India
दिल्लीत जामियाबाहेर 'ही घ्या आझादी' म्हणत विद्यार्थ्यांवर गोळीबार, १ जखमी
हा सर्व प्रकार दिल्ली पोलिसांच्या समक्ष घडला.
दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर आज सकाळी काही विद्यार्थी महात्मा गांधी स्मृतिदिननिमित्तानं राजघटकडं मोर्चा नेत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या इसमाच्या हातात पिस्टल होती आणि तो, 'तुम्हाला आझादी हवी आहे ना, मग ही घ्या' असं ओरडत होता. यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे.
गेले अनेक दिवस देशभरात CAA-NRC विरोधात वातावरण पेटलं आहे. देशभरातल्या अनेक शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलनं होत असतानाच, अनेक ठिकाणी CAA-NRC समर्थनार्थ आंदोलनंदेखील भाजप आणि इतर तत्सम संघटनांकडून उभी केली जात आहेत. या आंदोलनांमध्ये सुरुवातीपासूनच, 'देश के गद्दारो को, गोली मारो सालो को', 'जिहादीयो की कब्र खुदेगी, सावरकर की धरती पर,' अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या.
दिल्लीतही जामिया विद्यापीठापासून विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यांना सुरुवात झाली होती. गेले जवळपास २ महिने हा गोंधळ सुरु आहे. त्यातच दिल्ली निवडणुकीचा तोंडावर भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान 'देश के गद्दारो को, गोली मारो सालो को' च्या चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. त्यातच आता ही घटना घडली आहे.
आज सकाळी जामिया विद्यापीठ ते राजघाट, अशा मार्गानं CAA-NRC चा विरोध करत महात्मा गांधींच्या हत्येला ७२ वर्ष पूर्ण होणाऱ्या दिवशी काही विद्यार्थी जाणार होते. मात्र इतक्यातच या माथेफिरू इसमानं विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. त्यातली एक गोळी एका विद्यार्थ्यांच्या हातातून आरपार झाली व तो जखमी झाल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रानं दिली. त्याला होली फॅमिली इस्पितळात नेण्यात आलं आहे. या इसमाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा सर्व प्रकार दिल्ली पोलिसांच्या समक्ष घडला.