Opinion

आपला आपला अमृतवर्षानुभव...

एका अर्थानं त्या सामाजिक घटकातील इतिहासाचे ते साक्षीदारच संपलेले आहेत.

Credit : इंडी जर्नल

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या किंवा भारतीय उपखंडाच्या इतिहासातली अविस्मरणीय, मुक्तीदायी आणि तरी एका दूरगामी आणि अविरत प्रवाही जखम देणारं ते १९४७ चं ते वर्ष. सध्या जिवंत असलेल्या लोकांनी त्या काळाबाबत, त्या दशकांबाबत, ब्रिटिश राजवटीबाबत आठवणी सांगताना पाहिलं असेल, त्याच्या बातम्या, कार्यक्रम, भाषणं ऐकली असतील. मात्र गेल्या काही वर्षात हळूहळू हे कमी झालं, कारण साहजिक आहे, तो काळ अनुभवलेले लोक एकामागून एक काळाच्या पडद्यामागे जाऊ लागले आहेत...कारण अर्थातच तो काळ अनुभवलेली माणसं त्यांच्या वयाच्या ९०, ८० किंवा ७० व्या वर्षांमध्ये असणार.

आपल्या पूर्वजांकडून आपला इतिहास हा फक्त कथेच्या स्वरूपात कळत नसतो तर तो आपल्यासाठी धारणा, संकल्पना, दृष्टिकोन आणि स्वभावाचा भाग बनत असतो. आपण कोण आहोत, कुठून आलो, कसे जगलो, कुठे लढलो, कुठे जिंकलो, कुठे हरलो...या सर्व गोष्टींच्या आपल्या सामाजिक दृष्टिकोनावर परिणाम पडत असतो. मात्र एकाच देशात असे घटक असतात, ज्यांच्यासाठी काळ त्याच मापात काम करत नाही. असे अनेक भारतीय नागरिक आज आहेत, ज्यांच्या पूर्वजांच्या या अनुभवाच्या कथा कधीच काळाच्या प्रवाहात विरून गेल्या आहेत. 

 

मात्र एकाच देशात असे घटक असतात, ज्यांच्यासाठी काळ त्याच मापात काम करत नाही.

 

या विधानाला काही संदर्भ आहेत. ते संदर्भ आहेत सरासरी आयुर्मानाचे आणि त्यांच्या जातीनिहाय आणि व्यवसायनिहाय वर्गणीचे. आयुर्मान म्हणजे माणसांच्या आयुष्याची सरासरी लांबी. उदाहरणार्थ अमेरिकेतील सरासरी आयुर्मान आहे ७८.७९ वर्षं, कॅनडाचं ८२.०५ वर्षं. या तुलनेनं भारताचं सरासरी आयुर्मान आहे ६९.६६ वर्षं. म्हणजे थोडक्यात या देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्षी जन्मलेली सरासरी व्यक्तीही हा 'अमृतमहोत्सव' पाहू शकलेली नाही. त्या व्यक्ती गेल्या, त्यांच्यासोबत त्यांच्या कथा आणि त्यांचे अनुभवही गेले. आता स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर दशकाचा काळ पाहिलेले निवडक लोक सापडतील. 

पण मग याहूनही एक चिंतेत टाकणारी आणि त्रासदायक अशी आकडेवारी आहे. ती म्हणजे याच देशातील दलित आणि आदिवासी घटकांच्या सरासरी आयुर्मानाची. उच्चवर्णीय हिंदूंच्या तुलनेनं मुस्लिम १ वर्षानं, दलित ३ वर्षांहून अधिक वर्षांनी आणि आदिवासी ४ हुन अधिक वर्षांनी कमी सरासरी वर्ष जगतात. याचा अर्थ जर उच्चवर्णीय हिंदूंचं सरासरी आयुर्मान ६९ असेल तर मुस्लिमांचं आयुर्मान ६८, दलितांचं ६५-६६, तर आदिवासींचं ६४-६५. ही आकडेवारी आहे इंस्टिट्यूट ऑफ कंपॅशनेट इकॉनॉमिक्स या संस्थेच्या अहवालाची, जो मार्च २०२२ मध्ये प्रकाशित झाला. या अहवालासाठी या संशोधकांनी २०१०-११च्या वार्षिक राष्ट्रीय आरोग्य अहवालाच्या आकडेवारीचा आधार घेत, आसाम, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या ९ राज्यांच्या आकडेवारीचा समावेश या अहवालात करण्यात आला. ही भारताची ४८.५ टक्के लोकसंख्या आहे. 

