India

सैनिकी सेवेतील अर्ध्याहून अधिक व्यक्ती मानसिक तणावात: अहवाल

वर्षाला भारतीय सैन्यातील १०० पेक्षा अधिक अधिकारी/सैनिकांची मानसिक आरोग्यातून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आत्महत्या.

Credit : Representational Image

दर तिसऱ्या दिवशी एक याप्रमाणं वर्षाला भारतीय सैन्यातील १०० पेक्षा अधिक अधिकारी/सैनिक मानसिक आरोग्यातून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचा धक्कादायक खुलासा युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आला आहे. सीमेवरील गोळीबार आणि लष्करी मोहीमांपेक्षा कामाच्या तणावामुळं आत्महत्येचा मार्ग पत्कारून जीव गमावणाऱ्या भारतीय सैनिकांची संख्या जास्त असल्याच्या या आकडेवारीनं भारतीय सैन्यदलाच्या कामाकाजावरंच प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे भारतीय सैन्यातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच तयार केलेला हा अहवाल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून कोणतंही स्पष्टीकरण न देता आता अचानक काढूनही टाकण्यात आलाय.

युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ संशोधक आणि कर्नल ए के मोर यांच्याच अध्यक्षतेखाली हा अहवाल बनवून प्रसिद्ध करण्यात आला होता. "सातत्यानं अस्थिर आणि बंडखोरीनं ग्रासलेल्या प्रदेशात करावं लागत असलेलं जिकीरीचं काम आणि वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांसोबत असलेले तणावपूर्ण संबंध हे भारतीय सैनिकांच्या बिघडत चाललेल्या मानसिक स्वास्थाचं प्रमुख कारण आहे," असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आलाय. भारतीय सैन्यातील अर्ध्याहून अधिक सैनिक प्रचंड मानसिक तणावातून जात असून लष्करी मोहीमांपेक्षा जास्त मृत्यू याच मानसिक तणावातून होत असल्याचंही हा अहवाल सांगतो. भारतीय सैन्यदलात एकूण १४ लाखांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत असून मागच्या एका दशकातंच ११०० पेक्षा अधिक सैनिकांनी कामाच्या तणावातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय‌‌.

कामाचे अनियमित तास, वरिष्ठांकडून मिळणारी हिणकस वागणूक, संसाधनांची कमतरता, बदली आणि बढतींमध्ये होणारा भ्रष्टाचार, असंवेदनशील नेतृत्व, महिनोमहिने न मिळणाऱ्या रजा तसेच राहण्या-खाण्याची होत असलेली गैरसोय अशा अनेक बाबी सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करत असल्याचं सांगत मागच्या १५ वर्षांपासून आपल्या सैनिकांच्याच मानसिक आरोग्याची काळजी घेण्यात भारतीय सैन्यदल आणि सुरक्षा मंत्रालय अपयशी ठरल्याची टीका युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानं केली आहे. आत्महत्येच्या या वाढत्या आकड्यांबरोबरच सैन्यदलातील अधिकाऱ्यांमधलं अनियमित रक्तदाबासारख्या हृदयविकारांचं आणि अनेक मानसिक आजारांचं प्रमाणंही धोकादायक पातळीवर पोहचलं आहे. भारतीय सैन्यदलाचा कारभार आणि पारदर्शकतेवर ताशेरे ओढणारा हा अहवाल अचानक गायब करण्यात आल्यानं याची चर्चा सगळीकडे होत आहे.

जीवावर उदार होऊन देशाची रक्षा करणारा सैनिकंच मानसिकरित्या खचलेला असणं हे भारतीय सैन्यदलाच्या कारभारात सर्वकाही आलबेल नसल्याचाच पुरावा आहे‌. काही दिवसांपूर्वीच एका भारतीय सैनिकानं सैन्यदलात मिळत असलेली वाईट वागणूक आणि किमान सोयी-सुविधांची असलेली वाणवा याला वाचा फोडत बनवलेला व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर लागलीच भारतीय लष्करातून त्याचं निलंबनही करण्यात आलं. भारतीय लष्कराच्या गैरकारभाराची बाहेर वाच्यता न होऊ देण्यासाठी सैनिकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दबाव पाडला जात असल्याच्या अनेक घटना याआधीही पाहायला मिळाल्या आहेत.