India

चार वर्षांनंतर - भीमा कोरेगाव खटल्यात कैद कार्यकर्त्यांचं मनोगत

पहिल्या अटक सत्राला चार वर्षं झाल्यानिमित्त प्रा. शोमा सेन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांचं मनोगत.

Credit : शुभम पाटील

चार वर्षांपूर्वी, ६ जून २०१८ रोजी भीमा कोरेगाव-एल्गार परिषद खटल्यात पहिल्या अटका झाल्या. या प्रकरणी युएपीए लावून अटक करण्यात आलेले जवळपास सर्वच अजूनही कारागृहांमध्ये आहेत. मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा कारागृहातच मृत्यू झाला, तर कवी वरवर राव आणि ऍड. सुधा भारद्वाज सध्या जामीनावर बाहेर आहेत. या १६ जणांपैकी कुणावरचेही खटले गेल्या चार वर्षांत उभे राहिलेले नाही. पहिल्या अटक सत्राला चार वर्षं झाल्यानिमित्त प्रा. शोमा सेन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय.

मनोगताचा मजकूर खालीलप्रमाणे.

४ वर्षांनंतर….

६ जून २०२२. भीमा कोरेगाव - एल्गार परिषद खटल्यात आम्हाला अटक होऊन चार वर्षे झालीत. प्रा. शोमा सेन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, महेश राऊत व सुधीर ढवळे यांना ६ जून २०१८ रोजी अटक झाली. २८ ऑगस्ट २०१८ रोजी दुसऱ्या अटक सत्रात क्रांतिकारी कवी वरवर राव, ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा व वर्णन गोणसाल्विस यांना अटक झाली. त्यापैकी वरवर राव व सुधा भारद्वाज सध्या जामीनावर बाहेर आहेत.

या खटल्यात अटक झालेले सर्वच १६ जण (त्यापैकी एक फादर स्टॅन स्वामी यांचा व्यवस्थेने बंदी अवस्थेत बळी घेतला) कोण आहेत, आम्हाला कोणत्या गुन्ह्यात अटक झालेली आहे हे सारं सारं आपण जाणताच. पण आज यानिमित्तानं आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमच्या सोबत जे घडलेलं आहे ते विशिष्ट नाहीये. दलित-आदिवासी-वंचितांच्या व महिलांच्या न्याय हक्कांसाठी उभे असलेले आणि देशातील सत्ताधारी शक्तीविरोधात तीव्र मत व्यक्त करणारे करणारे अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी, लेखक, कवि, विचारवंत, पत्रकार आणि लढणाऱ्या जनतेला लक्ष्य केले जात आहे. अनेकांना जेरबंद करून असहमतीचा आवाज चूप केला जात आहे. त्यासाठी दहशतवादी कायद्यांचा सर्रास वापर केला जात आहे. या कायद्यामुळे व्यक्तीला स्वतःच्या बचावासाठी काहीही करता येत नाही. जामीन मागितला तर कोर्टाकडून जामीन बिनदिक्कतपणे नाकारला जातो. या कायद्याअंतर्गत भारतात जामीन मिळण्यासाठी सरासरी ५ ते  १० वर्षाचा काळ (आणि महाराष्ट्रात तर ८ ते १० वर्षे) तुरुंगात खितपत पडून राहावं लागतंय, असे आकडेवारी सांगते. माणसाचं सामाजिक, आर्थिक, मानसिक, भावनिक जीवन मातीमोल करण्याचा सत्ताधाऱ्यांनी असा सारा तामझाम रचलेला आहे. पण माणसाला ओळखण्यात ते नेहमीच चुकत आलेले आहेत. आम्ही सारेच एका विचारांचे-जाणिवांचे बंदी आहोत. सत्ताधाऱ्यांनी जशी सद्सद विवेकबुद्धीपासून फारकत घेतलेली आहे, तसं आपलं नाहीये. त्यांनी काळोखात डांबलंय तरी आमची सद्सद् विवेकबुद्धी जागी आहे. नव्हे, ती येथे अधिक टोकदार होण्यास मदतच झालेली आहे.