आता याहीपुढं जात आणखी एक धक्कादायक आकडेवारीची नोंद घेऊया. भारतातील उच्च जातीतील महिला या सरासरी ५४.१ वर्ष जगतात. या तुलनेनं देशातील दलित महिला या सरासरी फक्त ३९.५ वर्षांचं आयुष्य जगतात. म्हणजे त्यांच्या उच्च जातीय मैत्रिणींच्या तुलनेत तब्बल १४.६ वर्ष कमी. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातले हे आकडे आहेत. या अहवालात असं नोंदवलं आहे की उच्च जातीय महिलांप्रमाणेच धोकादायक स्थिती आणि एकंदर सामाजिक परिस्थितीला सामोरं जातानाही दलित स्त्रियांचं सरासरी आयुर्मान प्रचंड तफावत दाखवतं. 

 

 

याहूनही पुढं जात आणखी एक आकडेवारी पाहुयात. या देशाला स्वच्छ भारत बनवणारे सफाई कामगार. एकीकडे राष्ट्रीय आयुर्मान सरासरी ७० वर्षांच्या आसपास असताना या देशातील मैला उचलणारे, कचरा उचलणारे आणि सफाई राखणारे कर्मचारी यांचं सरासरी आयुर्मान आहे फक्त ४० ते ४५ वर्ष. म्हणजे देशातील इतर नागरिकांच्या तुलनेत सरासरी जवळपास २५ वर्षांनी कमी. डालबर्ग या संशोधन संस्थेनं द वायर मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. सफाई कामामुळं या देशातील हे नागरिक त्यांच्या आयुष्याची तब्बल २५ वर्ष कमी जगत आहेत. 

आता एक शेवटची धक्कादायक आकडेवारी. दलित आणि आदिवासी नागरिकांमध्ये ५ वर्षांच्या आतील बालकांच्या मृत्यूचं प्रमाण इतर सर्व नागरी समूहांच्या तुलनेनं तब्बल ७४ टक्क्यांनी जास्त आहे! १९९२ ते २०१६ दरम्यानच्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या आकड्यांमध्ये हे समोर आलं आहे. 

 

कोणतंही राष्ट्र निर्माण होतं तेव्हा त्याची प्रगती आणि त्याचा विकास हा त्याच्या जनमाणसांच्या जगण्यावरूनच काढायला हवा.

 

कोणतंही राष्ट्र निर्माण होतं तेव्हा त्याची प्रगती आणि त्याचा विकास हा त्याच्या जनमाणसांच्या जगण्यावरूनच काढायला हवा. त्यांच्या जगण्याला अर्थ देण्यात, त्यांना सोयीसुविधा देण्यात आणि त्यांचं 'कल्याण' करण्यात देश कशी कामगिरी करतो हेच त्या देशाच्या यशाचं मूल्यांकन आहे. वरच्या आकडेवारीत उच्च जातीय बहुसंख्य आणि अल्पसंख्य व निम्न जातीय समूहांमध्ये असलेली तफावत आपल्याला हे सांगते की देशानं ढोबळ आकड्यांची आर्थिक आणि सार्वत्रिक प्रगती केलेली असली तरी समाजाच्या एका मोठ्या पीडित आणि उपेक्षित घटकापर्यंत आपल्याला सुयोग्य जीवनमान नेता आलेलं नाही. जीवनाचा दर्जा, सोयीसुविधांचा दर्जा, हिंसेला सामोरं जाण्याचं प्रमाण, अन्नधान्याचा दर्जा, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक वागणूक या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे ही आयुर्मानात पडलेली तफावत. 

एकीकडे आपण सुदैवानं आपल्या आज्जी-आजोबांकडून जुन्या काळच्या, या देशाच्या प्रगतीच्या आणि आजवरच्या प्रवासाच्या गोष्टी ऐकत असताना आपण हे विसरता कामा नये की असेल कित्येक आहेत, ज्यांच्या कित्येक पिढ्या त्यांच्या याच कथा कधी सांगायची संधी न मिळताच भूतकाळात विरून गेल्या आहेत. एका अर्थानं त्या सामाजिक घटकातील इतिहासाचे ते साक्षीदारच संपलेले आहेत आणि ते इतर समूहांच्या तुलनेनं जलदगतीनं कालवश झालेले आहेत, त्यामुळं त्यांच्या अमृतमहोत्सवाला काहीशी परात्मता नसेल, तर नवलच.