Quick Reads

कोव्हीडनं शिकवलं हात धुण्याचं महत्त्व

१५ ऑक्टोबर दरवर्षी ग्लोबल हॅन्ड वॉशिंग डे म्हणून साजरा केला जातो.

Credit : Shubham Patil

समीक्षा सावंत । दोन वर्षांपूर्वी कोरोनानं जगभर हाहाकार माजविला होता. कोरोनाच्या काळात प्रामुख्यानं गरम पाण्यानं हात धुणं असा साधा उपाय तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सुचवण्यात आला कारण सॅनिटायझर, हँडवॉश याच्या वापराला एक सहजसोपा पर्याय म्हणून कोरोना काळात याची अंमलबजावणीही काटेकोरप्रमाणे होताना दिसली. अलिकडच्या काही महिन्यांत कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झाल्याने लोकांमधील 'हात धुणं' या गोष्टीची सवय कमी झाल्याचं दिसुन येत आहे. मात्र हात धुण्याचं महत्त्व हे कोव्हीडच्याही पलीकडे आहे, असं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगतात.

एकुण आजच्या बदलत्या जीवनशैलीतील प्रवाहात या सर्व गोष्टींबरोबरच आजकाल सभोवती अनेक माध्यमांतून होणारे प्रदुषण व त्यामुळे प्रदूषित होणारी हवा व पाणी याही गोष्टी संसर्गजन्य आजार पसरण्यास तितक्याच कारणीभूत ठरत आहेत. यामुळं 'हात स्वच्छ धुणं' याकडे कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारापुरता प्रतिबंधक उपाय म्हणून न पाहता आपल्या अवतीभवती असलेल्या एकुण प्रदुषणामुळे होणारे बरेचसे आजार रोखण्यासाठी किंवा यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी हा सुरक्षित आरोग्याचा मूलमंत्र म्हणून पाहिलं पाहिजे. याबाबत आपली रोग प्रतिकारकशक्ती जर चांगली असेल तर यापासून दूर राहण्यास अधिक मदत होईल असं डॉ. नंदकुमार बर्वे यांनी याबाबत आपलं मत व्यक्त करताना सांगितलं.

 समाजात स्वच्छतेविषयी जागृती व्हावी व सामाजिक मुल्याचा 'स्वच्छता' हा एक अविभाज्य घटक बनावा हाच या 'ग्लोबल हँडवॉशींग डे' चा मुख्य हेतू आहे. ज्या ठिकाणी जीवाणू, विषाणू राहण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आरोग्यासाठी स्वच्छता राखणं हाच यामागील महत्वाचा भाग आहे किंबहुना या भूमिकेतून हा दिवस अधोरेखित करण्यात आला आहे. 

एका अभ्यास अहवालात युनिसेफच्या मते स्वच्छतेबाबत योग्य वर्तन किंवा काळजी घेतल्यास यातून ५४% सामान्य आजारांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकतं व श्वसनसंस्था संबंधी २०% आजारांवर नियंत्रण आणता येईल असं म्हटलं आहे. भारतातील हात स्वच्छ धुण्याबाबत राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण -४ अहवालात देशात केवळ ६०% कुटुंबाकडे हात स्वच्छ धुण्यासाठी पाणी व साबण उपलब्ध आहे, हे समोर आलं आहे. ग्रामीण भागात हेच प्रमाण ४९% वर आहे. तसंच राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०१८-१९ च्या अहवालानुसार देशातील केवळ ४०% शाळा व ४२% अंगणवाडयांमधून हात धुण्यासाठी साबण व पाणी उपलब्ध आहे. निश्चितच हे प्रमाण कमी असून याबाबत सुरक्षित आरोग्याचे दृष्टीनं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.

 

 

कोव्हीडच्या काळातील हातात धुण्याच्या सवयीमुळं फ्लू आजारांचं प्रमाण आणि त्याची तीव्रताही कमी झाल्याचं जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितलं आहे.

डॉ. चंद्रशेखर पालकर यांनी हात धुणं आरोग्यासाठी एक प्राथमिक मुलभूत गरज असल्याचं सांगत म्हटलं, "आपल्यावर लहानपणापासून घरातील वडीलधारी मंडळी, घरात बाहेरून आल्यावर हात-पाय धुऊन वावरणं हा मुलभूत संस्काराचा भाग म्हणून सतत याबाबत सांगत असतात. कारण बाहेरील वातावरणातुन येताना अवतीभवती असलेल्या विषाणूंचा आपल्या शरीरावरील प्रभाव कमी करण्यासाठी म्हणजेच यासाठी या विषांणुचा फैलाव अधिक वाढू नये यासाठी हा यामधील मुख्य हेतू आहे. माझ्यासारखी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी हात धुण्याबाबत सतत दक्ष असतात. आम्ही एखाद्या रुग्णाला तपासणी आधी व तपासल्यावरही लगेच डेटाॅलनं हात धुतो यासाठी की आमच्याकडून रुग्णाला व रुग्णाकडून आम्हाला संसर्ग होऊ नये."

मात्र या हात धुण्याचा अतिरेकही होता कामा नये हेही डॉक्टर सांगतात कारण आपल्यासाठी आवश्यक असणारे जीवाणू नष्ट होण्याची शक्यता असते.

एकूणच स्वच्छता या विषयाबाबत जागरूकता गरजेची आहेच, परंतु कोरोनाच्या काळांत काही लोकांमध्ये हात धुण्याचा अतिरेक झालेला आढळलं. यावर डॉ. ऋचा देशपांडे सांगतात, "कोरोनाच्या काळामुळे नक्कीच हात स्वच्छ धुणं वाढल्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. परंतु त्याचा अतिरेक केल्यानं शरीरासाठी असणारे अनुकूल जीवाणू देखील नष्ट होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे याकडे एक आवश्यक गरज म्हणून पाहताना त्याचा अतिरेकही नको."

हात स्वच्छ धुणं हे निश्चितच गरजेचं आहे, परंतु त्यासाठी वापरला जाणारा साबण केमिकलयुक्त नसावा याची काळजी घ्यायला हवी. तसेच सॅनिटायझर याचाही वापर मर्यादित असणे गरजेचे आहे कारण त्यात अल्कोहोलचा समावेश असतो व अतिवापरानं त्याचा दुष्परिणाम भोगावा लागू शकतो.