India

वाद घालण्याइतपत शरजीलचं वाक्य निषेधार्ह आहे का?

उस्मानी यांच्यावर पुणे पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

Credit : Shubham Patil

पुण्यात ३० जानेवारी रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी व 'फ्रॅटर्निटी मुव्हमेंट' (बंधुता आंदोलन)चे राष्ट्रीय सचिव शरजील उस्मानी या २३ वर्षीय कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय जनता पक्षाकडून आक्षेप घेतले गेले होते. उस्मानी यांच्यावर पुणे पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. 'हिंदू समाज आतून सडून गेला आहे' असं विधान केल्यानं शरजील यांच्यावर आक्षेप घेतल्याचं भारतीय जनता पक्षाकडून सांगितलं जातंय. "आम्ही एल्गार परिषदेतील सर्व भाषणांचे व्हिडीओ मागवले असून त्यात कोणी काय विधाने केली याची तपासणी करून योग्य कारवाई करू," असं  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं.

भाजपच्या राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रवीण दरेकर यांनी 'शरजील हा तिकडून महाराष्ट्रात येतो आणि इथल्या समाजाला काहीबाही म्हणतो' अशी भूमिका घेत 'शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नसेल तर राज्य सरकारने कारवाई करण्याची धमक दाखवावी' असं म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अत्यंत तीव्र प्रतिक्रिया देत, 'त्याच्या मुसक्या आवळण्याची' मागणी केली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रविवारी मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी शरजील यांचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा दाखवून त्यावर चर्चा घडवून आणली. टीव्ही माध्यमांनी त्यांच्या या एकाच वाक्याभोवती वार्तांकन करत 'हिंदू समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य' अशी बातमी दाखवत शरजील यांच्यावर निशाणा साधला. मात्र शरजील यांचं हे वाक्य 'जुनैद मुहम्मद उस्मानी' या पंधरा वर्षीय बालकाच्या झुंडबळीच्या घटनेवर आधारित होतं. विरोधाभास असा की  शरजील यांनी आपल्या भाषणात माध्यमांच्या याच प्रवृत्तीमुळं, 'मी भारताच्या प्रसारमाध्यमांच्या स्थितीविषयी काही बोलूच इच्छित नाही' असं म्हणून माध्यमांवर ताशेरे ओढले होते.

 

शरजिल उस्मानी नेमकं काय बोलले?

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व कार्यकर्ते शरजिल उस्मानी यांनी मुस्लिम समाजातील व्यथा मांडत सरकार आणि समाजातील प्रतिगामी गटांवर भाष्य केलं होतं. 'एक सामान्य मुस्लिम घरातील मुलगा म्हणून आपण आपली कैफियत मांडतो आहोत' असं म्हणत त्यांनी आपली स्वतःची गोष्ट उपस्थितांना सांगितली होती. "पहिल्यांदा गैर मुस्लिम सभेसमोर व दलित वर्गासमोर आपलं बोलणं होतंय. त्यामुळं मी काही चुकीचं बोललो तर उपस्थितांनी कार्यक्रमानंतर आपल्याला भेटावं आणि माझी चूक मला दाखवून द्यावी," असं शरजील यांनी भाषणाच्या सुरुवातीला प्रांजळपणे सांगितलं होतं. "हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई, हम सब भाई-भाई' हे खरं असेल तर दरवेळी एकच मुस्लिम भाईच झुंडबळीत का मारला जातो याचा विचार करणे आवश्यक आहे," असंही शरजील म्हणाले होते.

"लिंचिंग करणारा समाज आता आपल्या सामान्य जीवनाचा भाग झाला आहे. या द्वेषाला संपवणे गरजेचे आहे. या द्वेषातून सरकारच्या लोकविरोधी धोरणाला खतपाणी मिळते. हा द्वेष संपवणे ही मुस्लिमांची नव्हे बहुसंख्य समाजाची जबाबदारी आहे. चांगले हिंदू लोकही मुस्लिम समाजाला 'बिचारा समाज' म्हणून बघत असतात," असं म्हणत शरजील हे समग्र हिंदू समाज मुस्लिमांना नेहमीच परकेपणाने बघत असतो ही बाब अधोरेखित करत होते. "शरजील उस्मानी हा पुण्यात येतो," अशा शब्दात  केशव उपाध्ये यांनी आपल्या प्रतिक्रियेची सुरुवात केली.  शरजील यांनी याच मुद्दयावर आपल्या भाषणात भर दिला होता. "संसदेत ४% मुस्लिम असताना एन्काऊंटर आणि जेलमध्ये, दंग्यात, मृतांमध्ये मुस्लिम सर्वाधिक कसे असतात," असा सवाल त्यांनी केला होता.

