India

हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणानंतरची हिंसा: न सांगितलेले दु:ख

रझाकारांनी केलेल्या हिंसेचं वास्तव आपण स्वीकारतो, त्याच प्रमाणे पोलीस अँक्शननंतर झालेल्या हिंसेचं वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे.

Credit : Indie Journal

 

प्रमोद मंदाडे । य. दि. फडके हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहास लिखाणाच्या क्षेत्रातील टाळता न येणारं नाव आहे. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचं दस्तावेजीकरण करणाऱ्या अनेक खंडातील 'विसाव्या शतकातील महाराष्ट्र' हा त्यांचा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्रच्या सहाव्या खंडात १९४८ ते १९६० या काळात झालेल्या अनेक गोष्टींबाबत त्यांनी चर्चा केली आहे. हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणाबाबत (विलीनीकरण हाच शब्द फडक्यांनी देखील वापरला आहे) एक ४० पानाचं प्रकरण सहाव्या खंडात आहे. पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसाचाराचे वर्णन करण्यासाठी त्यांनी अर्ध पान त्यांनी खर्ची घातलं आहे. पद्मजा नायडू, मोहम्मद सलीम यांनी पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसाचाराच्या नेहरूंना केलेत्या तक्रारीबाबात य. दि. फडके उल्लेख करतात. य. दि. फडके यांच्या संदर्भ साधने पहिली असता हे स्पष्ट होते की, त्यांनी नेहरू आणि सरदार पटेल यांचा पत्रव्यहार काळजीपूर्वक वाचला आहे, तरीदेखील ते खालील प्रकारे पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसेचे वर्णन करताना म्हणतात,

"पोलीस कारवाईनंतर एक महिनाभर हैदराबाद राज्याच्या काही भागात अशांतता होती. रझाकारांनी आधी ज्यांचा छळ केला होता किंवा ज्यांच्या कुटुंबीयांवर अत्याचार केले होते त्यांनी जुने हिशेब चुकते करण्यास सुरवात केली होती. जुन्या राजवटीशी एकनिष्ठ असलेल्यांना संशयावरुन अगर त्यांच्या दुष्कृत्यांचा पुरावा मिळाल्यामुळे पकडून तुरुंगात डांबण्यात येत होते (पृष्ठ १५४)".

पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसेला तर्कसंगत ठरवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आपल्याला आढळून येईल. याबाबत थोडंसं विस्ताराने मी नंतर लिहणार आहे. पण पद्मजा नायडू, मोहम्मद सलीम यांचा नेहरुंशी झालेला पत्रव्यहार ज्याने पाहिलेला असतो, त्याला सुंदरलाल अहवाला बाबत माहिती असते. कारण त्यांच्या प्रयत्नांमुळेच नेहरूंनी, पंडित सुंदरलाल आणि अन्य सदस्यांना पोलीस ॲक्शननंतरच्या सत्य परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी हैदराबादला पाठवले होते. नेहरू आणि पटेलांच्या पत्रव्यहारामध्ये  पंडित सुंदरलाल यांच्या अहवालाचे अनेक संदर्भ येतात.  

पद्मजा नायडू पोलीस ॲक्शनच्या काळात हैद्राबादमध्ये होत्या. या काळात त्यांनी लिहलेली पत्रे कोणत्याही विवेकशील आणि संवेदनशील व्यक्तीला प्रचंड अस्वस्थ करणारी आहेत. फडके या पत्रांचा उल्लेख करतात, पण त्यातील हिंसेबाबात असणार्‍या संदर्भांविषयी पूर्णपणे मौन बाळगतात. मराठी चर्चाविश्वात पोलीस ॲक्शननंतरच्या हिंसेबाबत संशोधनाची साधने सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे य. दि. फडके यांना आपण संशयाचा फायदा देऊ शकतो. पण इंग्रजीमध्ये पोलीस ॲक्शननंतरच्या हिंसेबाबत अनेक साधने या काळात  सहज मिळत होती. उमर खालिदी यांचे  'Hyderabad after the fall' हे पुस्तक असेल किंवा फरीद मिर्झा यांचे 'Pre and post police action days in the erstwhile Hyderabad State: what I saw, felt, and did' हे पुस्तके सहजपणे उपलब्ध होती. याच काळात ए.जी नूरानी यांनी फ्रंटलाईन या प्रसिद्ध मासिकात पोलीस ॲक्शननंतरच्या हिंसेबाबत अनेक लेख लिहलेली अढळतात. उदा. ३ मार्च २००१ च्या फ्रंटलाईन अंकात नूरानी सुंदरलाल रिपोर्ट बाबत विस्ताराने लिहतात.  नूरानीच्या लेखावर बरीच चर्चा झालेली आपल्याला आढळते आणि ती य. दि. फडकेंनी पहिली नसेल असे म्हणणे थोडे धाडसाचेच आहे.

