Opinion
जयंत पवार आता नसण्याचा अर्थ!
नाटककार आणि लेखक जयंत पवार यांचं वयाच्या ६१व्या वर्षी मुंबईत निधन झालं.
श्रीधर चैतन्य, सुबोध मोरे | गिरणी कामगारांच्या प्रश्नानं घेरलेलं, गिरणगावमध्ये घडणारं, संपाचे परिणाम सांगणारं आणि मुंबईत भाईगिरीचा जन्म, स्काय स्क्रॅपर्सच्या उंचीपेक्षा त्या स्कायस्क्रॅपर्सची सावली कुणाचा आणि कुठवर प्रकाश अडवते हे सांगणारं त्यांचं खतरनाक नाटक 'अधांतर'.
हे नाटक वाचून ती रात्र झोपलोच नव्हतो. (आणि विश्वास पाटलांचं 'लस्ट फॉर लालबाग' विकत घेऊन, वाचून आपण पैसा फुकट उडवायला पनवेलच्या डान्सबारमधे जाण्याइतके नालायक कसे झालो, असं दूषण स्वत:लाच देता झालो.)
या नाटकातलं भरत जाधवांचं काम मला आवडलं. नाटकात इतर महत्वाच्या पात्रांच्या तुलनेत त्यांना फारसं काम (आणि संवाद) नव्हते हेही कारण असेल, किंवा ते गिरणी कामगाराचा बेकार मुलगा म्हणून (वेशभूषा आणि अभिनयामुळे) नेमके शोभले हेही असेल!
आत्ताच सुबोध मोरेंशी (कॉम्रेड हा शब्द अध्याहृत आहे) बोलताना समजलं की, अधांतर या नाटकावर सागर सरहदी हे सिनेमा करणार होते. सिनेमाचा मुहूर्तही झाला होता. पण निर्मात्याच्या आर्थिक अडचणींमुळे तो सिनेमा पुढे सरकला नाही. मात्र ते कथाबीज घेऊन दुसऱ्यानंच सिनेमा केला. आणि सिनेमा पुरता 'फिल्मी' केला. या बेतलेल्या पोकळ सिनेमातलं पावभाजी गाड्यावरचं 'देढ फुट्या' हे कॅरेक्टर गाजलंच.
मुंबईत एका एकांकिका स्पर्धेमधे १४ एकांकिका होत्या. त्यांचा परस्परांमधे सामना झाला. एक कुठली तरी अंतिम विजेती ठरली. या चौदाच्या चौदा एकांकिका जयंत पवारांच्या होत्या, आणि त्यातली एकही एकांकिका 'स्थळ दिवाणखाना' पद्धतीची नव्हती, तर ती समाज आणि भवतालाला कवेत घेऊन प्रश्नांची उत्तरं शोधणारी होती!
त्यांचं 'बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक' हे लिखाण अत्यंत महत्वाचं आहे. मी सतत वाचत असतो. शिवाय महाडमधे चवदार तळ्याजवळ २०१४ मध्ये सत्ता, धर्मांधता आणि कला-कलाकार या मुद्यांना घेऊन केलेलं भाषण मूलभूत विचार मांडणारं, ‘आपण कलेकडं कसं पाहावं’, हे सांगणारं होतं.
त्यांची 'अधांतर' आणि 'काय डेंजर वारा सुटलाय' ही नाटकं सर्वात जबरा आहेत. (असा माझा समज आहे.) त्याचबरोबर 'वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा' आणि 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ' हे दोन्ही कथासंग्रहदेखील प्रचंड म्हणजे जबरा भारी आहेत.
जयंत पवारांनी नुसतीच नाटकं केली नाहीत तर नाटकातून लोक, त्यांचं जग, त्यांचे प्रश्न मांडले. उत्तरं शोधायचा प्रयत्न केला.
जयंत पवारांनी नुसतीच नाटकं केली नाहीत तर नाटकातून लोक, त्यांचं जग, त्यांचे प्रश्न मांडले. उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. फक्त प्रयत्न केला असं नव्हे, तर २०१९ च्या भाजपाच्या काळात ‘तथागत’ आणि 'रोमिओ ज्युलिएट' या नाटकांचं जेव्हा पोलिसिंग झालं तेव्हा या 'आपल्या' नाटकवाल्यानं पोलिसांचा आणि पोलिसांच्या मालकांचा धिक्कार केला! (तेव्हा सुबोध मोरेही संगतीला होते.) अर्थात तेव्हा आत्ताचं सरकार असतं तरी त्यांनी तो धिक्कार केला असताच. कारण ते आणि हे ‘सगळे एकसारखे आहेत’ असं ते मानायचे. त्यांचं लेखन याची साक्ष देतं.
अंनिसच्या २०१९ च्या दिवाळी अंकासाठी, जयंत पवारांची सुबोध मोरे आणि राजीव देशपांडेंनी घेतलेली मुलाखत 'वो किस फौलादमें ढले है' वाचल्यावर, ते कुणासाठी आणि काय लिहिण्याची उरफोड करतात, कोणता झेंडा खांद्यावर घेतात आणि तोच झेंडा का घेतात हे नेमकं कळतं. तसंच त्यांचं 'अक्षरनामा' पोर्टल मधलं लिखाण (मुख्यत: 'लेखकांनो उठा, स्वातंत्र्याचा जाब विचारा') हा लेखक लोकांची बाजू कसा आणि का घेतो हे नेमकेपणानं सांगतं.
९२ व्या मसाप संमेलनावेळी त्यांनी लिहीलेला 'तेरा पॉलिटिक्स क्या हैं? किस के लिए हैं' हे विचारणारा ‘डॉ. ढेरे, देशात कोणती शाही आहे?' हा लेख मराठी वाड:मय व्यवहारांचं त्यांच आकलन सांगणारा होताच पण वाड:मय का, कोणासाठी आणि कसं असावं, हेदेखील सांगणारा होता.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं पहिलं (म्हणजे छकलं पडायच्या आधीचं एकमेव) संमेलन धारावीत भरलं होतं. संमेलनाच्या एका रात्री किशोर ढमाले, सुबोध मोरे, समर खडस आणि संमेलनाचे इतर धुरीण 'अधांतर' नाटक पाहायला गेले होते. नाटकानंतर अर्थातच नाटकावर चर्चा झाली. सगळे विद्रोही अधांतरनं काय मांडलंय, त्याचा आशय किती तीव्र आहे, हे ऐकवत होते. नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांना न जाणवलेले मुद्दे या लोकांनी पुढे आणले. नाटकाचा न जाणवलेला आशय आणि अधांतरसारख्या एखाद्या महत्वाच्या कलाकॄतीचे किती बहुआयामी अर्थ असतात, अशी कलाकृती सामाजिक आणि राजकीय भाष्य कसं करते, हे विद्रोहीच्या लोकांनी मांडलं. काही चळवळे एकत्रितपणे एक नाटक पाहतात, त्यावर चर्चा करतात, त्यातला नवीन अर्थ पुढे आणतात, तो अर्थ आणि ती चर्चा, यावर मंगेश कदमांनी लिहिलं होतं, ते आता पुन्हा नव्यानं पुढं येण्याची गरज आहे.
भली माणसं, भला विचार करणारी आपली माणसं संपत चाललीत याचा त्रास होतोय. पण ही माणसं पुढचं काम करायला आपल्याबरोबर नाहीत, ही पोकळी जास्त क्लेशकारक आहे. जयंत पवारांची एक्झिट आताच नव्हती.