India
अशोका विद्यापीठाला गुप्तचर विभागाची 'भेट'
या 'भेटी'नंतर भारतातील शैक्षणीक क्षेत्रातील स्वातंत्र्य आणि संशोधनावरील मर्यादांवर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे.
अशोका विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सब्यसाची दास यांच्या २०१९ मधील निवडणुका आणि भाजपच्या अटीतटीच्या जागांवर झालेल्या लढतींमधील विजयावर संदेह उपस्थित करणाऱ्या शोधनिबंधावर गदारोळ झाल्यानंतर, आता भारताचा गुप्तचर विभाग या शोधनिबंधाचा तपास करत असल्याचं समोर आलं आहे. ‘द वायर’नं केलेल्या एका वृत्तानुसार गुप्तचर विभागाचे काही अधिकाऱ्यांनी याबाबतीत चौकशी करण्यासाठी सोमवारी हरियाणाच्या सोनिपतमधील अशोका विद्यापीठाला भेट दिली. या 'भेटी'नंतर भारतातील शैक्षणीक क्षेत्रातील स्वातंत्र्य आणि संशोधनावरील मर्यादांवर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे.
दास यांनी लिहिलेल्या 'जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची पीछेहाट' या निबंधात “भाजप ज्या जागांवर निवडणुकी आधी सत्तेत होती आणि त्यातील ज्या जागांवर अतितटीची लढाई होती त्या जागांवर भाजपनं अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली" असं म्हटलं. राष्ट्रीय मतदान सर्वेक्षणातील आकडेवारीचा वापर करत अशा जागांवरील निवडणुकीत गोंधळ झाल्याची शक्यता यात पडताळण्यात आली. हा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर भारतीय जनता पक्षाकडून कडव्या प्रतिक्रिया आल्या. यानंतर लगेच अशोका विद्यापीठानं त्यांचे हात काढून घेतले. एवढंच नाही तर “सदर संशोधनाचं समीक्षण झालं नसून त्याला अजून कोणत्या अकेडमिक जर्नलमध्ये प्रकाशित केलेली नाही," असं म्हणत दास यांच्या संशोधनाच्या विश्वासाहर्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर दास यांनी राजीनामा दिला, जो विद्यापीठानं तात्काळ स्वीकारला. यावरून विद्यापीठानं दास यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं असल्याच्या चर्चादेखील सुरु झाल्या.
अशोका विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांनी सहृदयता दाखवत दास यांच्या राजीनाम्याचा विरोध दर्शवला आणि दास यांना पुनर्नियुक्त करण्याची मागणी केली. त्याचबरोबर संप पुकरण्याचेही संकेत दिले. अशोका विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील आणखी एक प्राध्यापक पुलाप्रे बालकृष्णन यांनीदेखील त्यांचा राजीनामा दिला. भारत आणि भारताबाहेरील शैक्षणिक क्षेत्रातील जवळपास ३००हुन अधिक व्यक्तींनी दास यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या राजीनाम्याचा निषेध केला. भारतात एवढ्या मोठ्या संख्येनं एखाद्या प्राध्यापकाच्या बाजूनं विद्यापीठातील प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी उभं राहणं दुर्मिळ असल्याचं म्हटलं जातं.
याच पार्श्वभूमीवर अशोका विद्यापीठाला गुप्तचर विभागानं दिलेली भेट शैक्षणिक क्षेत्रावर दडपशाही आणण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करते. सोमवारी विद्यापीठात पोहोचल्यावर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दास यांना भेटण्याची मागणी केली. मात्र दास सध्या तिथं नसल्यानं हे होऊ शकलं नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी इतर प्राध्यापकांना भेटून दास यांच्या शोधनिबंधांबाबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांनी याबाबत लेखी मागणी न केल्यानं प्राध्यापकांनी भेटण्यास नकार दिला, असं समोर आलं.
Open letter to the governing body of Ashoka University from the economics department pic.twitter.com/DSfnF4Ez55
— Economics @ Ashoka (@EconAtAshoka) August 16, 2023
दरम्यान अशोका विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागानं विद्यापीठाच्या प्रशासकीय समितीला खुलं पत्र लिहीत शैक्षणिक संशोधनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप न करण्याची मागणी केली आहे. असं झाल्यास मोठ्या प्रमाणात विभागातील प्राध्यापक बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि नवीन प्राध्यापकदेखील येण्यापूर्वी विचार करतील, असं या पत्रात म्हटलं आहे.
सोमवारी चौकशी ना झाल्यामुळं मंगळवारी गुप्तचर विभागाचे अधिकारी पुन्हा विद्यापीठाला भेट देण्याचा अंदाज होता, मात्र त्याबाबत काही माहिती अजून समोर आलेली नाही.