आमच्या सर्वांच्याच जीवननिष्ठा कष्टकरी-वंचित-पीडितांच्या बाजूच्या आहेत. अन्याय, शोषण, लूट, भेदभाव, विषमतेविरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे, संघर्ष केलेला आहे. या जालीम दुनियेत लढण्याबिन काहीही मिळत नाही, म्हणून भाकरीच्या संघर्षापासून  मुक्तीसंघर्षापर्यंत आम्ही प्रवास केलेला आहे. चार्वाक, बुद्ध,  कबीर, तुकाराम, शिवराय, भगतसिंग, फुले, आंबेडकर… असा हा मुक्तिसंघर्षाचा दैदिप्यमान विचार-वारसा आपल्याला लाभलेला आहे. चिरंतन स्फूर्ती देणारा ज्वलंत अंगार इतिहासाच्या पानापानांतून धगधगत आहे. आम्ही याचा भाग आहोत, याचे आम्हाला विलक्षण प्रेम आणि आणि अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. आपल्या विचार आणि कृतींवर असलेला अढळ विश्वास आणि प्रतिबद्धतेनेच आम्ही आजवर ढळलो नाहीत आणि यापुढेही ढळणार नाहीत. मग ब्राह्मणवादाचा, पेशवाईचा, इंग्रजांचा व हिटलरचा वारसा चालवणाऱ्यांना आम्ही डोळ्यात खूपू लागलो यात नवल ते काय? देशाचा सत्यानाश करणारे देशभक्त ठरत आहेत तर निस्वार्थी सेवा-त्याग करणारे देशद्रोही ठरत आहेत. तर्क खुंटीला टांगून उन्मादी लोंढ्याला मोकाट सोडलेले आहे. असत्य गोष्टी रेटून बोलून-पेरून धार्मिक ध्रुवीकरण घडवले जात आहे. उन्मादी राष्ट्रवाद देशाला एकाधिकारशाहीकडे घेऊन जातो आहे. अशा विषारी वातावरणात त्यांनी आम्हाला देशद्रोही ठरवणे व खोटं कुंभाड रचून जेरबंद करणे सहाजिकच आहे….

तुरुंगात डांबून त्यांना वाटतंय ते आम्हाला उद्ध्वस्त करतील. पण त्यांचा तो गोड गैरसमज होता. मागील चार वर्षात आम्ही स्वतःला जिवंत व प्रवाही ठेवलेललं आहे. आम्ही एकांतवासात आहोत. कधी क्षणिक निराशेच्या काळोखातही आम्ही जाऊन आलोत. पण सुटकेसाठी कुणासमोर दया याचना केली नाही, रडलो नाहीत की माफीनामे लिहून दिले नाहीत. याऊलट कुणी प्रतिकाराच्या कविता केल्यात. कुणी आजादीवर तर कुणी प्रेमावर गाणी लिहिली-गायली. कुणी कथा तर कुणी लेख-पुस्तके लिहिलीत. कुणी खटल्यातील बनावट कथानकाचा पर्दाफाश करतो तर कुणी खटल्यातून बचावाची कष्टप्रद तयारी. सुनावणीच्या वेळी आपण वकिलांना पाहिलंत ताकद आणि धैर्य काय असते ते… कुणी इतर बंद्यांशी मैत्री केली. कुणी जोडले माणुसकीचे नाते. कुणी घडवून आणताहेत प्रबोधन-जागर तुरुंगातही….

जनविरोधी व्यवस्थेचे कारागृह दडपणुकीचे एक हत्यार… मूलभूत सुविधा, ज्यावरून विकास पारंपारिकपणे मोजला जातो, त्या सुविधा जेलमध्ये नाहीत. म्हणून मग येथील पावलोपावली होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणं, संघर्ष करणं ही नित्याचीच बाब. येथे तुम्हाला तुमची स्पेस तयार करावी लागते. मग कारागृह होतं थोडं जगण्यालायक, थोडं मानवी. हा संघर्ष आमचा सतत सुरू आहे…

