India
सरकारनं ६ जूनपर्यंत भूमिका घेतली नाही तर रायगडावरूनच आंदोलनाला सुरुवात
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची आक्रमक भूमिका
संभाजीराजे यांनी मराठा पत्रकार परिषदेमध्ये आरक्षणावरून आक्रमक भूमिका मांडली. जर राज्य सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी, म्हणजेच ६ जूनला रायगडावरूनच आम्ही आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "कुठल्याही भांडणात मराठा समाजाला पडायचं नाहीये तर आम्हाला फक्त न्याय हवा आहे. समाजाला वेठीस धरणं राज्यकर्त्यांनी बंद करावं आणि समाजाला हव्या असणार्या आरक्षणासाठी प्रयत्न करावेत. सरकारपुढे आपण तीन पर्याय मांडत आहोत आणि त्याचा विचार सरकारनी करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ते पर्याय म्हणजे राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी. त्यामध्ये यश न मिळाल्यास क्युरेटीव्ह याचिका दाखल करावी. तसेच कलम ३४२ नुसार राज्यपालांकडे तक्रार दाखल करावी आणि केंद्राकडून या प्रश्नावर विचार केला जावा."
"ओबीसी मध्ये वेगळा प्रवर्ग मराठा समाजासाठी होऊ शकतो का असा प्रश्न अनेक समाजातील लोकांना पडतोय. अशा प्रश्नांची उत्तरं देणं हे सरकारच काम आहे माझं नाही असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा निर्णयाआधी नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीवर जागा का मिळत नाहीयेत," असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढं म्हणाले, "३० टक्के मराठा समाज सोडता इतर समाज हा गरीब आहे त्यांच्या मागण्यांचा विचार व्हावा आणि आरक्षण मंजुरीसाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा कायदा हातात घ्यायला समाजातील लोक मागेपुढे बघणार नाहीत असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला. माझ्यामुळे हे लोक शांत आहेत."
सारथी योजनेविषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले, "ही योजना मराठा समाजासाठी आरक्षणापेक्षाही उपयुक्त आहे. आणि सरकारने कमीत कमी १००० कोटी रुपये यासाठी मंजूर करावेत. असे आयएएस अधिकारी ज्यांना मराठा समाजातील लोकांशी घेणंदेणं नाहीये असे अधिकारी असण्यापेक्षा समाजातील लोकांकडे त्याची जबाबदारी असायला हवी. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघालाच नाही तर ९ ऑगस्टला दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची गोलमेज परिषद भरवणार आहोत."