 

 

'विसाव्या शतकातील महाराष्ट्र' या मालेतील सहावा खंड ज्यात हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणाबाबत लिहले आहे तो २००७ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. य.दि. फडके इंग्रजी भाषेतील साधनांचा वापर करतात, पण हैदराबाद विलीनीकरणाबाबत या साधनांकडे त्यांनी का दुर्लक्ष्य केले हे एक कोडेच आहे. त्यामुळे य. दि. फडके यांना आपण साधनांच्या अनुपलब्धतेच्या संशयाचा फायदा देऊ शकत नाही. य. दि. फडके यांच्यावर टिका करण्याचा माझा हेतू नाही. पण फडके हे अत्यंत जबाबदार इतिहासकार आहेत आणि लिखाणातील या हिंसेबाबतच्या मौनाला प्रचंड अर्थ आहे.

'कर्मयोगी संन्यासी' हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबाबत नरेंद्र चपळगावकरानीं अस्सल संशोधनच्या साधनांचा वापर करत लिहलेलं महत्वाचं पुस्तक आहे.

या स्वामीजींच्या चरित्रात नरेंद्र चपळगावकर पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसाबाबतचा तसेच पंडित सुंदरलाल यांचा उल्लेख करतात.  नरेंद्र चपळगावकरनीदेखील फरीद मिर्झा, उमर खालिदी याच्या पुस्तकांचे तसेच पद्मजा नायडू, मोहम्मद सलीम यांचे पत्रे, नेहरू पटेल यांचे पत्रव्यहार हा त्यांनी नजरेखालून घातला आहे. पण नरेंद्र चपळगावकर चातुर्याने हिंसेबाबतच्या कोणत्याच घटनेचा व आकड्याचा उल्लेख करत नाहीत फक्त ते लिहतात की "काहीशा विपर्यस्त तक्रारी दिल्लीला करण्यात आल्या." तसेच या 'विपर्यस्त तक्रारी' कोणत्या होत्या आणि त्या चुकीच्या कश्या होत्या यावर ते एक शब्दही लिहीत नाहीत. मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी लिहलेल्या आत्मचरित्रात किंवा इतिहासामध्ये तसेच अन्य इतिहासकारांनी लिहलेल्या पुस्तकात पोलीस ॲक्शननंतरच्या हिंसेचे कोणतेच उल्लेख मिळत नाहीत.

 

सुंदरलाल समितीच्या अंदाजानुसार हैदराबाद राज्यात पोलीस ॲक्शननंतर २७,००० ते ४०,००० हजार मुस्लिम  मारले गेले असावेत.

 

सुंदरलाल समितीच्या अंदाजानुसार हैदराबाद राज्यात पोलीस ॲक्शननंतर २७,००० ते ४०,००० हजार मुस्लिम  मारले गेले असावेत. सुंदरलाल समितीने हा आकडा सांगण्याअगोदर 'conservative estimate' या शब्दांचा वापर केला आहे. म्हणजेच कमीत कमी झालेली हानी/नुकसान लक्षात घेऊन ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत आणि हा हिंसाचार मुख्यतः मराठवाडा आणि हैदराबाद-कर्नाटकात झाला आहे. आपण येथे कोणत्या हिंदू-मुस्लिम तणावाबाबत किंवा लहानसहान दंगलीबाबत बोलत नसून एका हत्या कांडाबाबत बोलत आहोत. त्यामुळे यावर समाजाने धारण केलेल्या मौनाला प्रचंड अर्थ आहे. आणि त्यांचे  गांभीर्य आपण लक्षात घेतले पाहिजे.  सुंदरलाल समितीने आपला अहवाल अत्यंत गांभीर्याने लिहला आहे. या अहवालात 'आम्ही जे आमच्या डोळ्यांनी पहिले आहे', 'पूर्ण जबाबदारीने विधान करत आहोत', 'आमचे कर्तव्य म्हणून नाकारता न येणारे पुरावे आहेत', 'कोणतीही अतिशयोक्ती न करता' यासारखी वाक्यं अनेकदा आढळतात. त्यांनी गोळा केलेले पुरावे सरकारला सादर करण्याची त्यांची तयारी आहे असं ते वारंवार सांगतात. या त्यांच्या कृती अहवालाला अधिक विश्वासाहार्य बनवतात.  