शरजिल उस्मानी यांनी यापूर्वी बरेचदा जुनैदच्या घटनेकडे लक्ष वेधत हिंदू समाजाच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोट ठेवलं होतं. त्यांचे 'वादग्रस्त' म्हणवलं जाणारं वक्तव्य त्याचाच भाग होतं. 

 

ज्याच्याबद्दल शरजील बोलले तो जुनैद कोण होता?  

पंधरा वर्षीय बालक जुनैदला जुलै २०१७ मध्ये दिल्ली-मथुरा रेल्वेत लोकांसमक्ष भोसकण्यात आलं होतं. आपल्या भाऊ आणि मित्रांसोबत ईदची खरेदी करून परत येणाऱ्या जुनैदला ट्रेनची सीट शेयर करण्याच्या वादातून काही हिंदू तरुणांनी चाकूने भोसकून ठार केलं. तरीही उपस्थितांच्या गर्दीतून एकही माणूस त्याला वाचवण्यासाठी पुढं आला नाही. याप्रकरणी सहा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यातील चार जणांची दोन महिन्यांतच निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत दंगा भडकावणं व इतर आरोप मागे घेण्यात आले. 

वय वर्ष ५० असणारे जुनैदचे वडील टॅक्सी चालवून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. याविरोधात जुनैदचे वडील जलालुद्दीन पंजाब व हरियाणाच्या उच्च न्यायालयात गेले व फरिदाबाद कोर्टाचा निकाल थांबवून खटला उच्च न्यायालयात वा सीबीआय कडे वर्ग करावा अशी विनंती करण्यात आली.  उच्च न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावली. ते याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या २ सदस्यांच्या बेंचसमोर त्यांनी पुन्हा अपील केलं व दोषींवरील गुन्हे मागे घेतले जाऊ नयेत अशी मागणी केली. "मी आजकाल बराच वेळ स्वतःशीच बोलत असतो. त्याच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा कुणाकडून तरी नाव सांगण्यात चूक झाली असावी असं वाटत होतं," असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. 

शरजील यांच्यावर उत्तर प्रदेशाच्या योगी आदित्यनाथ यांनी अनेक आरोप लावले होते. जेलमध्ये राहून आल्यानंतर शरजील यांच्यावर गुंडा कायदा लावत त्यांना  ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलं होतं. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांवर अशीच कारवाई करण्यात आली होती. 'उत्तर प्रदेश सरकार व प्रशासनाची ही कारवाई सूडबुद्धीतून आली असल्याचं' सांगून  शरजील यांनी याला 'कायदेहीन व्यवस्था' म्हणून संबोधलं होतं. 

 

हिंदू समाजाविषयी समाजसुधारकांची मतं

हिंदू समाजाच्या सद्य व भूतकालीन स्थितीविषयी अनेक समाजसुधारकांनी अशीच मतं व्यक्त केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेविषयी आपली मतं व्यक्त केली होती. "हिंदू राज्य आले तर ते देशासाठी गंडांतर असेल. ते लोकशाहीच्या पूर्णपणे विरोधात आहे, त्याला कोणत्याही किंमत चुकवून रोखले पाहिजे," असं बाबासाहेब म्हणाले होते. 

अनेकदा जहाल बोलणाऱ्या मुस्लिम लोकांकडे बोट दाखवत त्याचा बागुलबुवा केला जातो मात्र आंबेडकरांनी यावर आपलं मत परखडपणे मांडलं होतं. "मला हे म्हणण्यात काहीही गैर वाटत नाही की जर मुस्लिम सत्ताधीश क्रूर वागले असतील तर हिंदू नीचपणाने वागले आहेत. आणि क्रूरपणाहुन नीचपणा कधीही वाईटच." (I have no hesitation in saying that if the Mohammedan has been cruel, the Hindu has been mean; and meanness is worse than cruelty.)