India

'गायछाप'वर छापा, मालपाणी समूहावर आयकर विभागाची कारवाई

मालपाणी समूह हा महाराष्ट्रातील 'गायछाप जर्दा' या प्रसिद्ध तंबाखू ब्रॅण्डचा प्रमुख विक्रेता आहे.

Credit : Shubham Patil

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार १७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयकर विभागानं पुणे स्थित मालपाणी समूहाच्या महाराष्ट्रातील तब्बल ३४ शाखांवर धाड टाकली. यात सुमारे ३३५ कोटी रुपयांची कुठल्याही प्रकारे उघड न केलेली रक्कम सापडली असून १ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे, असं ANI वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

मालपाणी समूह हा महाराष्ट्रातील 'गायछाप जर्दा' या प्रसिद्ध तंबाखू ब्रॅण्डचा प्रमुख विक्रेता आहे, त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक देखील आहे.

या छाप्यात एक्सेल शीट्स आणि वैयक्तिकरीत्या लिहून ठेवलेल्या माहितीतून २४३ कोटींची नगद विक्रीची रक्कम तसंच बांधकाम व्यवसायातील कुठलाही रेकॉर्ड न ठेवता केलेले नगद स्वरुपातले पैशांचे व्यवहार समोर आले आहेत. ही रक्कम कायदेशीर किमतीपेक्षा जास्त असल्याचं निदर्शनास आललं आहे. या बाबतीत मालपाणी समूहाद्वारे आयकर कायदा १९६१ च्या कलम ५० (क) चं उल्लंघन केल्याचं देखील आढळून आलं आहे. यासंदर्भात इंडी जर्नलनं मालपाणी समूहातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी छापा पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, मात्र समूहाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.