Quick Reads
जल्लीकट्टं: उधळलेल्या रेड्याचा ऑपेरा
‘उधळलेला रेडा’ हे इथे केवळ एक मॅकगफिन आहे

पार्श्वभूमी
गेल्या एकदोन वर्षात जल्लीकट्टं हा विषय चांगलाच चर्चेत आला होता. ही एक तामिळ प्रथा आहे. ज्यात एका उधळलेल्या बैलाच्या पाठीवरचा उंचवटा (वशिंड) पकडतात किंवा पळत्या बैलाच्या शिंगाला लाल कपडा बांधला जातो. कोर्टानं पशुहिंसेचं कारण देत ह्या सणावर बंदी आणली. आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं.
तमिळ संस्कृती आणि हिंदू धर्म, याविरुद्धचा कट असा रंग त्याला दिला गेला (जे आपल्याकडे बैलगाडा शर्यतींच्या निमित्ताने झालं होतं.) भाजप सरकारनं 'Judicial Activism' ही नवीन टर्म वापरत कोर्टाविरुद्धच मोर्चा काढला. साधारण याच दरम्यान एस. हरीश या मल्याळम लेखकाने आपल्या ‘आदम’ ह्या कथासंग्रहात ‘माओइस्ट’ नावाची एक कथा लिहिली.
एका गावात कापण्यासाठी आणलेला एक रेडा अचानक सुटतो. त्याला आणखी एक रेडा येऊन सामील होतो. आणि दोघे सगळ्या गावात कसा धुमाकूळ घालतात त्याची ही कथा आहे. एस हरीशने ह्या छोट्या कथेतून राजकीय मुद्द्याला हात घातला आहे. (अर्थात त्याच्या पुढच्याच कादंबरीवर केरळमधील हिंदुत्ववादी शक्तींनी जोरात आक्षेप घ्यायला सुरुवातही केली आहे.) माणसातलं पशुत्व अजूनही कसं बाकी आहे, झुंडशाही वेगळ्या विचारला कशी थारा देत नाही अशा अनेक विषयांना ही कथा रूपकात्मक पद्धतीने आपल्यासमोर मांडते.
सिनेमा
सिनेमाने मुळात नावातच बदल करत कथेतला रूपकात्मक भाग आपल्यासमोर आणला आहे. आता एवढा रूपकात्मक वगैरे सिनेमा म्हटल्यावर तो 'आर्ट फिल्म' कॅटेगरीमध्ये गणला जायला हवा. पण जल्लीकट्टं प्रदर्शित झाला तो दिवाळीनिमित्त मोठ्यानं वाजत गाजत. आणि याचं कारण आहे या सिनेमाचा स्टार दिग्दर्शक लिजो जोसे पेल्लीसरी.
‘अंगमली डायरीज’ आणि ‘ई मा याऊ’ ह्या दोन सिनेमानंतर लिजो जोसे हा नव्या प्रकारच्या आर्ट सिनेमातला एक महत्वाचा दिग्दर्शक झाला आहे. कथेचा आणि संकलनाचा प्रचंड वेग, विषयाचं नाविन्य, पार्श्वसंगीतातलं वेगळेपण आणि दिग्दर्शनातले कलात्मक प्रयोग अशा सर्वच पातळ्यांवर त्याचे सिनेमे कमालीचे यशस्वी ठरले आहेत.
अशाप्रकारे या सिनेमात एक गाजलेला राजकीय मुद्दा आणि प्रचंड नावाजलेला दिग्दर्शक ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या आहेत. पण प्रत्यक्ष सिनेमा पाहताना लक्षात येतं की, दिग्दर्शक कथेतल्या अनेक बारकाव्यांकडे सरळ दुर्लक्ष करतो. कथेतली स्त्री-पुरुष नात्यांमधली लेखकाची निरीक्षणं असतील किंवा राजकीय-सामाजिक मुद्दे असतील, ते सगळेच इथे गडबडीत उरकले जातात. बऱ्याच वेळा दिग्दर्शक सिनेमाच्या तांत्रिक बाबींकडे जास्त लक्ष देतोय असं दिसतं. अचानक महत्वाचा सीन बंद होऊन काही मोन्ताजेस समोर येतात, संगीत आणि संकलनाचे प्रयोग चालूच राहतात.आणि हे सर्व असूनही सिनेमा कमालीचा एंगेजिंग वाटत राहतो.मग या गोष्टीला प्रोसेस कसं करायचं?
