India

जातीय तेढीतून पाळीव कुत्र्याची हत्या केल्याचा चित्रपट निर्मात्याचा आरोप

गावातल्या जातीय शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यामुळं काही लोकांनी त्यांचा कुत्रा मारून टाकल्याचा आरोप सोमनाथ वाघमारे यांनी केला आहे.

Credit : Shubham Patil

सांगलीतील वाळवा तालुक्यातील मालेवाडी गावात जातीय अट्रोसिटीच्या अनेक घटना घडत असून, जर वेळीच प्रबोधन नाही झालं, तर खैरलांजी सारखी घटना इथे घडू शकते, असा इशारा चित्रपट निर्माते सोमनाथ वाघमारे यांनी इंडी जर्नलशी बोलताना दिला. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस (टिस) मधून पिएचडी करत असलेले वाघमारे सध्या कोव्हीडमुळं त्यांच्या आजोळी मालेवाडी मध्ये आले आहेत. मात्र त्यांनी गावातल्या जातीय शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यामुळं काही जातीवादी लोकांनी त्यांचा कुत्रा मारून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार, ४ जानेवारीला त्यांचा पाळीव कुत्रा टॅमी हरवला. दोन दिवस सगळे टॅमीला शोधत होते. मात्र काल ६ तारखेला गावातील एका घरासोमर त्याला मारून टाकल्याचं त्यांना समजलं. टॅमीच्या चेहऱ्यावर मारहाण झालेली दिसतअसल्याचंही त्यांनी सांगितलं.

"मालेवाडी हे गाव शाहीर देशमुख यांचं गाव म्हणून सांगलीमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या गावात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत आणि तसंच संभाजी भिडे यांचे कार्यकतेही आहेत. उजव्या विचारसरणीच्या काही कार्यकर्त्यांनी दहा वर्षांपूर्वी माझ्यावर हल्ला देखील केला होता, ज्यात माझ्या वडिलांना डोक्याला मार लागला होता," वाघमारे म्हणाले.

मालेवाडीत अशा अट्रोसिटीच्या खूप घटना घडत असल्याचं सांगत वाघमारे पुढे म्हणाले, "गावामध्ये काही दिवसांपूर्वी जमिन प्रकरणावरून वाद होऊन अट्रोसिटीची घटना घडली होती. त्यासंदर्भात मी सांगलीच्या अधीक्षकांना ईमेल पाठवला होता. त्या इमेलमध्ये कोणाची तक्रार केली नाही, तर फक्त या गावात जातीय प्रबोधनाची गरज असल्याचं सूचित केलं होतं."  मालेवाडी पोलीस स्टेशन हे सांगलीतील आष्टा पोलीस स्टेशन अंतर्गत येत. त्या पोलीस स्थानकाला सांगलीच्या अधीक्षकांनी सात दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितलं होतं.

 

 

आष्ट्यातील पोलिसांनी मालेवाडी मधील सरपंच, पोलीस पाटील यांच्या सोबत बोलून रिपोर्ट केला. या रिपोर्टमध्ये हे गाव खूपच शांत आणि तंटामुक्त आहे, लोक इथे सद्भावनेनं राहतात, गावात अट्रॉसिटी होत नाहीत, असं म्हटलं असल्याचं वाघमारेंनी इंडी जर्नलला सांगितलं. इंडी जर्नलला हा रिपोर्ट तपासून बघता आला नाही. 

"गाव खूपच संवेदशील आहे आणि भविष्यात इथे काही वाईट घटनाही घडू शकते. हे गावातील गावातील प्रमुख लोकांनासुद्धा माहित आहे," वाघमारे पुढं म्हणाले.

"या सगळ्याचा राग ठेऊन नंतर त्याचा बदला म्हणून टॅमीला मारण्यात आलं आहे. कारण गावातील या लोकांना माहित आहे की मला काही इजा झाली तर इशू होऊ शकतो. म्हणून त्यांनी प्राण्यावर राग काढला. आणि हेच आपण अनेक घटनांमध्ये बघतो. बलात्कार तसंच हिंसेचा वापर लोकांना शांत करण्यासाठी होतो," ते म्हणाले.

आष्ट्यातील पोलिस चौकीशी या संदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता तिथल्या अधिकाऱ्यांनी "मालेवाडीमध्ये गेल्या दीड वर्षापासून काही जास्त अट्रोसिटीच्या घटना घडल्या नाहीत. त्यात मला या आधीचं स्पष्ट सांगता येणार नाही कारण माझी या भागात आत्ताच बदली झाली आहे, असं सांगितलं. आष्ट्याच्याच गुन्हे शाखेतील पोलिसांकडे याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितलं, "अट्रोसिटीची अशी माहीत तोंडी किंवा कॉल वर देऊ शकत नाही. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते. आणि तुम्हाला माहिती हवी असल्यास अर्ज करा."

झालेल्या प्रकाराबद्दल आष्टा पोलीस स्थानकात वाघमारे तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र यासंबंधी त्यांच्याकडून अर्ज घेऊन त्यावर पुढील तपास करण्याचं फक्त आश्वासन पोलिसांनी त्यांना दिलं, असं त्यांचं म्हणणं आहे. दडपशाही, शुद्धतेवर आधारित या प्रकारचा भेदभाव आणि त्यातून होणाऱ्या हिंसाचाराला कंटाळून वाघमारे यांनी मालेवाडी कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला आहे.