India

गणेशपूरच्या गावकरी करताहेत स्वतःसाठी मिळालेल्या धान्यातून इतर गरजूंसाठी मदत

यवतमाळ जिल्ह्यातील गणेशपूर येथील अभिनव उपक्रम

Credit : Nikesh Jilthe

-निकेश जिलठे

यवतमाळ: कोरोनामध्ये श्रीमंतांनी गरीबांना मदत केल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. मात्र इथे गरीबच गरीबांच्या मदतीला सरसावले आहे. हा उपक्रम आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील गणेशपूर या गावातला. रेशनच्या दुकानात स्वतःच्या वाट्याचे जे धान्य मिळत आहे, गणेशपूर गावातले लोक त्यातील काही धान्य काढून ते आपल्यासारख्याच इतर गरजूंना देत आहेत. 

शासनातर्फे अंत्योदय योजनेतून गोरगरीबांना मोफत धान्य देणे सुरू आहे. जेव्हा दुकानातून धान्य दिले जाते तेव्हा त्यातील काही हिस्सा हा एक ड्रम मध्ये स्वखुशीने वेगळा काढला जातो, हे गोळा झालेले धान्य इतर गरजूंना पुरवले जाते. सखी बचत गटच्या अध्यक्षा निलीमा उमरे व गणेशपूरचे सरपंच तेजराज बोढे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

"मी बचत गटाच्या माध्यमातून रेशनचे दुकान चालवते. NPH कार्डधारकांना मोफत धान्य मिळत नव्हते. त्यामुळे ते दुकानात येऊन नेहमी चौकशी करून परत जायचे. कुणी परत जातेय याची खंत वाटायची. अशी परिस्थिती सर्वीकडे आहे. आमच्या रेशन डिलरच्या व्हॉट्स ऍप गृपमध्ये याबाबत चर्चा व्हायची. अखेर दुकानात ड्रम ठेऊन रेशनचा काही हिस्सा दान करण्याची संकल्पना समोर आली," असं इंडी जर्नलशी बोलताना बचत गटाच्या अध्यक्षा व रेशन दुकानदार नीलिमा उमरे म्हणाल्या. त्या पुढे म्हणतात, "आधी उमरखेड तालुक्यात हा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर गणेशपूरमध्ये. रेशन धारकांनी तर त्यांचा हिस्सा दान केलाच, सोबतच गावातील काही सधन लोकांनी उचललेले सर्व रेशन दान केले. जे NPH कार्ड धारक परत गेले होते त्यांची यादी मी तयार केली होती. तसेच गावात काही छत्तीसगढी कामगार थांबलेले आहेत. त्यांच्या कडे रेशनकार्ड नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. या गरजूंना संपर्क साधून प्रत्येकी १० किलो प्रमाणे ३० कुटुंबांना गोळा केलेले ऱेशन वाटण्यात आले."

 

 

लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने सध्या हातावर पोट असणा-या कष्टकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. रोजमजुरीतून आलेल्या पैशातून त्यांच्या कुटुंबाची गुजरान सुरू होती. मात्र कष्टाची भाकरी खाणा-या या वर्गाचे हात गेल्या महिनाभरापासून रिकामेच आहेत. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना सध्या मोफत धान्याचा लाभ मिळत आहेत. मात्र अनेकांकडे रेशनकार्ड नाहीत. त्यांच्यवर मात्र उपासमारीची पाळी आली.

आपल्या प्रमाणे इतरांनाही अन्न धान्याची गरज आहे ही भावना लक्षात घेऊन गणेशपूर वासियांनी आपल्या घासातील एक घास आपल्यासारख्या भूकेल्या व्यक्तींना देण्याचा निश्चय केला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या धान्यातील ५ किलो धान्य इतरांसाठी देण्याचा निर्णय झाला. रेशन दुकानाच्या बाजूला त्यांनी एक ड्रम ठेवला. त्यात प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या धान्यापैकी ५ किलोचा वाटा दिला. यातून सुमारे ३ क्विटल धान्य गोळा झाले. या गोळा झालेल्या धान्याचे इतर गरजूंना वाटप करण्यात आले.

गणेशपूरवासियांच्या या उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाला आहे. कापसाची खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे गावातील सर्वांचीच परिस्थिती बिकट आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीतही खिसा जरी फाटका असला तरी अद्याप माणूसकीचा झरा आटलेला नाही हेच गणेशपूर वासियांनी दाखवून दिले आहे. इतर गावातही त्यांचा हा कित्ता गिरवायला हरकत नाही.