Quick Reads

दानिश सिद्दिकी आणि एम्बेडेड पत्रकारितेचा इतिहास

अफगाण सैन्यासोबत 'एम्बेडेड' असलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा १६ जुलै रोजी मृत्यू झाला.

Credit : Shubham Patil

सौरभ झुंजार, विशाल दाभाडे: फोटोजर्नलीस्ट दानिश सिद्दिकी यांचा मृत्य झाल्याचं आपण माध्यमांवर पाहिलं आणि वाचलं. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेबरोबर ते फोटोजर्नलीस्ट म्हणून काम करत होते. अफगाणिस्तानमध्ये सैन्याच्या एका तुकडीबरोबर काम करत असताना तालीबानींनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. याच निमित्तानं ‘एम्बेडेड पत्रकारिता’ ही संज्ञा सर्वांसमोर आली. अफगाणिस्तान सैन्यासोबत 'एम्बेडेड' असणं म्हणजे काय हे माहित नसल्यामुळं त्याविषयी कट्टरवाद्यांकडून इंटरनेट आणि उपलब्ध माध्यमातून ट्रोलिंगही सुरु झालं.

 

एम्बेडेड पत्रकारिता म्हणजे काय?

पहिल्यांदा जाणून घेऊयात एम्बेडेड पत्रकारितेबद्दल. एम्बेडेड पत्रकारिता म्हणजे, सशस्त्र संघर्षाच्या वेळी पत्रकारांना सैन्याच्या बाजूनं, सैन्याच्या नियंत्रणाखाली ठेऊन, त्यांना योग्य ते संरक्षण आणि प्रशिक्षण देऊन सोबत ठेवलं जातं. एम्बेड केलेले पत्रकार किंवा छायाचित्रकार (Photojournalist) एका विशिष्ट लष्करी युनिटशी संलग्न असतात. बऱ्याचदा लढाऊ क्षेत्रामध्येही सैन्यासह त्यांना पत्रकारितेची परवानगी असते. त्यांची निवड अधिकृतरित्या सैन्यदलाकडून केली जाते. यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते. त्यानुसार त्यांना ठरावीक कालावधीत बूट कॅम्प, शारीरिक योग्यता चाचणी, मूलभूत प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत पत्रकारिता कशी करावी यासंबंधी सर्व माहिती दिली जाते. जगात सर्वप्रथम ही पद्धत अमेरिकेच्याच्या संरक्षण विभागानं इराक युद्धाच्या (२००३–११) दरम्यान सुरू केली.

पर्शियन गल्फ वॉर (१९९०-९१) आणि अफगाणिस्तान (२००१) सोबतच्या सुरुवातीस युद्धाच्या वेळेस मुक्त पत्रकारांना पत्रकारितेसाठी कमी प्रमाणात संधी दिल्याबद्दल अमेरिका संरक्षण विभागावर प्रचंड टीका झाली. त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून एम्बेडड पत्रकारिता सुरू केली गेली. २००३ च्या सुरुवातीस, जेव्हा अमेरिका आणि इराक यांच्यात युद्ध जवळपास घडत आहे हे स्पष्ट होत गेलं, तेव्हा संरक्षण विभागानं पत्रकारांना बूट कॅम्प-शैलीचं प्रशिक्षण देऊन आणि अनेक नियमांचं काटेकोरपणे पालन करणार या सक्तीच्या अटीवर अमेरिकन सैन्यात जाण्याची संधी दिली. इराकच्या हल्ल्यादरम्यान, अंदाजे ६०० एम्बेडेड पत्रकारांना अमेरिकन सैन्यात सामील होण्याची परवानगी दिली होती.

 

एम्बेडेड पत्रकारितेचा फायदा काय असतो?

अनेकदा युद्धजन्य परिस्थितीत मुक्त पत्रकारांवर हल्ला होण्याची दाट शक्यता असते, परंतु एम्बेडड पत्रकार म्हणून काम करत असणाऱ्या पत्रकारांना मात्र सैन्याकडून संरक्षण मिळतं. असं असलं तरी शत्रूकडून जिवित्वाचा धोका एम्बेडेड पत्रकार म्हणून असतोच. युद्धजन्य परिस्थिती पत्रकारांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. २००७ मध्ये इराक युध्दाच्या वेळी दोन मुक्त पत्रकारांना अमेरिकेकडून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. दानिश सिद्दीकी हेदेखील अफगाणिस्तान सैन्याबरोबर एम्बेडेड पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांना मृत्युला सामोरे जावे लागले.

दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी जाणूनबुजून काही कट्टरवादी आणि हिदुत्ववादी संघटना तसेच लोकांकडून त्यांना ट्रोल करण्याचं काम सोशल मिडीयावरून चालू आहे. एम्बेडेड पत्रकारितेबद्दल ज्ञात नसणाऱ्या अनेकांनी दानिश यांना अफगाणिस्तानमध्ये जाऊन काम करण्याबद्दल ट्रोल केलं. गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा वापर भारतामध्ये वाढलेला असून, अशा काही फोल टीकाकारांसाठी हे हक्काचं माध्यम बनलेलं आहे. या सर्व मत मांडू पाहणाऱ्या लोकांमध्ये उजव्या विचारसरणीचा प्रचंड पगडा जाणवतो.

सिद्दिकी यांच्या मृत्युनंतर झालेलं ट्रोलींग हे मुख्यतः हिंदी आणि इंग्लीश भाषेत आहे. एका व्यक्तीनं दानिश यांच्याबद्दल असणाऱ्या एका पोस्टवरती कमेंट करताना असं लिहिलंय की, ‘तरीही तो हिंदू राष्ट्रात जिथे उजव्या विचारसरणीचं सरकार आहे तिथे सुरक्षित आणि समाधानी होता जोवर त्याने मुस्लीम राष्ट्रात जाऊन सनातनी इस्लामवादी लोकांशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला नव्हता.’ यातल्या काही अमानवी प्रवृत्तीच्या लोकांनी थेट त्यांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली. स्वरा भास्कर हिने अशा टीकाकारांना उद्देशून तिच्या ट्वीटर पोस्ट मध्ये असं लिहिलंय की, ‘दानिश यांच्या मृत्यूच्या उत्सवामध्ये, त्यांच्या मृत्युमुखी शरीराची चित्रे प्रसिद्ध करणाऱ्या ह्या द्वेषपूर्ण कीटकांमुळे आपल्या समाजव्यवस्थेला लागलेली कीड किती खोलवर गेलीये हे समजतं. यावरून खरी पत्रकारिता तुम्हाला किती त्रास देते हे कळतं. खरा बहाद्दूर हा असा असतो. रेस्ट इन पॉवर.’ 

आता या ट्रोलींग करण्यामागचं मूळ कारण म्हणजे काहीच दिवसांपूर्वी भारतामधील दुसऱ्या लाटेची भयावह परिस्थिती दर्शवणारी काही छायाचित्रे सिद्दिकी यांनी काढली होती. त्या छायाचित्रांची दखल घेऊन अवघ्या जगभरातून मोदी सरकार आणि त्यांच्या आरोग्यव्यवस्थेवर टीका झाली. कट्टरवादी नेटकऱ्यांच्या भावना मात्र यातून दुखावल्या गेल्या आणि त्यांच्यावर असे आरोप केले की, अशी छायाचित्रं काढून देशाची बदनामी करण्याचं काम ते करतायेत.

 

भारतीय पत्रकार आणि युद्ध पत्रकारिता

एम्बेडेड पत्रकारिता ही संज्ञा जरी २००३मध्ये निर्माण झाली, तरी भारतात त्या आधी कित्येक दशकांपासून युद्ध पत्रकारिता अस्तित्वात होती. दानिश सिद्दिकी यांच्याप्रमाणेच नजमुल हसन आणि प्रिया रामरखा या भारतीय पत्रकारांना यापूर्वी युद्धाच्या बातम्या कव्हर करत असताना जीव गमवावा लागला आहे. भारतीय वंशाचे केनियन पत्रकार रामरखा यांचा १९६८ साली आफ्रिकेमध्ये नायजेरियन सैन्य आणि बायफ्रान बंडखोर यांच्यात झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ३३ वर्षाचे असतानाच त्यांना अशाप्रकारे मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. तेदेखील फोटोजर्नलीस्ट म्हणून काम करत होते. त्यानंतर नजमुल हसन यांचा इराण-इराक युद्धादरम्यान १९८३ साली मृत्यू झाला. काही इराणी अधिकाऱ्यांसोबतच लँडमाईन म्हणजेच जमिनीत पुरून ठेवलेलाल्या सुरुंगाच्या स्फोटामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर १९८७च्या श्रीलंकेतील संघर्षाच्या वेळीही कोलकाताच्या टेलेग्राफचे सुमीर लाल, पत्रकार अनिता प्रताप आणि छायाचित्रकार श्याम टेकवानी यांनी संघर्षाच्या स्थानी जाऊन रिपोर्टींग केलं. १९९९ मध्ये झालेलं कारगिल युद्ध हे भारतातलं पाहिलं टीव्हीवर प्रसारित झालेलं युद्ध होतं. यावेळी बरखा दत्त, हरिंदर बवेजा, श्रीन्जॉय चोधरीसारख्या अनेक पत्रकारांनी युद्धाचं लाईव्ह रिपोर्टींग केलं.