Asia

इंडोनेशियन विमानाचा अपघात झाल्याची शक्यता, ६० प्रवासी दगावल्याची भीती

जकार्ताजवळील समुद्रात विमानसदृश्य अवशेष सापडल्याचा दावा एका मच्छिमारानं केल्याचं वृत्त आहे.

Credit : Deutsche Welle

इंडोनेशियातील स्रिविजया विमानवाहतूक कंपनीच्या बोईंग ७३७ या विमानाचा अचानक संपर्क तुटल्यानं हे विमान अपघातात समुद्रात बुडालं असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ६० पेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या या विमान अपघाताची अद्याप अधिकृत पुष्टी मिळाली नसली तरी जकार्ताजवळील समुद्रात विमानसदृश्य अवशेष सापडल्याचा दावा एका मच्छिमारानं केल्याचं वृत्त आहे.

इंडोनेशियातील विमानवाहतूक विभागानं जकार्ता ते पोंटिएनाक या ९० मिनिटांच्या फ्लाईटचा संपर्क उड्डाण सुरू झाल्यानंतर ४ मिनिटांच्या आतच तुटल्याची माहिती दिली. कॉम्पस टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार जकार्ताच्या उत्तरेला समुद्रात एका मच्छिमाराला विमानाचे अवशेष दिसल्याचं सांगितलं जात आहे. सॊलिहिन नावाच्या मच्छीमारानं बीबीसी इंडोनेशियाशी बोलताना विमान समुद्रात कोसळताना आपण प्रत्यक्षात पहिल्याचा दावा केलाय. मात्र, हे अवशेष याच विमानाचे आहेत, या दाव्याला संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांनी अद्याप पुष्टी दिलेली नाही. उड्डाण घेतल्यानंतर चारच मिनीटांच्या आत समुद्रसपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर असताना एसजे १८२ हे बोईंग विमान अचानक अतिशय वेगानं खाली कोसळत गेल्याची माहिती फ्लाईटट्राडर२४ या विमान उड्डाणावर देखरेख ठेवणाऱ्या कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून दिली आहे. जकार्ता आणि पोंटिएनाक या दोन्ही विमानतळांवर प्रवाशांच्या नातेवाईकांचा गोंधळ आणि प्रार्थना सुरू असून संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती येण्याची वाट बघितली जात आहे.

 

 

प्रवासी विमान वाहतूकीच्या अपघाताची इंडोनेशियातील ही पहिलीच घटना नसून २०१८ साली लायन एअर या इंडोनेशियन विमान वाहतूक कंपनीच्या बोईंग ७३७ मॅक्स या विमानाचाही अपघात होऊन १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. २०१४ सालीही एअर एशियाच्या प्रवासी विमानाचा अपघात होऊन १६२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. विमान अपघातांच्या यादीत इंडोनेशिया जगात आघाडीवर असून विमानवाहतूकीसाठीच्या अतिशय हलक्या दर्जाच्या पायाभूत सुविधा, जुन्या आणि सुरक्षा मानकांमध्ये न बसणाऱ्या विमानांना कार्यरत ठेवलं जाणं, ही इंडोनेशियातील सातत्यानं होणाऱ्या विमान अपघातांची मुख्य कारणं आहेत. आजच्या अपघातातील बोईंग ७३७ - ५०० हे विमानदेखील तब्बल २७ वर्ष जुनं असल्याची माहिती आता ट्रॅकिंग डेटामधून समोर येत आहे. या घटनेमुळं इंडोनेशियातील विमानवाहतूक सेवेचा दर्जा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.