India
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून कारागृहात उपोषण
कैद मानवाधिकार कार्यकर्त्यांचं आज उपोषण
कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता तळोजा तुरुंगातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आज लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे. एल्गार परिषदेचा प्रतिबंधित माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांना दोन वर्षांपुर्वी युएपीएखाली अटक केली आहे. सध्या हे सगळे मानवाधिकार कार्यकर्ते तळोजा कारागृहात आहेत, तर वरवरा राव प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सध्या तळोजा रुग्णालयात असणाऱ्या एड. सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, डॉ. आनंद तेलतुंबडे, एड. अरुण फरेरा, महेश राऊत, वर्नन गोंसालवेज, फादर स्टॅन स्वामी, गौतम नवलखा, प्रा. हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी होत असल्याचं, त्यांचे वकील एड. निहालसिंह राठोड यांच्यामार्फत सांगितलं असून, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारं पत्रकही राठोड यांच्यामार्फत जाहीर केलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की,
"सर्वप्रथम या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी बांधवास आम्ही सर्वजण आदरांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान या आंदोलनास अधिक दृढ व निश्चयी बनवेल, याची आम्हाला खात्री आहे."
आम्ही बंदिवान जरी प्रत्यक्ष तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नसलो तरी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून आपल्या लढ्यात सहभागी होत आहोत. आपल्या मागण्या यथायोग्य असून कायद्याच्या रुपाने केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांना, कंपन्यांचा गुलाम बनवण्याचा घाट घातला आहे. या देशात जिथे शेतकऱ्याला बळीराजा म्हणले जाते, तिथेच राजरोसपणे त्यांची शेती हिसकावून अडाणी- अंबानी यांच्या दावणीला बांधण्याचा हा कुटील डाव आहे. काळाची पावले आधीच ओळखून आपण उभा केलेला हा जनलढा ऐतिहासिक तर आहेच, सोबतच तो मस्तवाल झालेल्या केंद्र सरकारला शुद्धीवर आणण्याचे कामदेखील करत आहे.
केंद्रातील सरकार व त्यांचे स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना लोकशाही ही मुळातच नको आहे. सहिष्णुता, एकता, समानता, बंधुभाव या सर्वाचा त्यांना तिटकाराच आहे. ती त्यांच्या जातीवादी, धर्मवादी उद्देशांच्या विरोधात जाते. लोकशाही, संविधानिक मूल्यांची जाण करून देणाऱ्यांना ते घाबरतात आणि मग हेतुपुरस्पर अशा लोकांना नावे ठेवण्याचे षडयंत्र रचतात. त्यांचा उद्देश अशा लोकशाहीवादी लोकांची विश्वासार्हता कमी करून अथवा संपवून जनमानसात भ्रम निर्माण करणे हाच असतो.अशीच कुटील कारस्थाने त्यांनी मागील पाच - सात वर्षात केली अनेक समाजशील व संवेदनशील लोकांना जायबंदी करण्यात ते यशस्वी झाले आहेत, यातूनच त्यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी, देशद्रोही, दलाल इ. बिरुदं लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याविरोधात शेतकरी व सुजाण जनतेने सत्ताधाऱ्यांना लावलेल्या चपराकीने त्यांच्या उरात धडकी भरली आहे.
या अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण उभा केलेला लढा अत्यंत प्रेरणादायी असून तो येणाऱ्या काळासाठी पथदर्शक ठरेल. आपण या आंदोलनातून संघ, मोदी सरकार, त्यांचे मंत्री, आणि त्यांचा गोदी मीडिया यांचे मनसुबे धुळीस मिळवत त्यांचे षडयंत्र लोकांसमोर आणले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि सरकार दोघे मिळून भांडवलदारांची चाकरी करताना नागडे झाले आहेत. त्यांचे जनतेप्रती असलेले उत्तरदायित्व ते पायदळी तुडवत निघाले आहेत. जगाच्या पोशिंद्याला, रक्त गोठवणाऱ्या थंडीत अंगावर गार पाण्याचा मारा झेलायला लावून, त्यांच्यासोबत चर्चा करण्याऐवजी धर्माच्या आधारावर त्यांच्यात फूट पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला.
देशबांधवांनी घाम, रक्त गाळून उभ्या केलेल्या, जगात नावलौकिक मिळवून दिलेल्या सरकारी कंपन्या, त्यांच्या मित्र भांडवलदारांना खैरातीत वाटल्या जात आहेत. एकीकडे भांडवलादारांना कर्ज, कर, दंड माफ केले जात आहेत आणि दुसरीकडे जनतेवर कराचे ओझे लादले जात आहे. जेव्हा अख्खा देश करोनाने गलितगात्र झाला होता, तेव्हा मजुरांना हजारो किलोमीटर पैदल चालवणारे हेच सत्ताधारी समस्येत संधी शोधून भांडवलदारांचेच खिसे भरण्याचे काम करत होते. त्यांना लाखो - करोडो रुपयांचे पॅकेज देऊन त्याची वसुली सर्वसामान्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी घाम, रक्त गाळून ७० वर्षांच्या अथक परिश्रमातून उभा केलेला हा देश नालायकांनी विकायला काढला आहे, खरे देशद्रोही, आतंकवादी हेच आहेत.
या लाक्षणिक उपोषणात फादर स्टॅन स्वामी आणि गौतम नवलखा यांना, त्यांच्या आरोग्यविषयक अडचणींमुळे सामील होऊ न देण्याचा निर्णय आम्हाला नाईलाजाने, त्यांच्याइच्छेविरोधात घ्यावा लागला. तब्येतीची पर्वा न करता ते या आंदोलनात सामील होण्यासाठी आग्रही होते, परंतु सर्वांच्या मतांचा आदर ठेवत आपल्या आंदोलनात, ते आपल्या बाजूने नैतिकदृष्ट्या खंबीरपणे उभे आहेत, असं त्यांनी कळवण्यास सांगितलं आहे.
शेतकरी बांधवांनी दाखवलेली एकजूट, लढाऊ बाणा आणि दृढनिश्चय सर्व देशबांधवांसाठी प्रेरणास्रोत बनेल, यात कोणतीही शंका नाही, आम्ही त्यांच्या या लढ्यात पूर्णपणे सामील आहोत, व सर्व सुजाण नागरिकांना, त्यांनी तन मन धनाने यात सामील होऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, असं आवाहन करतो.’
- महेश राऊत, सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, आनंद तेलतुंबडे, रोना विल्सन, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, अरुण फरेरा, वर्नन गोंसालवेज, फादर स्टॅन स्वामी आणि गौतम नवलखा.