India
H3N2 साथीवर सरकारचं लक्ष; निश्चित लस किंवा उपचार नसल्यानं चिंता
गेल्या अनेक आठवड्यांपासून देशभरात सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे.
कर्नाटक आणि हरियाणामध्ये H3N2 या विषाणुमुळं आलेल्या साथीच्या आजारानं मृत्यू झाल्यानंतर भारत सरकारनं शुक्रवारी या विषाणूचं रियल-टाइम निरीक्षण करत असल्याचं जाहीर केलं. गेल्या अनेक आठवड्यांपासून देशभरात सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. ही साथ H3N2 या इन्फ्लुएंझा विषाणूच्या एका संक्रमित रुपामुळं होत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र लोकांनी यामुळं घाबरून न जाता योग्य ती काळजी घेत राहणं गरजेचं असल्याचं वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे.
“H3N2 विषाणू काही आपल्यासाठी कोव्हीडप्रमाणे नवीन नाही. १९६८ साली जगभरात या आजाराची साथ आली होती. एव्हीयन फ्लूच्या एका जनुकापासून १९५७ मध्ये हा प्रकार निर्माण झाल्याचं म्हटलं जातं,” इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएचे डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले.
या आजारात नेहमीच्या फ्लूप्रमाणे साधारण ५ ते ७ दिवस सर्दी, खोकल्यासहीत ताप येताना दिसतो.
“मात्र हा विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती, लहान मुलं, वयस्कर, यांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. तसंच या तापाचं रूपांतर न्यूमोनियामध्ये होण्याची शक्यताही जास्त असते,” डॉ. भोंडवे सांगतात.
Fever cases on rise - Avoid Antibiotics pic.twitter.com/WYvXX70iho
— Indian Medical Association (@IMAIndiaOrg) March 3, 2023
भारतात जानेवारी ते मार्च दरम्यान दरवर्षीच सर्दी-तापाची साथ पसरते. मात्र यावेळी इन्फ्लुएंझाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यानं सरकारनं या साथीचं निरीक्षण करण्याचं ठरवलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यावर एक आढावा बैठक घेतली. सरकारजवळील आकडेवारीनुसार जवळपास १० टक्के रुग्णांना प्राणवायूची गरज भासल्याचं समजतं.
“हा आजार स्वाईन फ्लूसारखाच आहे. मात्र यावर निश्चित उपचार किंवा लस नसल्यानं त्याची लक्षणं स्वाईन फ्लूपेक्षा जास्त गंभीर होण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूवर उपचारासाठी वापरलं जाणारं टॅमीफ्लू हे औषध H3N2 वर लागू होत नाही. त्यामुळं ताप आल्यास शक्यतो अंगावर न काढता लवकरात लवकर डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे,” भोंडवे पुढं सांगतात.
केंद्र सरकारनं या आजाराशी दोन हात करताना कोव्हीड काळातील काही प्रोटोकॉल वापरण्याचा सल्ला दल आहे, कारण या सूचना कोणत्याही फ्लूसारख्या आजाराविरुद्ध उपयोगी ठरतात. यानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं, नियमितपणे हात धुणं, ना धुता हात चेहऱ्याला न लावणं, अशा सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत.
“डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेत रुग्णांनी घरी अराम केला पाहिजे. आजारी असताना बाहेर पडल्यानं लक्षणांची तीव्रता वाढू शकते, तसंच इतरांनाही संसर्ग होऊ शकतो,” भोंडवे म्हणाले.
सरकारनं जारी केलेल्या प्रोटोकॉलमध्ये उपचारांसाठी डॉक्टरना न विचारता पॅरासिटामोल सोडून कोणतंही अँटिबायोटिक घेण्यात येऊ नये असं सांगितलं आहे. आयएमएनं काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या पत्रकातही त्यांनी रुग्णांना प्रतिजैविकं (अँटिबायोटिक) वापरणं टाळण्याचे निर्देश दिले होते, कारण यामुळं विषाणू औषधांना प्रतिसाद देणं कमी होऊ शकतं.
केंद्राच्या आकडेवारीनुसार मार्चच्या पहिल्या ९ दिवसांत साथीच्या तापाचे देशभरात १,३३,४१२ रुग्ण नोंदवले गेले आहेत.