पोलीस ॲक्शननंतर झालेली हिंसा ही मराठवाड्याच्या इतिहासाचा भाग आहे आणि त्याबाबत कोणतीच साधनं उपलब्ध नसणे वा त्यावर सार्वजनीक शांतात बाळगणे या आपल्या सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक गोष्टी आहेत. कारण पोलीस ॲक्शननंतर झालेली हिंसा ही काल्पनिक घटना नसून ती सत्य घटना आहे. तिच्या तीव्रतेबद्दल मतभेद असू शकतात पण ती घटनाच नाकारणे चुकीचे आहे. पॉल कॉनर्टन नावाचे एक महत्त्वाचे  विचारवंत आहेत. How societies remember ( समाज कसे लक्षात ठेवतो) या नावाचे त्यांचे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात "वर्तमानाचा आपला अनुभव बऱ्याच अंशी आपल्या भूतकाळातील ज्ञानावर अवलंबून असतो" आणि आपण हा आपला भूतकाळच नाकारतो आहोत. मराठवाड्यात पोलीस ॲक्शननंतर झालेली हिंसा ही एक भळभळती जखम आहे आणि त्यानंतर झालेले बदल हे मूलगामी होते. त्यामुळे या हिंसेचे आणि त्यानंतर तिच्या परिणामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी पोलीस ॲक्शनची घटना समजून घेणे गरजेचे आहे.

गांधी हत्या आणि त्यानंतर झालेली दंगल ही पोलीस ॲक्शनच्या समकालीन घडलेली महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाची घटना आहे. गांधीजींच्या खुनानंतर ब्राह्मणांविरोधात झालेल्या दंगली आणि पोलीस ॲक्शननंतर झालेली हिंसा या दोन्ही दुर्दैवी घटना आहेत, त्या दोन्ही संस्थानांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या दोन्ही घटनांची तूलना करणे चुकीचे आहे पण पोलीस ॲक्शननंतर उसळलेल्या हिंसेची दाहकता लक्ष्यात यावी म्हणून ही तुलना मी करतोय. कोल्हापूर संस्थानात झालेल्या दंगलीबाबत चौकशी करण्यासाठी न्या. कोयाजी यांची नेमणूक झाली होती.  न्या. कोयाजी त्याच्या अहवालात लिहतात कि ३१ जानेवारी रोजी कोल्हापूर शहरात १२५ जाळपोळीच्या घटना घडल्या पण कोणावरही शाररिक हल्ला झाला नाही. विसाव्या शतकातील महाराष्ट्र या  य. दि. फडकेच्या पुस्तकात  देखील 'गांधीजींचा खून आणि महाराष्ट्रातील जाळपोळ' या नावाचं ५५ पानाचं एक प्रकरण. हे प्रकरण जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर आपल्या लक्ष्यात येईल कि य. दि. फडके यांच्या मतानुसार सातारा जिल्हात १४ आणि तेरदाळ या ठिकाणी ६ ब्राह्मणांची हत्या झाली आणि जाळपोळीच्या मोठ्या प्रमाणात घटना वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या त्याचे फडके विस्ताराने वर्णन करतात.  

गो. पू देशपांडे त्यांच्या स्वतंत्र्यानंतरचे मराठी साहित्य (Marathi Literature since Independence) या EPW मधील लेखात लिहतात की, मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या दृष्टीने विचार करता गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीचा क्षण हा आमूलाग्र बदलाचा काळ आहे. गांधीजींच्या खुनानंतर उसळलेल्या दंगलीने महाराष्ट्राचे समाजजीवन प्रचंड प्रमाणात प्रभावीत झाले हे गो. पु. देशपांडे सांगतात. आता मराठवाड्याकडे जरा वळूयात. पोलीस ॲक्शननंतर २७,००० ते ४०,००० हजार मुस्लिम  मारले गेले असतील तर त्याचा एकूणच मराठवाड्याच्या समाजजीवनावर काय परिणाम घडला असेल याची आपण कल्पना करू शकतो. पोलीस ॲक्शननंतरच्या हिंसेकडे डोळेझाकपणा करत आपण आपण त्या प्रचंड हिंसेच्या सामाजिक परिणामांना भिडायचे नाकारतो आहोत.

