच कश्मीरी ज्यांची दारं नेहमी उघडी असतात. ज्यांच्या शालीतही माया व उब असते आणि हृदयातही.’’
कश्मीरी वर्तमानपत्रे दुःखाचा बाजार मांडत नाहीत…
कश्मीरच्या पर्वतरांगांमध्ये उर्दू वर्तमानपत्रांची संख्या मोठी आहे. एकूण १०० हून आधिक उर्दू वर्तमानपत्रे दररोज प्रकाशित केली जातात. त्याशिवाय काही इंग्रजी वर्तमानपत्रेही निघतात. स्थानिक उर्दू वाहिन्यादेखील आहेत. यापैकी ‘कश्मीर उजमा’, ‘रोशनाई’, ‘तामील ए इर्शाद’, ‘सदा ए कश्मीर’, ‘चट्टान’, ‘औकाफ’, ‘बुलंद कश्मीर’, ‘हिंद समाचार’ ही काही महत्वाची वर्तमानपत्रे आहेत. या वर्तमानपत्रांच्या पहलगामविषयीच्या आजच्या बातम्यांचे शीर्षक पाहिले तर कश्मीरी बुध्दीजीवी पत्रकारीतेची कल्पना करता येऊ शकते.
‘उडान’ या वर्तमानपत्राचे शिर्षक आहे, ‘‘जम्मू कश्मीर में मुकम्मल हडताल से मामुलात ए जिंदगी मुतास्सीर’’ (कश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर एकमुखी बंद पुकारण्यात आला होता, त्याविषयी वृत्तांकन केले आहे.) याच वर्तमानपत्रात अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळल्याच्या बातम्या आहेत. ‘बुलंद कश्मीर’ चे आजच्या मुख्य बातमीचे शीर्षक होते, ‘वादी में अहतजाजी हडताल व मुजाहीरे, मुलवसीन के खिलाफ सक्त कारवाई का मुतालबा’ (बंदविषयी बातमी व दोषींवर कारवाईची मागणी). ‘श्रीनगर जंग’ या वर्तमानपत्राने पुलगामविषयीच्या सर्व बातम्या काळ्या रंगात प्रकाशित केल्या आहेत. तर मुख्य बातमी ‘भारत का पाकिस्तान से तमाम ताल्लुकात मुनकता करने का ऐलान’ ही आहे. कश्मीरमधल्या वर्तमानपत्रांची ही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत.
या सर्व वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्या तर अनेक समाधानकारक बाबी दृष्टीस पडतात. सामाजिक संघटनांनी, स्वयंसेवी संस्थांनी पर्यटकांच्या मदतीसाठी चालवलेल्या शिबिरांची, उपक्रमांची माहिती मिळते. अनेक कश्मीरी पर्यटन व्यवसायिकांनी पर्यटकांना मोफत दिलेल्या सुविधांची दखल घेतली आहे. जखमींची काळजी घेणाऱी रुग्णालये, त्यातील रुग्णांची स्थिती, क्वचित प्रशासनावरचा रोष दिसून येतो. पण दरवेळचा प्रशासनाविरोधातला गळेकाढूपणा कमी जाणवतो. त्याशिवाय जबाबदारी म्हणून कश्मीरी माणूस काय करतोय, याचीच चर्चा या वर्तमानपत्रांमध्ये आहे. त्याव्यतिरिक्त पहलगाम हल्ल्याविरोधातील मोर्चे, धरणे, आंदोलानांच्याही बातम्या आहेत.
या तुलनेत मराठीतील वर्तमानपत्रे ‘बदला’, ‘वचपा’, ‘सूड’, ‘हिंदू पर्यटक’, ‘जिहादी’ अशा आक्रमक शब्दांनी नटलेली आहेत. वस्तुस्थितीविषयी एकमेकांशी अनेक बाबतीत साम्य नसणाऱ्या बातम्या ही वर्तमानपत्रे देत आहेत. त्यामुळे या वर्तमानपत्रांविषयी चर्चा करण्यापेक्षा कश्मीरची कश्मिरीयत जपण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कश्मीरींना दाद देऊन आपण थांबूयात.