वर्षानुवर्षे घालवलेल्या अनेक कैद्यांपुढे आमची ही चार वर्षे काहीच नाहीत. इतकी वर्षे ते इथे आहेत, तरी रोज हसत-हसत दिवस रात्र घालवतात. त्यांच्याकडे बघून आम्हाला एक प्रकारची शक्ती मिळते. ते अशा अमानवी ठिकाणी कितीतरी आशेने येणारा दिवस जगतात. पुस्तक-साहित्य व्यतिरिक्त त्यांचा हा आशावाद आमच्या दैनिक जीवनाचा ऑक्सिजन आहे. भयंकर आणि हिंसक बातम्यांनी वर्तमानपत्रे दररोज वाचत असताना येथील हीच दयाळू आणि संवेदनशील मनाची माणसं आमच्या सोबत आहेत… आम्ही सर्व तरुण, मध्यमवयीन व वयस्कर संवेदनशील व भावनाशील माणसे आहोत. आम्ही परिवर्तनशील राजकारणामध्ये आहोत कारण आम्ही माणसं आहोत. आणि म्हणून बंदिस्त अवस्थेतही आम्ही माणुसकीचा हा संघर्ष येथेही ही सुरूच ठेवलेला आहे…

आम्ही ४ वर्षांपासून जेरबंद आहोत. आपल्या मित्र आणि कुटुंबियांपासून दूर आहोत. आम्हाला साथीदारांच्या मैत्रीपासून, प्रेमापासून आणि सहवासापासून वंचित ठेवलेलं आहे. आमचंही हृदय धडधडतंय प्रेमासाठी आणि आजादीसाठी. पण रोजच्या आयुष्यात आमच्या अनुपस्थितीला आपण ज्या धैर्य, संयम, ताकद आणि सहनशीलतेने सामोरे जात आहात, हे पाहणंही आमच्यासाठी साठी आंतरिक बळ देणारं आहे, भरवसा अधिक पक्का करणारं आहे, नातं अधिक आतड्याचं. आम्ही आपणाकडून शिकतोय की एकाचवेळी प्रेम कसे करावे आणि संघर्ष कसा करावा…  या संकटकाळात तुम्ही आपल्या वागणुकीतून आम्हाला आठवण करून देताहात की प्रेम एकत्रितपणात, ऐक्‍यात, लोकांच्या आवाजात, आपल्या आवाजात प्रतिबिंबित होत आहे. खरेतर आमच्याबरोबरच कुटुंबियसुद्धा बाहेर बंदिस्त असतो. सर्वांनाच आपला आपला मरणाचा मानसिक-भावनिक संघर्ष करावा लागतोय. त्यातून समतोल मार्ग काढावा लागतोय. आमच्यासह सर्वांना सांभाळावं लागतंय…  इतक्या हालअपेष्टा भोगतानासुद्धा तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कधीही ढळत नाही. तुम्ही सुद्धा दाखवून देताहात की आपल्या अस्तित्वापेक्षा मोठा असलेल्या एखाद्या गोष्टीचा भाग बनण्याचा अर्थ काय आहे ते… म्हणून आपण सरकारी जल्पक टोळ्यांच्या असत्य माऱ्यासमोर धाडसाने उभे आहात आणि आणि तो मारा सहज परतवून लावता आहात. आपण सत्य घेऊन उभे आहात… सत्याच्या बाजूने उभे आहात…. आपण पदरमोड करून नियमित मनीऑर्डर-पुस्तके-कपडे-औषधे पाठवत आहात. तसेच आपले अनेक सहानुभूतीदार खटल्याच्या कायदेशीर कामासाठी मोठा आर्थिक हातभर उचलत आहेत…. या जगात ज्या काही प्रेमाच्या व न्याय्य गोष्टी शिल्लक आहेत, त्या तुमच्यामुळेही…