तर याचं उत्तर आहे की हा सिनेमा राजकीय भाष्य किंवा त्याच्या रुपकांसाठी पाहायचा सिनेमाच नाहीये. हा तर एक ऑपेरा आहे.
ऑपेरा म्हणजे एक प्रकारचं संगितक असतं. एका साधारण नाटकाच्या कथेला संगीत, दृश्य अशा सर्वच माध्यमांनी लार्जर दॅन लाईफ बनवलेलं असतं. इथं कथेपेक्षा तांत्रिक बाबी जास्त महत्वाच्या ठरतात.
ऑपेराचं कथानक अत्यंत सोपं आणि छोटं असतं. पात्रांच्या भावना वगैरे यातील क्लिष्टता शक्यतो टाळलेली असते. ज्यामुळे इतर तांत्रिक गोष्टींकडे लक्ष द्यायला जास्त सोपं जाईल. पुढे काय होईल याच्या उत्सुकतेपेक्षा, “आता समोर जे घडतंय, ते साध्य कसं केलं” हा आश्चर्य वाला फॅक्टर इथं जास्त महत्वाचा असतो.
जल्लीकट्टं नेमकं हेच करतो, तो सिनेमा माध्यमातल्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या सर्वांचा मोठ्या खुबीने वापर करतो. इथल्या प्रत्येक पात्राचे इश्यूज नोंद घेण्याइतके दिसतात. पण त्यातल्या बारकाव्यांकडे सिनेमा फार लक्ष देत नाही. रूपकात्मकतेकडेही नाही. त्याचा भर आहे तो, एखादी गोष्ट किती इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवता येईल यावर.
उदाहरणादाखल बघा, सिनेमात इन्स्पेक्टरचा एक ट्रॅक येतो. त्याचं बायकोसोबत भांडण आहे वगैरे गोष्टी चालू असतात. त्याच वेळेला पोलिसांनी ह्या सुटलेल्या रेडा प्रकरणात काहीतरी करावं अशी लोकांची अपेक्षाही वाढत जाते आहे. हे सगळं एका घटनेत रुपांतरीत होतं आणि त्याची जीप जाळण्यात येते. आणि पुढच्याच प्रसंगात आपण पोलीस लुंगी नेसून रेडा पकडायला आलेला पाहतो. ह्या संपूर्ण प्रवासाला काहीएक अर्थ आहे पण आपल्या लक्षात राहते. जीप जाळण्याचा सीन एका टेकमध्ये होतो आणि त्यात केली जाते ही गोष्ट.
कथानक छोटं करण्याबाबतही सिनेमाने हीच पद्धत वापरली आहे. सिनेमात कथेत असलेला दुसरा रेडा येतच नाही. त्यामुळे कथानक एकरेषीय सोपं होऊन जातं. जे सिनेमाला वेग मिळवून देण्यातही उपयोगी ठरतं.
सिनेमाची तांत्रिक खुबी पहिल्या सेकांदापासून ठळक दिसायला लागते. सिनेमा एक दिवस आणि एक रात्र एवढ्याच काळात घडतो. मग त्या गावातला नेहमीचा एक दिवस कसा असतो हे दाखवण्यासाठी दिग्दर्शक घड्याळ, श्वास अशा नेहमीच्या क्रियांमधून पार्श्वसंगीत बनवून रोज घडणारी गोष्ट वेगळ्या पद्धतीने दाखवतो. त्याने सिनेमाची तत्परता कळून येते. आणि अशीच तत्परता अधोरेखित करतो सतत हलणारा आणि कायम गडबडीत असणारा त्याचा कॅमेरा.