 

 

रझाकारांकडून झालेल्या अत्याचाराबाबत

मराठवाडा मुक्ती संग्रामावर मोठ्या प्रमाणात पुस्तके आहेत. यातल्या प्रत्येक पुस्तकात रझाकाराकडून झालेल्या हिंसेची,अत्याचारांची वर्णने आहेत. त्यामुळे त्यावर परत लिहणे गरजेचे वाटले नाही. जसे रझाकारांनी केलेल्या हिंसेचं वास्तव आपण स्वीकारतो, त्याच प्रमाणे पोलीस अँक्शननंतर झालेल्या हिंसेचं वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. रझाकारांच्या हिंसेमुळे पोलीस ॲक्शननंतर हिंसा झाली असे अनेकजण बोलतात. पण कोणत्याही सभ्य समाजात सूडाच्या भावनेला स्थान नसतं.  रझाकारांच्या काळात न्याय मिळत नव्हता हे आपण मान्य केलं तरी पोलीस ॲक्शननंतर भारत सरकारचं राज्य आलं. त्यामुळे झालेल्या अन्यायाची दाद मिळू शकली असती त्यामुळे मुस्लिमांवरच्या हिंसेचं समर्थन होउ शकत नाही. जर निझामाविरोधकांचा  दावा असेल रझाकार अन्यायी होते तर तुम्हीही त्याच्यासारखेच असू शकत नाही. आमचा या पुस्तकातून आग्रह आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात मराठवाडयात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबाद चर्चा झाली पाहिजे. या घटनेचे समाजातील वेगवेगळ्या घटकावर काय परिणाम झाले आहेत हे आपण समजून घेतले पाहिजेत. इतक्या मोठया प्रमाणात झालेल्या हिंसेच्या घटनेबाबत शांतता बाळगणे हे एक सभ्य समाजाला शोभून दिसत नाही. जसे आपण चांगल्या गोष्टीचा गौरव करतो तसेच चुकीच्या गोष्टीचा निषेध व्यक्त करता आला पाहिजे. पोलीस अँक्शननंतरच्या हिंसेबाबतची शांतता समाजस्वाथ्याला धोकादायक आहे. या पुस्तकात पोलीस ॲक्शननंतरच्या हिंसेचं स्वरूप काय होतं हे मांडत आहोत.

 

 

या पुस्तकाच्या आम्ही प्रथमच  पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसाचाराबाबतचे तीन दस्तावेज मराठीत उपलब्ध करून देत आहोत. सुंदरलाल समितीच्या अहवालाचा सारांश आणि त्यासोबत जोडलेलं एक गोपनीय टिपण जे राष्ट्रीय अभिलेखागारात (National Archives) उपलब्ध आहे. या दोन दस्तावेजांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद केला आहे. पोलीस ॲक्शननंतर झालेल्या पुनर्वसनाच्या प्रयत्नात अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवणारे मोहम्मद अली खान यांच्या ‘भारतीय स्वातंत्र्याची देणगी’ (आझादी ए हिंद का तोहफा) या आत्मकथनात्मक पुस्तिकेचे उर्दूतून मराठीत भाषांतर करून त्याचा या पुस्तिकेत समावेश केला आहे.

हैदराबाद संस्थानचे विलीनीकरण ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती आणि हा गुंता नीटपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसाचाराला वगळून या गुंत्याची सोडवणूक करणे कठीण आहे. कारण ती या घटनेचा गाभा आहे. मराठवाड्यातील वेगवेगळ्या समुदायाचे एकमेकांशी असलेले राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सहसंबंध यांच्यावर पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसेचा मोठा प्रभाव आहे. या गुंतागुंतीच्या इतिहासाकडे एकांगी नजरेने आणि पूर्वग्रहीत दृष्टिकोनातून पाहिले गेले आहे. पोलीस ॲक्शननंतर झालेल्या हिंसेवर मराठीत एक फ.म. शहाजिंदेंचा आत्मकथनात्मक लेख वगळता यावर मराठीत काहीही साधने उपलब्ध नाहीत. हे मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करणार्‍यांसाठी तसेच तो डोळसपणे समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे ठरेल, असा आमचा विश्वास आहे. सामाजिक चुकांची आठवण ही एक मूल्यावर आधारित समाज घडवण्याची पहिली पायरी असते. आणि हा प्रयत्न त्या सजग दृष्टीकोनातून केलेला आहे. आशा आहे की या प्रयत्नाचे तुम्ही स्वागत कराल.