India

इंजिनियरिंग, एमपीएससी, कॉमर्स...पदवीधर तरुणांची स्वप्नं कोव्हीडनं मोडली

कोरोना काळात पदवीधर झालेल्या तरुणाईमध्ये भविष्याबद्दल निराशा दिसून येत आहे.

Credit : इंडी जर्नल

 

राहुल शेळके: गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाच्या महासाथीनं थैमान घातलं आहे. जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या आहेत, अनेक क्षेत्रांतील उद्योग-व्यवसायांवर याचा थेट परिणाम झालेला दिसून येत आहे. भारताची परिस्थितीही या पेक्षा वेगळी नाही. यातच महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षित तरुणांची पिढी ही बेरोजगारी सोबतच नैराश्याचा सामना करत आहे. कोरोनामुळे उद्योग व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कोरोना काळात पदवीधर झालेल्या तरुणाईमध्ये भविष्याबद्दल निराशा दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी पदवीधर असूनही नोकरीच्या शोधात आहेत. पण उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे नोकरी मिळणं कठीण झालं आहे.

नुकताच सिव्हिल इंजिनिअर झालेला २३ वर्षीय शुभम सध्या नोकरीच्या शोधात आहे. पण उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्याला नोकरी मिळणं कठीण झालं आहे. टाळेबंदीमुळे त्याच्या वडिलांच्या रोजगारावर गदा आली.  शुभम म्हणाला, “खूप मेहनतीनं मी सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण पुर्ण केलं. पण कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद आहेत, आणि अगोदरच कामावर असणाऱ्या कामगारांना नोकरी वरून कमी केलं आहे. व्यवसाय करायचा विचार करत आहे पण व्यवसाय करण्यासाठी भांडवल देखील नाही.”

 

"खूप मेहनतीनं मी सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण पुर्ण केलं. पण कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद आहेत"

 

सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार रोजगाराबाबतची देशातील स्थिती आणखी काही महिने आव्हानात्मक राहण्याची भीती ‘सीएमआयई’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात देशाच्या शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.७८ टक्के तर ग्रामीण भागात तो ७.१३ टक्के  राहिला आहे. महाराष्ट्रातील बेरोजगारीचं प्रमाण ४.५% आहे असं दिसून आलं आहे, आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि टाळेबंदीमुळे आणखीन जास्त बेरोजगारीत वाढ होईल असे निष्कर्श या आकडेवारी वरून दिसत आहेत.

२२ वर्षांचा प्रतिक, गेले तीन वर्षं पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. त्यासोबतच त्यानं बीएससी पदवीचं शिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे. कोरोना संकटामुळे तो परत गावी गेला आहे. पण गावाकडेही काही कामधंदा नाहीये. “टाळेबंदीमुळे आणि कोरोना संकटामुळे घरून पैसे येणं बंद झालं. त्यामुळे पुण्यात राहून अभ्यास करणं, तसंच घराचं भाडं, खानावळीचे पैसे, वाचनालयाचं भाडं देणं शक्य नव्हतं. त्यात परत परीक्षेच्या तारखांचा गोंधळ वाढत होता. म्हणून परत गावी येऊन शेती करू लागलो.”

शेतात काम करत असलेल्या वैष्णवी आणि सीमा यांच्याशी संवाद साधला असता कळलं की या दोघी कला शाखेच्या पदवीधर आहेत. वैष्णवी बोलताना म्हणाली, "कोरोनामुळे वडील ज्या हॉटेलमध्ये काम करत होते त्या हॉटेल मालकानं त्यांना कामावरून कमी केलं आहे. त्यामुळे दुसरा उत्पनाचा मार्ग नसल्यामुळे आम्हाला शेतात काम करावं लागत आहे."

सीमाचे वडील रिक्षाचालक आहेत. कोरोना आणि टाळेबंदीमुळे वाहन आणि दळणवण व्यवसायावर याचे प्रतिकूल परिणाम झालेले दिसून येत आहेत. सीमा म्हणाली, "गेल्या वर्षभरापासून वडिलांचं काम बंद आहे. त्यामुळे अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पदवीधर असूनही नोकरी मिळत नाही म्हणून घरा जवळ असलेल्या शेतात काम मिळालं म्हणुन आम्ही इथं काम करत आहोत."

या दोन्ही मुली पदवीधर असूनही त्यांना नोकरी न मिळाल्याने त्यांच्यावर शेतात काम करण्याची वेळ आली आहे. त्या दोघींनाही पुढे शिकायची इच्छा आहे, पण कोरोनामुळे त्यांचं शिक्षण बंद झालाय. महारष्ट्रातील असे अनेक नवीन पदवीधर आहेत ज्यांना नौकऱ्या मिळत नाही म्हणुन त्यांना मिळेल ते काम करावे लागत आहे. अशा परिस्थिती काही विद्यार्थ्यांना पुढे शिकण्याची इच्छा असुन देखील ते परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत.

 

"अनेक ठिकाणी अर्ज केले पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. कारण कामगार कपातीमुळे नवीन मुलांना कामावर घेतलं जात नाही."

 

२१ वर्षांचा रोहित नुकताच बीकॉम पदवीधर झालेला आहे. अनेक वेबसाईटवर शोधूनही त्याला नोकरी मिळाली नाही. "अनेक ठिकाणी अर्ज केले पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. कारण कामगार कपातीमुळे नवीन मुलांना कामावर घेतलं जात नाही. पहिल्या लाटेनंतर जेव्हा टाळेबंदी उठली, त्यानंतर त्यांनी कपड्यांचा नवीन व्यवसाय करण्यास सुरुवात केली. परंतु नंतर दुसऱ्या लाटेमुळे परत टाळेबंदी लागली आणि दुकान बंद झालं. पण दुकानाचं भाडं मात्र चालु होतं. काही दिवसांपूर्वी दुकान खाली केलं असलं तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. घरातील लोकांचे रोजगार गेल्यामुळे मोठी आर्थिक हानी झालेली आहे," रोहित म्हणाला. 

रोहितच्या पालकांशी संवाद केला असता ते म्हणाले की, “कोरोनामुळे घरातील लोकांचे रोजगार गेले आहेत. तरीही थोडंफार भांडवल गोळा करून नवीन व्यवसाय सुरू केला. पण टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे आर्थिक नुकसान झालं आहे. कामधंदे नाहीत, नोकऱ्या नाहीत आणि त्यात महागाई वाढत आहे त्यामुळे जगणं अवघड झालं आहे.”

मॅकॅनिकल इंजिनीअर विशालला (२६) टाळेबंदीमुळे रोजगार गमवावा लागला. "टाळेबंदी झाल्या नंतर कंपनीने कोणतंही कारण न सांगता कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यात माझ्यासोबतच अनेक सहकाऱ्यांचा रोजगार गेला. कंपनीनं परत कधी कामावर घेणार हेही सांगितलं नाही. सध्या गावाकडे आई वडिलांना पैसे पाठवावे लागत असल्यामुळे मिळेल ते काम करावं लागतंय. सरकारनेही आर्थिक मदत केलेली नाही."