India
उत्पादन क्षेत्राच्या पडझडीमुळं जीडीपीची वाढ ६.३ टक्क्यांवर
जीडीपीची वाढ जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ६.३ टक्क्यांवर घसरली आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील उत्पादन क्षेत्र आकुंचन पावल्यामुळं देशाचं सकल घरेलू उत्पन्नाची अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टकॅची (जीडीपी) वाढ जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ६.३ टक्क्यांवर घसरली आहे. या घसरणीमागं या कालावधीत उत्पादन क्षेत्रासहित खनिज उत्खननात झालेलं आकुंचनही असल्याचं हा अहवाल सांगतो.
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांच्या मते अहवालातील आकडेवारी पाहता असं लक्षात येतं की कोव्हीडमुळं झालेल्या आर्थिक पडझडीतून देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत आहे. त्यांच्या मते या वर्षी प्रत्यक्ष जीडीपीची वाढ ६.८ टक्के ते ७ टक्के इतकी असेल.
मात्र जीडीपीच्या या वर्षीच्या कामगिरीचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की या वर्षीच्या पूर्वार्धात ही वृद्धी कोव्हीड आधीच्या कालावधीही तुलना करता ५.७ टक्क्यांनी जास्त होती. या कालावधीत देशाचं उत्पादन ७५ लाख कोटी रुपये इतकं होतं. एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपी मध्ये १३.५ टक्के वृद्धी दिसून आली होती.
आत्ताच्या आकडेवारीमध्ये कृषी क्षेत्रातील सकल मूल्य वृद्धी ४.६ टक्क्यांवर आलेली दिसून येते, जी आधीच्या तिमाहीत ४.५ टक्के होती. संघटित रोजगार क्षेत्रातील आकुंचन आणि मध्यम व लघु उद्योगांमध्ये झालेल्या उत्पादन तुटीमुळंच उत्पादन क्षेत्रातील वजा वृद्धी किंवा घट झाल्याचं तज्ञांचं मत आहे.
मात्र नागेश्वरन यांच्या मते जवळपास सर्वच अर्थांनी भारतीय अर्थव्यवस्था इतर अनेक तुलनात्मक अर्थव्यवस्थांपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. या अहवालाच्या प्रकाशनादरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, " भारताचा प्रत्यक्ष वृद्धी दर ९.७ टक्क्यांच्या आसपास आहे, जो अनेक देशांच्या कामगिरीपेक्षा उत्तम आहे. कान्ज्युमर ड्युरेबल्स (घरगुती दीर्घायु वस्तू) सोडल्या तर जवळपास इतर सर्व उत्पादन विभागांची कामगिरी पूर्वपदावर आलेली आहे, तर सेवा क्षेत्रातही अंतर्देशीय विमान सेवा वगळता इतर सर्व विभागांनी कोव्हीडपूर्व काळातील आकडेवारी गाठलेली आहे."