सिनेमा पार्श्वसंगीतापासून, कॅमेरापर्यंत कुठल्याही गोष्टीत वास्तविकतेचा सोस धरत नाही. आपण सिनेमात 'realistic' हा शब्द अगदीच स्वस्त करून टाकलेला असताना. हा दिग्दर्शक मात्र तसं काहीही करताना दिसत नाही. तो अचानक येणारं आणि अजिबात नॅचरल वाटणार नाही असं पार्श्वसंगीत वापरतो. रात्रीसुद्धा सगळे व्यवस्थित दिसतील असा लाईट देतो.कारण, (परत एकदा) ह्या दिग्दर्शकाचा कल आहे, तो सिनेमाची ऑपेराटीक व्हॅल्यू वाढवण्यात, ना की त्याला वास्तविक बनवण्यात. म्हणून तर आपल्याला रात्रीच्या जंगलात सगळी माणसं बॅटरी आणि मशाली घेऊन निघतात तेंव्हा ती काजव्यांची आरास करावी असं सगळं सुंदर दिसतं. मग ते किती 'realistic' असेल याच्याशी त्याचा संबंध नाही. (आपल्याकडे असेच ऑपेराटीक सिनेमे बनवणाऱ्या भन्साळीचा अभ्यास करण्याऐवजी त्याला शिव्या घालण्यात आपण जास्त धन्यता मानतो.)
रूपकात्मकता
पण ह्या दिग्दर्शकाची अजून एक खासियत म्हणजे, सिनेमा कितीही ऑपेराटीक, भव्य असला तरी त्यानं मूळ कथानक खूपच तगडं घेतलं आहे. त्यामुळं त्याच्या प्रत्येक छोट्या सीनमध्येही खूप सारी माहिती भरलेली आहे. अगदी रोज घडणाऱ्या क्रियांमध्ये बायकोला सहज मारणारा नवरा दिसतो. दुसरीकडे मुलीला अंघोळ करताना वाकून बघणारं एक पात्र आहे.
मुख्य पात्राचे त्याला आवडणाऱ्या मुलीशी असणारे सबंध आहेत. जे खूप क्लिष्ट आहे. एका कंजूष माणसाच्या घरी मुलीच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे. त्याच्या मुलीच्या डोक्यात दुसरंच काहीतरी पिकतंय. गावातले मूळ रहिवासी कोण आणि वर्की सारखे बाहेरून आलेले कोण? हा वाद आहे. नक्की किती पिढ्या आधी आलेले म्हणजे मूळ रहिवासी समजायचे? हा प्रश्न आहे.
रेडा जेव्हा भर चौकात येतो तेव्हा एकीकडं भाजपचा झेंडा आहे, तर दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टीचा. मग रेडा बरोबर कसा कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा पाडतो. त्यांनंतर तो नेमका बँकेत घुसतो. हे एकीकडं येतं. तर दुसरीकडे रेड्यानं चर्चला दान दिलेल्या जागेतच नेमकी नासधूस केली ह्यावर चर्चा होते.
अँटनीसाठी रेडा पकडणं ही आधी प्रतिष्ठेची बाब असते, पुढे कुठेतरी ती प्रेम मिळवण्याची गोष्ट होऊन जाते आणि शेवटी ती एक सुडाची कृती ठरते.
असे अनेक बारीक धागे सिनेमा सोडत राहतो. पण त्याची उकल स्पष्टपणे करत नाही. ही तक्रार असेलच. (म्हणूनच कदाचित एक उधळलेला प्राणी आणि त्याभोवतीच्या अनेक कथा, अनेकपात्रं, यांचीउत्तम गुंफण असलेला उमेश कुलकर्णीच्या ‘वळू’ची अनेक वेळा आठवण येते.)
कारण शेवटी ‘उधळलेला रेडा’ हे इथे केवळ एक मॅकगफिन आहे. त्याभोवती काय घडतं हे महत्वाचं. पण इथं दिग्दर्शक रेड्यालाही तितकं महत्व देतो. त्याचं एकाच शॉटमध्ये चालत्या गाड्याला धडक देणं, विहिरीत पडणं हे सगळंच इथं महत्त्वाचं होतं. त्याला एक सिनेमॅटीक व्हॅल्यू आहे. (विहिरीचा सीन म्हणजे तर अशात पाहिलेल्या सेट पिसेसचा उत्तम नमुना ठरावा.)
त्यामुळे केवळ रुपकं, राजकीय भाष्य एवढंच नाही तर दिसण्यालाही इथं तेवढंच महत्व आहे. कथेच्या बारकाव्यांसोबत वेगालाही महत्व आहे. आणि रेडा केवळ मॅकगफिन नाही तर तो स्टेजच्या भर मध्ये थांबलेला मोठा सेट पीस आहे. म्हणूनच हा सिनेमा नावात जल्लीकट्टं असला, तरी हे राजकीय भाष्य करणारं प्रहसन नसून 'उधळलेल्या रेड्याचा ऑपेरा' आहे.