आपल्या व आपल्या सहकारी वकीलांच्या प्रयत्नांतून अमेरिकेतील आर्सेनल या स्वतंत्र फॉरेन्सिक संस्थेने आपल्या माजलेल्या सत्ताधाऱ्यांनी रचलेल्या इलेक्ट्रॉनिक बनावट पत्र-पुराव्यांचा जाहीर पर्दाफाश करण्यात यश मिळवलेलं आहे. ही आमच्या निर्दोषत्वाची पावती आहे, पुरावा आहे. पण हे सत्य न्यायालयाच्या गळी उतरायला आणखी किती वेळ जावा लागणार आहे, हे 'तारीख पे तारीख' पद्धतीने चालणाऱ्या व वारंवारच्या न्यायाधीशांच्या या खटल्यातून माघार (रेक्युज) प्रकरणांमुळे आज सांगता यायचे नाही… पण यानिमित्ताने जगभरातील मानवतावादी व पुरोगामी लोकप्रतिनिधींनी व जनतेने सुरुवातीपासूनच या खटल्याच्या समर्थनार्थ आपला आवाज बुलंद केलेला आहे. आमच्या बिनशर्त सुटकेची केंद्र शासनाकडे लेखी मागणी केलेली आहे. त्यासाठी काहींनी स्वतंत्र प्रचार मोहिमा राबविलेल्या आहेत. आणि आम्हाला तुरुंगात पत्रे-ग्रीटिंग्स पाठवलेली आहेत. या सर्व प्रयत्नांनी  आमच्या स्वप्नांना नुसतंच बळ दिलेलं नसून या जगात न्यायाच्या, सत्याच्या, आजादीच्या बाजूने आवाज उठवणारी चांगली माणसं खूप आहेत, ही अपेक्षा खरी ठरवली आहे. भारतातही अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी, लेखक, कलावंत, माजी न्यायाधीश, वकील, पुरोगामी पक्ष-संघटनांनी, शेतकऱ्यांच्या जनआंदोलनांनी आमच्या सुटकेसाठी सतत आवाज उठवलेला आहे, तर कधी आंदोलनेही केलेली आहेत. या सर्वांचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. त्यांना ते आवडणारही नाही. पण भीमा कोरेगाव-एल्गार परिषद खटल्याच्या समर्थनात देश-विदेशात मिळत असलेला हा अभूतपूर्व पाठींबा, जनसमर्थन व कष्टदायी प्रयत्न एक दिवस नक्कीच रंग आणेल, यात शंका नाही. 

हे खरंय की आपण सर्वांनी एका अंधकारमय काळात प्रवेश केलेला आहे. पण इतिहास सांगतो की जरी अत्याचाराची साम्राज्ये अस्तित्वात होती आणि बहरलेली होती, तरी ती जमीनदोस्त केली गेलेली आहेत. हेही निघून जाईल. एक चांगले जग तयार करण्यासाठी एकत्र येणे ही काळाचीच गरज आहे. आपण फक्त आपल्या मूलभूत हक्कावरील हमल्यांविरुद्ध लढणार नाही, तर एक चांगले, न्याय्य, समतावादी, प्रेमाधारित जग निर्माण करण्यासाठी लढत आहात. शेकडो अन्याय, हजारो अत्याचारांपासून लाखो लोकांची चेतना आकार घेत आहे. सत्ताधाऱ्यांचे जुल्मी राज्य आणि सफेद झूठ जनतेची ताकद बनत आहे. आणि जनतेची ताकदच एक दिवस विचारांसाठी बंदी बनवलेल्यांना तुरुंगातून मुक्त करेल… हा आशावाद एक दिवस साहिरच्या ओळींनाही जिवंत करेल...

'जब धरती करवट बदलेगी, जब कैद से कैदी छुटेंगे

जब पाप घरौंदे फुटेंगे, जब जुल्मके बंधन टुटेंगे

जेलों के बिना जब दुनिया की, सरकार चलायी जायेगी

वो सुबह कभी तो आयेगी, वो सुबह हमीं से आयेगी…. '

 

६ जून २०२२

प्रा. शोमा सेन

ऍड. सुरेंद्र गडलिंग

रोना विल्सन

महेश राऊत

सुधीर ढवळे

 

या मनोगतातील मजकूर हा लेखकांचा वैयक्तिक दृष्टिकोन व मत आहेत. त्याच्याशी इंडी जर्नलची सहमती गृहीत धरू नये.